अमित शहा १३ मे रोजी गोव्यात

0
173

>> श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सभा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या १३ मे रोजी गोव्यात येत असून आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कार्याला गती देण्यासाठी या दिवशी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये भाजप बूथ कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून भाजप कार्यकर्ते दुचाकीवरून रॅलीने बूथ मेळाव्याला उपस्थितीत राहणार आहेत. निमंत्रित कार्यकर्त्यांना मेळाव्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. या दुचाकी रॅलीचे नेतृत्व मतदारसंघाचे मंत्री, आमदार किंवा अध्यक्ष करणार आहेत, अशी माहिती सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर दिली.

भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार अस्थिर करण्याचे विरोधी पक्षाचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा राजकीय ठराव भाजप राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत काल संमत करण्यात आला. हॉटेल मांडवी सभागृहातील बैठकीला गोवा प्रभारी अविनाश खन्ना, गोवा व महाराष्ट्राचे सरचिटणीस (संघटन) विजय पुराणिक, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दामोदर नाईक, भाजपचे मंत्री, आमदार, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. खासदार सावईकर यांनी बैठकीत राजकीय ठराव मांडला. भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारने विकासाला प्राधान्यक्रम दिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र, विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न निषेधार्ह आहेत, असे सावईकर यांनी सांगितले.

सरकारच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याची गरज आहे. विरोध करणे, आरोप करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे, असे नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या आरोपांच्या विरोधात पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकसंध होणे आवश्यक आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले. ग्रामपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी माजी संघटनमंत्री सतीश धोंड यांना पुन्हा पाचारण करा, अशी मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी केली. दुपारच्या सत्रात सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण ठराव आर्लेकर यांनी मांडला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रकाश वेळीप यांनी विचार मांडले. प्रभारी खन्ना आणि विजय पुराणिक यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर बैठकीत चर्चा झाली. खाण बंदीच्या प्रश्‍नावर खाण व्याप्त भागातील लोकांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेच्या तिसर्‍या आठवड्यात
पर्रीकर गोव्यात परतणार
अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष व काही पदाधिकार्‍यांशी बुधवारी दूरध्वनीवरून संपर्क साधून बैठकीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री पर्रीकर येत्या मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात गोव्यात परततील. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या गैरहजेरीत प्रथमच कार्यकारी समितीची बैठक झाली, असे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.