पॅरालिम्पिकमध्ये भारताला तीन पदके

0
36

>> उंच उडी, टेबल टेनिसमध्ये रौप्य तर थाळी फेकमध्ये कांस्य पदक

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने काल रविवारी पदकांची हॅट्‌ट्रिक नोंदवली. भाविनाबेन पटेल हिला टेबल टेनिसमध्ये रौप्य, निषाद कुमार याला उंच उडीमध्ये रौप्य तर विनोद कुमारला थाळीफेकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. पदक विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारताच्या भाविनाबेन पटेल हिने काल रविवारी राष्ट्रीय क्रीडादिनाचा शुभारंभ रौप्य पदक जिंकत केला.

पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत भाविनाने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक ठरले. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.

निषाद कुमारची उंच उडी
टोकियोे पॅरालिम्पिकमध्ये भारताला निषाद कुमारने दुसरे पदक मिळवून देताना उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. निषाद कुमारने २.०६ मीटर लांब उडी मारत अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावला. याच प्रकारामध्ये भारताचा रामपाल पाचव्या क्रमांकावर राहिला. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले.

पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणारा निषाद कुमार हा तिसरा भारतीय ठरला. कालच भाविनाबेन पटेलला रौप्य पदक मिळाले तर २०१६ साली दीपा मलिकने गोळाफेक स्पर्धेत ४.६१ मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावले.

थाळीफेकमध्ये कांस्य
थाळीफेक या प्रकारामध्ये विनोद कुमार याने कांस्य पदक पटकावत भारताला काल रविवारी क्रीडा दिनी एकूण तिसरे पदक मिळवून दिले. थाळीफेकच्या एफ-५२ या प्रकारामध्ये विनोद कुमारने १९.९१ मीटरचे अंतर पार केले. रौप्यपदक विजेत्या क्रोएशियाच्या वेलिमिरने १९.९८ मीटरवर थाळी फेकली, तर पोलंडच्या पिओत्रने २०.०२ मीटर अंतर पार करत सुवर्णपदक जिंकले.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
निषाद कुमार आणि विनोद कुमार यांना रौप्य पदक मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांचे अभिनंदन केले आहे. तर राहुल गांधींनीही निषाद कुमारचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी भारताला आणखी एक रौप्य पदक मिळाले आहे. निषाद कुमारने भारताची मान अभिमानाने उंचावली असे राहुल गांधी म्हणाले.