अनोखा दोहा

0
266
  • सुमेधा कामत-देसाई

 

गॅलरीत जाऊन उभी राहिले तेव्हा माझ्या नजरेच्या टप्प्यात अख्खा, भला थोरला समुद्र उसळताना दिसला. निळा-काळा-कबरा-राखी-रुपेरी रंगाचा समुद्र झळाळून उठला होता. कितीतरी वेळ भान हरपून मी त्यालाच पाहत बसले…

 

एकूण ३,४५० कि.मी. अंतर तोडून, सव्वापाच तासांचा प्रवास करून आम्ही दोहाला आलो. एक तास घड्याळ पुढे केले. तापमान ४९ डिग्री होते. माझी आई म्हणायची, ‘दिवसाला ४८ तास अवधी असता तर मला माझे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करता आले असते.’ आता मीही तिच्यासारखीच म्हणू लागले आहे, दिवसाला ४८ तास असते तर…?

आयुष्यात पहिल्यांदाच युरोपला गेले तेव्हा घड्याळ पाच तास मागे करावे लागले, आणि एकाच दिवसात आम्हाला जादा पाच तास मिळाले. (याचा फायदा प्रवासी कंपन्या घेतात. त्या तुम्हाला मुक्कामाला पोचल्यावर अजिबात विश्रांती घेऊ न देता साईटसीईंगसाठी उचलतात).

आम्ही दोहा विमानतळावर उतरून आमच्या हॉटेलच्या दिशेने पळू लागलो. गाडीने आम्हाला हॉटेलजवळ सोडले. हे हॉटेल पंचतारांकित होते नि ते १९ मजल्यांचे होते. आजूबाजूला अनेक प्रकारच्या असंख्य इमारतींचे वेगवेगळे नमुने आमच्या नजरेला पडत होते. मानवी हातकाम काय घडवू शकतात याचे प्रत्यंतर येथे येत होते. अरबांचा पैसा घेऊन सार्‍या जगातल्या अभियंत्यांनी, वास्तुशिल्पींनी, कारागिरांनी, मजुरांनी निर्माण केलेल्या या कलाकृती! डोळ्यांचे पारणे फिटेल एवढी त्यांच्यावर विजेच्या दिव्यांची रोषणाई. रात्री सारे आवरून होईपर्यंत घड्याळात एक वाजला होता. म्हणजे इकडचे दोन वाजले होते. खिडकीवरचा पडदा मी दूर सारला आणि खिडकीबाहेरच्या अवकाशाला आत घेतल्यामुळे विस्तारलेल्या नव्या जगात मी माझ्या अंथरुणावर पडले.

मी रात्री झोपताना नेहमीच खिडकीवरचा पडदा दूर सारून झोपत असते (माझे पणजीतले घर तर इमारतीच्या तळमजल्यावर आहे), आभाळभर झालेले उषेचे आगमन मला मध्येच जाग आल्यावर अंथरुणावरूनच अनुभवता यावे म्हणून! पूर्ण जाग आल्यानंतर मी अंथरुणावरून लगेचच उठते आणि खिडकीशी जाऊन बाहेरच्या उमलत्या जगाचे दर्शन घेते.

पणजीत, माझ्या खेडेगावात पार्सेला व माहेरी- मडगावला हा माझा नित्यक्रम असतो.

दोहा मुक्कामी मला सकाळी जाग आली तेव्हा पूर्ण काचेरी असलेल्या भिंतीतून निळा स्वच्छ प्रकाश खोलीभर सांडला होता. या चंदेरी प्रकाशाची ओळख काही वेगळी होती… हा चंदेरी प्रकाश माझ्या ओळखीचा होता. जन्माजन्मांतरी, तो माझ्या देहदेहांतरी, रोमारोमांतरी भिनला होता. माझे मन आयुष्यभर या प्रकाशाने उजळून गेले होते…

मी पळत सुटले. गॅलरीत जाऊन उभी राहिले तेव्हा माझ्या नजरेच्या टप्प्यात अख्खा, भला थोरला समुद्र उसळताना दिसला. निळा-काळा-कबरा-राखी-रुपेरी रंगाचा समुद्र झळाळून उठला होता. कितीतरी वेळ भान हरपून मी त्यालाच पाहत बसले…

युरोपच्या प्रवासात नेदरलँडला मला समुद्रकिनार्‍यावर हॉटेल मिळाले होते नि आज तर मला येथे अख्खा समुद्र कवेत घ्यायला मिळाला होता.

—————–

या भागात एकूण अशा प्रकारचे ३०० टॉवर्स होते. इंटरनॅशनल पातळीवरील बिझनेस या इमारतींतून चालत होता. सकाळी ७.३० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत अंदाजे ४३ डिग्री तापमान असते. मग रात्री ते कमी होत जाते. हिवाळ्यात ते ९ ते १० डिग्रीपर्यंत कमी होत जाते.

या दिवसांत तुम्ही घराबाहेर पडलात तर सोसाट्याच्या वार्‍याचा तडाखा तुम्हाला लागतो. काही वेळा शहरात तापमानाचे फेरफार फारसे जाणवत नाहीत. वाळवंटातले उष्ण व शीत हवामान दोन्ही टोकांचे असते. एशियातील लोक सर्वांत शीत हवामानात राहतात, पण त्यांनादेखील वाळवंटातील थंडी बाधते असे म्हणतात.

आकाश मात्र पांढरे व धुरकट होते आणि खजुराची झाडे दिसत होती…

———-

येथे टॅक्सी व बसेस या सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था आहेत. पण त्यांचा उपयोग कुणी करताना दिसत नाही. येथे ३० यू.एस.ए. सेंटला एक लिटर प्युअर गॅस मिळतो. काही ठिकाणी यापेक्षाही कमी दरात मिळतो. यापेक्षा येथे मिनरल वॉटर महाग आहे. हेवी ट्रॅव्हलसाठी डिझेल वापरले जाते.

आमच्या बसचा जमाल नावाचा गाईड मोरोक्कोचा रहिवासी होता. त्याने सांगितले की, ‘इथे आम्हाला उन्हाळ्यात फ्लू होतो. इतर देशांतील लोकांना तो हिवाळ्यात होतो. कारण उन्हाळ्यात आम्ही आत एसीत राहतो. बाहेर आल्यावर आम्हाला अतिउष्ण हवामानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकृतीत चढ-उतार होतात.’

या प्रदेशात कजारी लोकांपेक्षा भारतीय लोक जास्त आहेत. आता व्हिसावर खूप निर्बंध आले आहेत. नेपाळी, श्रीलंकन लोकही आहेत. लहान समुहांना येथे यायला उत्तेजन देण्यात येते.

कजारी लोक प्रामुख्याने मच्छीमार व मोती विकणारे होत. टॅक्स नाही म्हणून मोती स्वस्त विकले जातात.