आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आपचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान, तसेच पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा व डॉ. संदीप पाठक या नेत्यांचे तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आज (दि. 18) राज्यात आगमन होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या बड्या नेत्यांचे राज्यात आगमन होत असून, ह्या दौऱ्यात हे नेते आपचे राज्यातील आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस (बाणावली) व क्रुझ सिल्वा (वेळ्ळी) यांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल, भगवंतसिंग मान व अन्य नेते हे बाणावली व वेळ्ळी मतदारसंघात आपल्या आमदारांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर आपचे नेते ह्या दौऱ्यात राज्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत.