अशांत सुशांतच्या मृत्यूचे गूढ

0
417

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे व गंभीर वळण मिळाले आहे. त्याची मैत्रीण रिचा चक्रवर्ती हिच्या व्हॉटस् ऍप चॅटमध्ये अमली पदार्थ व्यवहारविषयक उल्लेख आढळून आलेले असल्याने त्या अंगाने यापुढील तपास होणार आहे. अमलीपदार्थ विरोधी विभागाने आता तिच्याविरुद्ध रीतसर फौजदारी गुन्हा नोंदवून घेतला असल्याने या कथित आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन लवकरच या प्रकरणातील वास्तव जनतेसमोर येईल अशी आशा आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर अनेक अंगांनी त्याच्या आत्महत्येच्या कारणांबाबत चर्चा रंगली. सुरवातीला पुढे आली ती बॉलिवूडमधील गटबाजी. सिनेनिर्माता आदित्य चोप्रा, करण जौहर आणि सिनेपत्रकार राजीव मसंद यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झाले. सुशांतसिंहची कारकीर्द संपवण्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धी गटाने दबाव, दडपणांचा वापर केल्याच्या त्या आरोपाने बॉलिवूड हादरले. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ अनेकजण पुढे आले. अभिनेत्री कंगना राणावतपासून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हांपर्यंत अनेकांनी या निमित्ताने बॉलिवूडच्या रुपेरी झगमगाटाच्या काळ्या बाजूवर झगझगीत प्रकाश टाकला.
नंतर पुढे आली सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या कथित आर्थिक उत्कर्षाची बाब. सुशांतच्या पैशांवर ती आणि तिचा भाऊ मौजमजा करायचे असा आरोप झाला. त्यासंदर्भात खुद्द सुशांतच्या कुटुंबियांनीच तिच्यावर आरोप केले. रिया व तिच्या भावाचे अनेक आर्थिक व्यवहार सुशांतच्या खात्यातून पूर्ण केले गेल्याचे उघड झाले. त्यावरही चर्चा रंगल्या.
त्यानंतर आता रिया चक्रवर्तीच्या व्हॉटस्‌ऍप चॅटमधून अमली पदार्थ व्यवहारविषयक जी बाब पुढे आलेली आहे ती आधीच्या सगळ्या दाव्यांपेक्षा अधिक गंभीर आहे आणि त्याची सखोल चौकशी होणे जरूरीचे आहे.
मुंबई पोलीस या आत्महत्या प्रकरणावर ज्या प्रकारे पडदा पाडू पाहात होते, ते सर्वोच्च न्यायालयानेच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केल्याने घडू शकले नाही. बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असाही मध्यंतरी सामना रंगला. परंतु या सगळ्या राजकीय खेळींमुळे या मृत्यूप्रकरणाची उकल होण्याची गरज विशेषत्वाने निर्माण झाली आहे.
सुशांतसिंहची मैत्रीण रिया हिची एक मुलाखत नुकतीच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतली आहे. त्यात तिने आपण सुशांतच्या पैशांवर चैन करीत नव्हते, तर सुशांत आणि आपण एकत्र वावरत असताना तो खर्च सुशांत करीत असे व त्याच्या मानसिक आजाराची कल्पना आपल्याला त्याच्या समवेत केलेल्या युरोप दौर्‍यात आल्याचा दावा केला आहे. अर्थात, ही मुलाखत रियाचे व्हॉटस् ऍप चॅट समोर येण्याच्या आधी घेतली गेलेली असावी, त्यामुळे अमली पदार्थ व्यवहाराबाबत त्यात उल्लेख नाही, परंतु सुशांत हा २०१३ साली मानसिक तणावाखाली होता व तेव्हा त्याने मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली होती हे जरी खरे असले, तरी त्यामुळे त्याला ठार वेडा ठरवून तो आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न मुळीच पटण्याजोगा नाही. सुशांतसिंह हा अमली पदार्थांचे सेवन करायचा असा दावा त्याचा माजी शरीररक्षक आणि स्वयंपाकी या दोघांनी केलेला आहे आणि आता रियाच्या चॅटमुळे ती त्याला चहातून अमली पदार्थ देत असे असा संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता यापुढील तपास अमली पदार्थ व्यवहाराच्या या अंगाने कसोशीने झाला पाहिजे, तरच सुशांत मृत्यूप्रकरणाचे सत्य बाहेर येऊ शकेल. बॉलिवूडमधील झगमगाटी जग आणि अमली पदार्थ व्यवहार यांचे नाते यानिमित्ताने बटबटीतपणे बाहेर आले तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे आता गोव्याशी जुळलेले असल्याने येथील अमली पदार्थांचे विश्वही उघडे पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात स्वतःहून चौकशी करण्याची गरज आहे.
जीवनात यशस्वी होणे सोपे असते, परंतु यश टिकवून ठेवणे कठीण असते असे म्हणतात हे सुशांतसिंहच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे. त्याने चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनयगुणांच्या बळावर यश जरूर मिळविले, परंतु त्याला ते पेलता आले नाही. परिणामी जी गुंतागुंत निर्माण झाली, त्यातूनच तो आपला जीव गमावून बसला. एक उमलती कारकीर्द संपली. आता किमान त्याच्या मृत्यूचे खरे कारण तरी जगापुढे यावे आणि त्याला कोण जबाबदार हे कळावे ही चाहत्यांची अपेक्षा आहे!