चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात दोन मृत्यू, ८३ बाधित

0
45

राज्यात कोरोनामुले गेल्या चोवीस तासांत दोघांचा मृत्यू झाला असून ८३ बाधित सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ५९ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९०२ एवढी झाली आहे.
कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ३१८० एवढी आहे. काल राज्यात ६२२० जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७२,८४६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर इस्पितळांतून काल १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

चोवीस तासांत ५९ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. राज्यात काल गुरूवारी ५९ जण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६८,७६४ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १३ जणांना भरती करण्यात आले.
काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ७० जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ८६ आहे. कासावली ५५, पणजी ६१ अशी रुग्णसंख्या असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,८८९ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२०,४८० एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ११,५०,२६९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

कोविडच्या कृती दलासोबत
मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कोविडसाठीच्या कृतीदलाच्या बैठकीला उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर काय काळजी घ्यावी या संबंधी कृतीदलाशी चर्चा केली तसेच त्यांनी राज्यात चालू असलेल्या कोविड लसीकरणाच्या कार्यक्रमाचाही फेरआढावा घेतला.

नव्या नमुन्यांमध्ये ८२% डेल्टा रुग्ण
राज्य सरकारने हल्लीच जेनरेम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या २३ नमुन्यांमधील १९ जण हे कोरोनाच्या डेल्टा या नव्या व्हेरियंटचे रुग्ण होते,असे स्पष्ट झाले असल्याचे आरोग्यखात्यातील सूत्रांनी काल सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गोव्यात आतापर्यंत १४,६२,७४८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ३, ४७,१६३ जणांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत.