अलभ्यलाभ

0
19
  • ज. अ. रेडकर

आपणाला कुठूनतरी अचानक मोठा लाभ व्हावा अशी दुर्दम्य इच्छा अनेकांची असते. यात मोठा आर्थिक लाभ, उच्च पद किंवा मानसन्मान देणारा पुरस्कार यांचा सामान्यपणे अंतर्भाव असतो. एखाद्याला अनपेक्षितपणे अशा कोणत्याही गोष्टीचा अलभ्यलाभ झाला की त्याला अपरंपार आनंद होत असतो. समजा पुरातन वाड्याची पुनर्बांधणी करतेवेळी जमिनीखाली अचानक मोहरांनी भरलेला हंडा सापडला तर त्या वाड्याच्या मालकाची काय अवस्था होईल? कल्पनाच न केलेली बरी!

असे सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात असलेला विशाल पसरलेला कातळ पाहिला आणि त्यांना कल्पना सुचली की यावर गडकिल्ला बांधला तर अरबी समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित होईल. इथे आपले आरमार उभे करता येईल. त्यानुसार किल्ला बांधण्यासाठी त्यांनी पंताना आज्ञा दिली- ‘या कातळावरी चोखट गडकिल्ला उभारावा की जो अरबी समुद्रावरील वाहतुकीची निगराणी करील. त्यासाठी लागणार्‍या धनाची चिंता नसावी. श्री भवानी जगदंबा आपल्या पाठीशी आहे, ती सगळे निभावून नेईल. मात्र पैशासाठी रयतेस तोशीस देऊ नये.’ राजाज्ञा झाली, मग काय विचारता. पंत कामाला लागले. किल्ल्याचा आराखडा तयार झाला. पायाभरणीचे कार्य छत्रपतींच्या शुभहस्ते पार पडले. पुढे खोदकाम करताना अचानक पहारीचा खणकन आवाज आला. कोणत्या तरी धातूवर पहारीचे टोक आदळले होते. पुढे हा खणखणाट वाढला आणि लक्षात आले की तिथे तांबे-पितळ किंवा अशाच कोणत्या तरी धातूचे रांजण असून त्यावर पहारीचे घाव पडत असल्याने हा आवाज येत आहे. लगेच पंताना निरोप गेला. पंत आले. काळजीपूर्वक ते रांजण बाहेर काढण्यात आले आणि पाहतात तो काय… ते रांजण सोन्याच्या मोहरांनी भरलेले होते! राजांना निरोप गेला. राजे आले. त्यांनी मोहरा पाहिल्या आणि म्हणाले, ‘हा गड बांधण्यासाठीच भवानी मातेने दिलेला हा शुभसंकेत आहे. त्याचा योग्य विनियोग करा आणि चोखट गडकिल्ला बांधा.’ आज मालवणच्या समुद्रकिनार्‍यावर दिमाखात उभा असलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला!
सामान्य माणसाला असा सोन्यानाण्यांनी भरलेला हंडा सापडला तर तो आनंदाने नक्कीच वेडापिसा होईल. काय करू आणि काय नको अशी त्याची अवस्था होईल. कारण त्याला हा अलभ्यलाभ झालेला असतो. मात्र असा हंडा सापडला तर तो पूर्वीच्या काळी राजाच्या मालकीचा ठरत असे. राजा खूश होऊन जे इनाम देईल ते घेऊन गप्प बसावे लागत असे. आतादेखील असा ऐवज जमीन खणताना सापडला तर त्याची वर्दी सरकारदरबारी द्यावी लागते आणि त्यातील वीस टक्के मोलाचे बक्षीस ज्याला हंडा सापडला असेल त्याला दिले जाते. एवढेच काय पण ‘कौन बनेगा करोडपती’ या ज्ञानस्पर्धेमध्ये मोठी रक्कम मिळाली असेल तर त्यावरदेखील सरकार कर वसूल करते. म्हणजेच या स्पर्धेत जरी एक कोटी रक्कम मिळाली तरी त्यातील तीस ते चाळीस टक्के रक्कम कररूपाने सरकार घेते. म्हणजेच लाक्षणिक अर्थाने स्पर्धक जरी करोडपती झाला असला तरी प्रत्यक्षात तो करोडपती होत नाही- लक्षाधीश मात्र जरूर होतो. सामान्य माणसाला ही रक्कमदेखील तशी मोठीच असते, म्हणूनच विजेत्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलतो. एखादी मोठ्या रकमेची बम्पर लॉटरी लागते तेव्हादेखील असा आनंद बक्षीस विजेत्याला होत असतो. कारण हा अलभ्यलाभ असतो. एवढेच कशाला मटक्यासारख्या जुगारातून एखाद्याला काही हजार मिळाले तरी आनंदित होणारे महाभाग आहेत. कारण यापूर्वी त्याचे कित्येक हजार या जुगारात गेलेले असतात ते परत मिळाले याचा तो आनंद असतो.

अलीकडे अनेक लोकांना काही संस्थांकडून अलाणे-फलाणे पुरस्कार जाहीर होतात ज्यांची नावेदेखील कधी ऐकिवात नसतात. त्याबद्दलच्या सचित्र बातम्या दैनिकांतून येतात. आपणाला अलभ्यलाभ झाला असे पुरस्कार विजेत्याला वाटत असावे. मात्र हे पुरस्कार सेटिंग लावून घेतलेले असतात असा प्रवाद निर्माण झाला आहे. त्यामुळे होते काय की, खरोखरच लायक व्यक्तीला मिळालेला पुरस्कारदेखील संशयाच्या घेर्‍यात येतो. त्याची कारणेदेखील तशीच आहेत. पात्रता नसताना एखाद्याला पुरस्कार जाहीर होतो तेव्हा हा संशय अधिक बळावतो. कोणतेच सेटिंग लावलेले नसताना पुरस्कार मिळतो तेव्हा तो संबंधित व्यक्ती पात्र आहे याची खात्री झाल्यावरच जाहीर होतो. असा पुरस्कार म्हणजे व्यक्तीसाठी एक सुखद धक्का असतो. हा अलभ्यलाभ मला कसा काय प्राप्त झाला, कुणी माझे नाव सुचवले असेल असे प्रश्न त्या व्यक्तीला पडतात.

पुरस्कार विकणार्‍या जशा संस्था असतात तशा निस्पृहतेने परीक्षण-निरीक्षण करून पुरस्कार देणार्‍यादेखील काही संस्था आज समाजात अस्तित्वात आहेत. अर्थात त्यांची संख्या मर्यादित असली तरी दुर्लक्षणीय नक्कीच नाही. अशा संस्थेकडून जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा व्यक्तीला खरे समाधान मिळत असते. त्याच्यासाठी हा अलभ्यलाभ असतो. आपण केलेल्या कार्याची कुणीतरी दखल घेतली याचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकते.

जगन्मान्य नोबेल पुरस्कार किंवा ग्लोबल टिचर अवार्ड हे पुरस्कार कुणाचा वशिला लावून किंवा सेटिंग करून मिळत नाहीत. या पुरस्कारांच्या निवडीसाठी कठोर निकष निश्चित केलेले असतात. त्या निकषांवर माणूस उतरतो तेव्हाच असे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार कुणाला द्यायचे यासाठी त्या-त्या विषयातील तज्ज्ञ लोकांची समिती असते. ही समिती निःपक्षपणे आपली जबाबदारी पार पाडत असते आणि भरपूर विचारमंथन केल्यानंतरच असे पुरस्कार जाहीर केले जातात. या पुरस्काराने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. काही पुरस्कार असे असतात की ते ज्यांना ते प्रदान केले जातात ती व्यक्ती फार उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची असेल तर त्या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढते. उदाहरणार्थ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा पुरस्कार किंवा रवींद्रनाथ टागोर व अमर्त्य सेन यांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा होय. त्यांना मिळालेले पुरस्कार मोठे होतेच, परंतु अशा उत्तुंग व्यक्तींना हे पुरस्कार दिल्याने त्या पुरस्कारांची शान वाढली.
भारत सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार अनेकदा वादग्रस्त ठरतात. कारण पुरस्कार विजेत्याची निवड राजकीय हस्तक्षेपामुळे झाली आहे असा लोकांचा समज झालेला असतो. मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्या अवतीभवती वावरणार्‍यांची जेव्हा अशा पुरस्कारासाठी निवड होते तेव्हा हा संशय बळावतो. काही लोकांना पुरस्कार फक्त आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हवे असतात. पुरस्कार मिळाल्यावर त्यासंबंधी दैनिकांत सचित्र बातमी छापून यावी, चारचौघांत आपले नाव व्हावे अशी त्यांची दुर्दम्य इच्छा असते. कारण स्वकर्तृत्वाने पुरस्कार मिळवणे त्यांना शक्य होत नसते म्हणून ते हा आडमार्ग निवडतात.

खोटी आश्वासने व खोटी आमिषे दाखवून लुबाडणारी जशी बिलंदर माणसे समाजात असतात तशा लबाड संस्थादेखील असतात. या संस्थांचे पदाधिकारी पुरस्कारलोलुप पैसेवाल्या लोकांची रेकी करतात. त्यांच्याशी संपर्क साधतात आणि अमुक-अमुक संस्थेला तुमचा गौरव करायचा आहे, त्यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा सोबतचा फॉर्म भरून संस्थेकडे पाठवा आणि त्यासोबत संस्थेला अमुक-अमुक एवढी रक्कम देणगी म्हणून पाठवा, अशा प्रकारची मांडवली केली जाते. पुरस्कार मिळवणे हेच ज्यांचे उद्दिष्ट असते ते लोक अशा संस्थेच्या जाळ्यात अडकतात. या खाजगी संस्था पुरस्काराचे नामाभिकरण ‘राष्ट्रीय पुरस्कार’ असे करतात, जे अशोभनीय आहे. कारण वास्तविक पाहता केंद्र सरकारने दिलेला पुरस्कार हाच राष्ट्रीय मानला जातो, असे असताना खाजगी संस्था आपल्या पुरस्कारांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ कसे काय संबोधू शकतात? ती संस्था राष्ट्रीय दर्जाची आहे अशी तिला मान्यता सरकारने दिलेली असते का? संस्था नोंदणीकृत असली म्हणजे ती राष्ट्रीय दर्जाची होऊ शकते काय? सरकार अशा संस्थांवर कारवाई का करीत नाही? अशासारखे प्रश्न मनात उद्भवल्यास वावगे ठरू नये.

काहीही असो, मात्र जसे दान सत्पात्री करणे इष्ट ठरते तसे पात्र व्यक्तीलाच पुरस्कार देऊन गौरव करणे उचित ठरेल. खिरापतीप्रमाणे पुरस्कार वितरण करून निदान पुरस्काराची अवहेलना होणार नाही याची तरी काळजी पुरस्कार देणार्‍या संस्थांनी घ्यायला हवी.