सिराज, श्रेयसचा समावेश

0
132

>> न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका

फलंदाज श्रेयस अय्यर व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहर्‍यांना न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची दारे खुली करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबरपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार्‍या या मालिकेसाठी काल सोमवारी मुंबई येथे भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळलेला अष्टपैलू केदार जाधव याला बळीचा बकरा बनवत त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. २२ वर्षीय श्रेयस याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. भारत ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने न्यूझीलंड ‘अ’ व द. आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध नाबाद १४०, ६५, १०८, ८२ व ९० धावा करत आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला होता. टी-२० कारकिर्दीत श्रेयसच्या नावावर २६.८५च्या सरासरीने व १२८च्या स्ट्राईकरेटने १२८९ धावा जमा आहेत.

यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे. हैदराबादच्या सिराज याने मागील रणजी मोसमात १८.९२च्या सरासरीने ४१ बळी घेतले तसेच आंतरराज्य टी-२० स्पर्धेतही प्रभाव पाडताना ६.५७च्या इकॉनॉमीने व १३,८८च्या सरासरीने ९ बळी घेतले आहेत. याच कामगिरीमुळे त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात स्थान दिले होते. या संधीचा पुरेपूर लाभ उठवून त्याने १० बळीदेखील आपल्या नावे केले. दिल्ली येथे होणार्‍या टी-२० सामन्याने आशिष नेहरा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा समारोप करणार असला तरी त्याला ‘अंंतिम ११’मध्ये स्थान देण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा असेल असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली येथे पहिला सामना झाल्यानंतर ४ रोजी राजकोट व ७ रोजी तिरुनंतपुरम येथे तिसरा सामना होणार आहे. भारत व न्यूझीलंडचा संघ आत्तापर्यंत पाचवेळा टी-२०मध्ये आमनेसामने आले असून भारताला अजूनपर्यंत किवी संघावर विजय मिळविता आलेला नाही.

टी-२० संघ ः विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराज.