‘अमूल’कडून दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

0
18

गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे आधीच सामान्यांना महिन्याचा ताळेबंद मांडताना मोठी कसरत करावी लागत असताना आता पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. देशातील अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे अमूल दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूलने दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. अमूल ब्रँड अंतर्गत येणार्‍या अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ झाली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत ३१ रुपये, तर अर्धा लिटर अमूल ताजाची किंमत २५ रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्धा लिटरच्या पाकिटासाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.
अमूल कंपनीचा एकूण खर्च आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्याने दुधाच्या दरात वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आजपासून दरवाढ लागू

नवीन किमती १७ ऑगस्टपासून लागू होतील. याचा अर्थ अमूल गोल्ड ६१ रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती ५५ रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर ४९ रुपये प्रति लिटर होईल.