नवीन पीडीए : आजची बैठक रद्द होण्याची शक्यता

0
130

नवीन पीडीए व इतर महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आज सोमवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित नगर नियोजन मंडळाची बैठक पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाच्या विभाजनाचा प्रस्ताव आहे. तसेच उत्तर गोव्यातील किनारी भागासाठी नवीन पीडीए स्थापन करण्याचा विचार सुरू आहे, असे नगरनियोजन मंत्री सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. ताळगावसाठी वेगळी पीडीए स्थापन करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. ताळगावचा झपाट्याने विकास होत आहे. योग्य नियोजनासाठी पीडीएची आवश्यकता आहे, असे मंत्री सरदेसाई यांचे म्हणणे आहे.

नवीन पीडीएच्या स्थापनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने नगरनियोजन मंडळाची बैठक पुढे ढकलण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आम आदमी पार्टी, शिवसेना, कॉँग्रेस या विरोधी पक्षांनी नवीन पीडीएच्या स्थापनेला विरोध दर्शविला आहे. नवीन पीडीएच्या विषयावरून भाजपमध्येही असंतोषाचे वातावरण आहे.