अरविंद केजरीवाल यांना दोन कोटींची लाच

0
93

>> मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून रक्कम घेतल्याचा बडतर्फ मंत्र्याचा आरोप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतले व ते आपण स्वत: पाहिले असा खळबळजनक आरोप काल केजरीवाल मंत्रिमंडळातील बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी केला. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी शनिवारी (दि. ६) मंत्रिमंडळातून हटविल्यानंतर मिश्रा यांनी हा आरोप केला आहे. दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळून काढणार्‍या या आरोपानंतर स्वत: केजरीवाल यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मिश्रा यांचे आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कपिल मिश्रा यांची केजरीवाल मंत्रिमंडळातून शनिवारी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळी मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले व केजरीवाल यांच्यावर वरील आरोप केला. यावेळी मिश्रा म्हणाले, ‘शुक्रवारी रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्या समोर दोन कोटी रुपये दिले. हे पाहिल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही.’
आपण या प्रकारानंतर जैन यांनी त्यांना ही रक्कम का दिली असा प्रश्‍न केला. मात्र केजरीवाल यांनी त्याविषयी योग्य उत्तर दिले नाही असे मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर आपण या प्रकरणाविषयी भ्रष्टाचार विरोधी विभागाला पत्र लिहून कळविल्यामुळे आपणास मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दिल्ली सरकारमधील चाललेली अनेक भ्रष्टाचारी प्रकरणे आपण पाहिली. मात्र केजरीवाल त्यावर कारवाई करतील असे आपल्याला वाटले होते. केजरीवालांना कोणी भ्रष्टाचारी बनवू शकतील असे मला वाटले नव्हते असे मिश्रा म्हणाले.
कपिल मिश्रा यांनी आणखी गौप्यस्फोट करताना सांगितले की, केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी ५० कोटी रुपयांचे जमीन विषयक डील केल्याची माहितीही सत्येंद्र जैन यांनी आपल्याला दिली आहे. या व्यवहारातील रक्कम कोठून आली व ती कशासाठी देण्यात आली याची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. ‘आप’मध्ये राहूनच आपण भ्रष्टाचारविरोधात लढेन. ‘आप’मधून आपणाला कोणी काढू शकत नसल्याचा दावा त्यांनी केला.
आरोप निराधार : सिसोदिया
कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर केलेले सर्व आरोप निराधार, खालच्या दर्जाचे व बिनबुडाचे असल्याचा दावा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. मिश्रा यांची कामगिरी खराब असल्याने त्यांची हकालपट्टी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अण्णा हजारे व्यथित
केजरीवाल यांच्यावरील आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. मात्र या क्षणी आपण या विषयावर अधिक भाष्य करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण अभ्यासानंतरच आपण यावर अधिक बोलेन असे ते म्हणाले.

कुमार विश्‍वासकडून केजरीवालांना पाठिंबा
बडतर्फ मंत्र्याने केलेल्या गंभीर आरोपानंतर आम आदमी पक्षाचे एक प्रमुख नेते कुमार विश्‍वास यांनी अरविंद केजरीवाल यांची पाठराखण केली. केजरीवाल यांचे शत्रूही या आरोपांवर विश्‍वास ठेवू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विश्‍वास म्हणाले, ‘मी केजरीवालांना १२ वर्षांपासून ओळखतो. आमचे मतभेद, भांडणे असतील, परस्परांबद्दल नाराजीही असू शकेल. मात्र आपण केजरीवाल लाच घेतील ही कल्पनाही करु शकत नाही’. आपण भ्रष्टाचारी असल्यास आपल्याला पक्षातून काढावे असे केजरीवाल यांनी १०० वेळी म्हटले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वरील आरोपानंतर आपण सत्येंद्र जैन यांच्याशी संपर्क साधला व त्यांचे याविषयीचे मत स्पष्ट करण्याची विनंती त्यांना केली आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस तयार आहोत. केजरीवालांवर आरोप करणारे मिश्रा हे विश्‍वास यांचे निकट मानले जातात.

केजरीवालांनी राजिनामा द्यावा : भाजप
दिल्लीच्या बडतर्फ मंत्र्यानेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी दिल्ली प्रदेश भाजपने केली आहे.
केजरीवाल यांच्यात नैतिकता असल्यास त्यांनी पदत्याग करावा असे मत दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याविषयावर आपण नायब राज्यपालांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल राजिनामा देत नसल्यास ‘आप’चे दिल्ली सरकार बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी याची शक्यता पडताळून पहावी अशी राज्यपालांना विनंती केली जाईल असे ते म्हणाले.
युवक कॉंग्रेसची निदर्शने
दरम्यान, दिल्लीतील युवक कॉंग्रेसनेही केजरीवाल यांच्या विरुध्द या प्रकरणी निदर्शने केली. यावेळी केजरीवालांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.