>> अष्टपैलू अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा महासन्मान
आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अवघ्या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी संवाद साधत त्यांचे अभिनंदनही केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर धीरगंभीर भूमिका साकारत विविध नाट्यछटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले.
कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे, तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अभिनेते असे अशोक सराफ यांचे वर्णन केले जाते.
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी. जी. टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका. तसेच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. याशिवाय ‘राम राम गंगाराम’ या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे.
आत्तापर्यंत अशोक सराफ यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अशी ही बनवाबनवी, माझा पती करोडपती, धूमधडाका, आयत्या घरात घरोबा, गूपचूप, भूताचा भाऊ, आमच्या सारखे आम्हीच, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत या चित्रपटांमधील अशोक सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.