Home बातम्या अमेरिका-इस्रायलकडून इराणवरील हल्ले तीव्र; इराणकडूनही प्रतिहल्ले चालूच

अमेरिका-इस्रायलकडून इराणवरील हल्ले तीव्र; इराणकडूनही प्रतिहल्ले चालूच

0

इस्त्रायलने इराणच्या राष्ट्रपती कार्यालयावर काल पुन्हा एकदा भीषण हल्ला चढवला. इस्त्रायली लष्कराने (आयडीएफ) केलेल्या दाव्यानुसार, हे ठिकाण इराणी राजवटीचे सर्वात महत्त्वाचे आणि मध्यवर्ती मुख्यालय होते. सोमवारी रात्री इस्त्रायली हवाई दलाने (आयएएफ) गुप्तचर माहितीच्या आधारे ही अचूक कारवाई केली. तेहरानच्या मध्यभागी असलेल्या ‘लीडरशिप कंपाउंड’मधील संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय अमेरिकेने देखील इराणवरील हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. दुसऱ्या बाजूला इराणने काल देखील आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील हल्ले चालूच ठेवले. इराणने जवळपास 10 तळांवर हल्ला केला. याशिवाय दुबई, दोहा व अन्य काही शहरांवरही इराणने द्रोन हल्ले केले.

आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, हे कमांड मुख्यालय इराणमधील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जात होते. येथे इराणचे सर्वात वरिष्ठ नेते एकत्र येतात, हेच ठिकाण इस्त्रायलने रातोरात उद्ध्वस्त केले. आयडीएफनेसोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून या हल्ल्याची माहिती दिली. आयडीएफने म्हटले आहे की, इराणी राजवटीचे लीडरशिप कंपाउंड- सेंट्रल हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात इराणला झालेल्या नुकसानासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे की, या दहशतवादी राजवटीमागील नेते आणि त्यांचे मुख्यालय नष्ट केले आहे.

अमेरिकेकडून निर्णायक कारवाई
युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने मंगळवारी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) शी संबंधित सुविधांसह इराणच्या प्रमुख लष्करी पायाभूत सुविधांवर सातत्याने कारवाई केली. अमेरिकन सैन्याने सततच्या कारवायांदरम्यान इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांड अँड कंट्रोल सुविधांचा, इराणी हवाई संरक्षण व्यवस्थेचा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रक्षेपण स्थळांचा तसेच लष्करी हवाई तळांचा नाश केला आहे.

165 मृत मुलींचा सामूहिक दफनविधी
28 फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील ‘शाजारेह तैबेह’ या मुलींच्या प्राथमिक शाळेवर झाला होता. युद्धाच्या पहिल्याच दिवशी 165 निष्पाप शाळकरी मुलींना आपला जीव गमवावा लागला होता. मृत पावलेल्या या सर्व मुलींना दफन करण्यासाठी काल एकाच जागेवर एकत्रित कबरी खोदण्यात आल्या. त्यात त्यांना दफन करण्यात आले. या सामूहिक कबरींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

1 कोटी भारतीय प्राथमिकता : केंद्र सरकार
आखाती प्रदेशात जवळपास एक कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा धोक्यात आल्याचे सांगून या तिन्ही देशांनी संयमाने निर्णय घ्यावा आणि हा संघर्ष लवकरात लवकर थांबवावा, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताकडे तूर्त मुबलक इंधन साठा
मध्यपूर्वेतील बदलत्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असताना, भारतातील इंधन साठाबाबत सध्या चिंतेचे कारण नसल्याचे समोर आले आहे. भारताकडे 25 दिवसांचा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) साठा आणि 25 दिवसांचा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. भारताकडे एकूण 8 आठवड्यांचा कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आहे. भारताचे केवळ 40 टक्के कच्चे तेल ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून’ येते, तर उर्वरित 60 टक्के कच्चे तेल इतर मार्गांमधून येते. भारत मागील करारांनुसार रशियन कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

यूएईने पाडली 172 क्षेपणास्त्रे अन्‌‍ 755 द्रोन
संयुक्त अरब अमिरात (यूएई) ने आतापर्यंत 172 क्षेपणास्त्रे आणि 755 द्रोन पाडले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने देशाविरुद्ध इराणने डागलेल्या क्षेपणास्त्र आणि द्रोन संदर्भातील आपला अहवाल अद्ययावत केला आहे. इराणने एकूण 186 क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी 172 अडवण्यात आली. 13 समुद्रात पडली आणि एक यूएईच्या भूमीवर पडले. अडवलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये 8 क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यांचा अवशेष यूएईच्या भूमीवर पडल्याने 3 जणांचा मृत्यू झाला, 68 जण किरकोळ जखमी झाले आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. इराणने 812 द्रोन प्रक्षेपित केले, त्यापैकी 755 पाडण्यात आले आणि 57 देशाच्या आत पडले.

नरेंद्र मोदींची 8 देशांच्या प्रमुखांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 48 तासांत 8 देशांच्या प्रमुखांची चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. तसेच मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान आणि कुवैत या देशांच्या प्रमुखांशी देखील संवाद साधला.