अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनाला कासावलीत आग

0
194

>> आग त्वरित विझविल्याने मोठी दुर्घटना टळली

>> २२ अग्निशमन जवानांनी विझवली आग

वास्कोहून हावडा, कोलकाता येथे जाणार्‍या अमरावती एक्सप्रेसच्या १८०४७ क्रमांकाच्या रेल्वे इंजिनाला कासावली रेल्वे स्थानकावर आग लागण्याची घटना काल सकाळी घडली. सदर आग अग्निशमन दलाचे जवान व रेल्वे अधिकार्‍यांनी त्वरित आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, रेल्वेच्या इंजिनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे सदर रेल्वे दोन तास उशीरा रवाना झाली.

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती – हावडा एक्सप्रेस सकाळी वास्को स्थानकावरून ७ वाजून १० मि. सुटल्यानंतर ती ७.५० वा. कासावली रेल्वेस्थानकावर थांबली. वास्कोहून रेल्वे स्थानकावरून गाडी सुटली तेव्हा इंजिनमधून धूर येत होता असे काही प्रवाशांनी सांगितले. कासावली रेल्वे स्थानकावर इंजिनाच्या काही भागाला आग लागल्याचे दिसून आले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी, रेल्वे अधिकार्‍यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचताच त्यांनी व अधिकार्‍यांनी मिळून रेल्वे इंजिनाला लागलेली आग विझविली.

दरम्यान, रेल्वे अधिकार्‍यांनी दुसर्‍या इंजिनाची व्यवस्था केल्यानंतर रेल्वे प्रवाशांना घेऊन अमरावती एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला रवाना झाली. वरील दुर्घटनेमुळे अमरावती एक्सप्रेस दोन तास उशीरा रवाना झाली. त्यामुळे इतर रेलगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. सदर दुर्घटनेवेळी रेल्वेतील प्रवाशांची बरीच तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी रेल्वे इंजिनापासून दूर धाव घेतली. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी २२ अग्निशमन जवानांना २ बंबचा वापर करावा लागला. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.