असे किती बळी?

0
112

पाटण्यामध्ये घडलेली चेंगराचेंगरीची घटना आपल्या सार्वजनिक जीवनातील बेशिस्त आणि प्रशासनाची बेपर्वाई या दोन्ही गोष्टींवर प्रकाश टाकणारी आहे असे म्हणावे लागेल. आजवर अशा चेंगराचेंगरीच्या असंख्य घटना देशात घडल्या. पाटण्यातील बळींची संख्या त्या तुलनेत कमी आहे, पण सातार्‍याजवळच्या मांढरदेवीत अशाच प्रकारच्या चेंगराचेंगरीत २००५ साली ३४० भाविकांचा बळी गेला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये नैनादेवीच्या मंदिरात दीडशे, जोधपूरच्या मेहरानगडावरील चामुंडा मंदिरात २२४, केरळच्या साबरीमलामध्ये १०४ असे मोठ्या संख्येेने आजवर बळी गेले आहेत आणि तरीही अशा प्रकारांपासून काही धडा घेतला जात नाही हे खरोखर आश्चर्यकारक आहे. जेव्हा हजारोंच्या संख्येने लोक गोळा होत असतात, तेव्हा त्या गर्दीचे व्यवस्थापन करणे ही आयोजकांची आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु कार्यक्रमाचे आयोजन करण्यापुरतीच आपली जबाबदारी आहे असे मानून आयोजक नामानिराळे राहतात आणि प्रशासन गर्दीचे व्यवस्थापन ही आयोजकांचीच जबाबदारी आहे असे मानून स्वतः नामानिराळे होते. परिणामी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या की एखादी क्षुल्लक अफवा धावपळीस कारणीभूत ठरते आणि चेंगराचेंगरी होऊन शेकडो निष्पापांचा बळी जातो. पाटण्यातील दुर्घटनेत नेमकी कोणती गोष्ट धावपळ होण्यास कारणीभूत ठरली हे स्पष्ट झालेले नाही. विजेची जिवंत तार तुटून पडल्याची आवई कोणीतरी उठवली आणि प्राणभयाने लोक सैरावैरा धावू लागले असे सांगितले जात आहे. कारण काहीही असो, पाटण्याच्या ज्या गांधी मैदानात दसर्‍याच्या उत्सवाची मौज लुटण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते, त्यांच्या परतीचा एकच अरुंद मार्ग उपलब्ध होता आणि तेथेही काळोखाचे साम्राज्य होते. त्यामुळे त्या भीतीदायक वातावरणामध्ये काय घडते आहे हे कोणालाच कळू शकले नाही आणि बायकामुले गर्दीच्या पायांखाली तुडवली, चिरडली गेली. ज्या गांधी मैदानात दसरा महोत्सवाचे आयोजन केले गेले होते, त्याचे केवळ एकमेव प्रवेशद्वार खुले होते आणि बाकी सगळी दारे कडीकुलपात बंद केलेली होती असेही आढळून आले आहे. त्यामुळे सगळी गर्दी जिवाच्या आकांताने जेव्हा पळत सुटली, तेव्हा चेंगराचेंगरी होणे अपरिहार्यच होते. गर्दीचे योग्य पूर्व नियोजन जर झाले असते, बांबूचे अडथळे उभारले गेले असते, लोक रांगांत आणि शिस्तीत येतील हे जर पाहिले गेले असते, पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला असता, तर कदाचित अशी दुर्घटना टळू शकली असती. परंतु प्रशासन बेफिकिर राहिले, आयोजक बेफिकिर राहिले आणि त्यातून निरपराध नागरिकांचा, महिला आणि मुलांचा बळी गेला. अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या सातत्याने घडणार्‍या घटना पाहिल्या, तर त्यामागे काही घातपात तर नाही ना या संशयालाही जागा राहते, कारण आजवर झालेल्या या सर्व मोठ्या दुर्घटना धार्मिक स्थळांवरच झालेल्या आहेत. मांढरदेवी, नैनादेवी, चामुंडा मंदिर, साबरीमाला, अलाहाबादेतील कुंभमेळा, मध्य प्रदेशातील एका मंदिरातील उत्सव अशा विविध धार्मिक सोहळ्यांच्या वेळीच या दुर्घटना घडल्या हे उल्लेखनीय आहे. या अफवा कशा पसरतात, त्यातून भाविकांच्या मनामध्ये भीती कशी पसरवली जाते याचा तपास घातपाताच्या अंगानेही व्हायला हवा. पाटण्याच्या याच गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेवेळी गावठी बॉम्ब फुटले होते. आता या दुर्घटनेची शासकीय पातळीवर चौकशी होईल. दुर्घटना कशामुळे घडली हे शोधले जाईल, तिची जबाबदारीही एकमेकांवर ढकलण्याची अहमहमिका लागेल. परंतु अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काही केले जाणार आहे की नाही? आपल्या गोव्यात लवकरच सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शवदर्शनाचा मोठा सोहळा होणार आहे. तेथे अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी गोवा सरकार काय खबरदारी घेणार आहे? कशा प्रकारे गर्दीचे नियोजन व व्यवस्थापन करणार आहे? सातत्याने घडणार्‍या चेंगराचेंगरीच्या घटना पाहता त्याबाबत आत्यंतिक गांभीर्याने खबरदारी घेणे आवश्यक असेल. न जाणो, एखाद्या क्षुल्लक अफवेतून हजारोंचे प्राण संकटात सापडू शकतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापेक्षा घडलेल्या दुर्घटनांपासून धडा घेण्यात शहाणपण असेल.