होर्मुज सामुद्रधुनीवरून 48 तासांचा अल्टिमेटम; दोघांकडूनही ऊर्जा व पाणी प्रकल्पांवर हल्ल्यांच्या धमक्या
अमेरिका आणि इराणमधील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली असून, जगासमोर महायुद्धाचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला असून, पुढील 48 तासांत ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ पूर्णपणे खुली न केल्यास इराणचे सर्वात मोठे वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेसह त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सर्वात कमकुवत नसेवर बोट ठेवले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर आखाती देशांतील पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल. यामुळे आता केवळ इंधनच नव्हे, तर संपूर्ण अरब जगतात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (रविवारी) सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला थेट इशारा दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर इराणने कोणत्याही धमकीशिवाय होर्मुजची सामुद्रधुनी 48 तासांच्या आत पूर्णपणे खुली केली नाही, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इराणच्या विविध वीज प्रकल्पांवर हल्ले करून ते नामशेष करेल. या कारवाईची सुरुवात इराणमधील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
ट्रम्प यांच्यावर सध्या अमेरिकेत वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे प्रचंड दबाव आहे. चालू महिन्यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, त्याला इराणने केलेली होर्मुजची नाकेबंदी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. जगातील एकूण तेल आणि वायू व्यापारापैकी सुमारे 20 टक्के व्यापार याच मार्गावरून होतो.
इराण आक्रमक
अमेरिकेच्या धमकीनंतर इराणने होर्मुझची सामुद्रदुनी अमेरिका आणि इस्त्रायल वगळता सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इराणने अमेरिकेच्या धमकीनंतर होर्मुझ सामुद्रधुनीजवळ शत्रूचे एफ 15 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे.
> 48 तासांत होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्याचा अमेरिकेचा अल्टिमेटम
> वीज प्रकल्पांवर हल्ल्याची अमेरिकेची धमकी
> इराणकडून पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा
> जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
> महायुद्धाच्या संकटाची भीती कायम