अनुदान बंद करा, अन्यथा राजीनामे द्या

0
118

>>भाभासुमंचा मंत्री व सत्ताधारी आमदारांना इशारा
>>२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

मातेसमान मातृभाषांचा गळा घोटण्याचे कारस्थान रचून स्वतःच्या मातेशीच प्रतारणा करणार्‍या भाजप सरकारने आपले पातक लपवण्यासाठी येत्या जूनपर्यंत इंग्रजी शाळांचे अनुदान विनाविलंब बंद करून चूक सुधारावी; नपेक्षा २ ऑक्टोबरपूर्वी सर्व मंत्री व सत्ताधारी आमदारांनी राजीनामे द्यावेत. अन्यथा भाभासुमंच न भूतो न भविष्यति आंदोलन छेडून सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी काल साखळी येथील जाहीर सभेत दिला.

या सभेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर वक्त्यांनी टीका करताना सारा स्वाभिमान गुंडाळून दिलेल्या आश्‍वासनांना हरताळ फासत मातृभाषेविषयी दिलेली आश्‍वासने खुंटीला टांगून गोमंतकीय जनतेचा सरकारने अपमान केला असल्याचा आरोप केला. तत्त्वांना तिलांजली देताना मातेशी प्रतारणा करण्याचा डाव खेळणार्‍या या सरकारने आता तरी जागे व्हावे. अजून वेळ गेलेली नाही असा सल्ला देत मातृभाषेचा सौदा करून इंग्रजीला अनुदान देऊन लांगूलचालन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जनता समर्थ असल्याचा सूचक इशारा देण्यात आला.
पर्रीकरांवर कडाडून टीका
गोव्याची जनता ही जनावरे नाहीत. तत्त्व पाळणारी आहोत. मातृभाषेसाठी प्राण देण्याची जनतेची तयारी असून सत्तेवर येताच जो शब्द दिला होता तो गुंडाळून जनतेची दिशाभूल करणार्‍या पर्रीकर व पार्सेकरांच्या भूमिकेचा भाभासुमंचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. सरकार चालवण्यासाठी इंग्रजीला अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, या पर्रीकरांच्या वक्तव्याचा त्यांनी जाहीर निषेध केला होता. इंग्रजी शाळांना अनुदान चालू ठेवून पर्रीकरांनी मातृभाषेचा सौदा केल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला. आईची इज्जत प्राणापलीकडे असताना मतांसाठी पर्रीकरांनी आईचा सौदा केल्याची तोफ वेलिंगकरांनी डागली. मातेशी प्रतारणा करणारे हे नेते विश्‍वासघातकी, संधिसाधू असल्याने आता जनतेपुढे जाताना त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष हवे; नपेक्षा भीषण परिणामांना गोव्याला सामोरे जावे लागेल असे वेलिंगकर म्हणाले.
मातृभाषेचा गळा घोटला : भाटीकर
अरविंद भाटीकर म्हणाले, की कॉंग्रेसच्या चुका सुधारू शकत नाही तर सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मातृभाषेचा गळा घोटण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रसंगी या सरकारला घरी पाठवायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला. प्राचार्य रत्नाकर लेले यांनी प्रास्ताविकात २०११ सालचा निर्णय बदलण्यासाठी आंदोलन छेडून सर्वांच्या सामर्थ्यामुळेच कॉंग्रेस हटाव मोहीम यशस्वी झाल्याची आठवण केली. भाजप नेत्यांनी भाभासुमंची फसवणूक व अपेक्षाभंग केलेला आहे. केवळ आश्‍वासने देऊन झुलवत ठेवत भ्रमनिरास केलेला आहे. बिलाच्या माध्यमातून मागील दारातून इंग्रजीला अनुदान देण्याचे षड्‌यंत्र रचले होते. सुदैवाने भाभासुमंचे बैठक घेऊन दोन दिवसात आंदोलन उभे केले. आतापर्यंत ८०० बैठका घेऊन जागृती केली असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य अनिल सामंत यांनी प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले तरच संस्कृती निर्माण होईल. इंग्रजीतून शिक्षण घेतल्यास विकृती वाढेल. आपली मुले कशी जगावीत हे पालकांनी ठरवण्याची गरज असून मातृभाषेची कास धरल्यास जीवन समृद्ध बनेल असा सल्ला दिला. समाजात मातृभाषेचा विचार मातीशी जोडलेला असल्याने प्रत्येकाने मातृभाषेचीच कास धरावी अशी भूमिका प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन सामंत यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी भाभासुमंची ताकद मोठी असल्याचे सांगून सरकारला सळो की पळो करून सोडण्यास गोव्याची जनता सज्ज झाली आहे. गोव्याची संस्कृती, गोंयकारपण, गोव्याचे व्यक्तिमत्त्व शाबूत ठेवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे. साखळीचे आमदार डॉ. सावंत यांनी भाभासुमंबरोबर न राहिल्यास त्यांची परिस्थिती कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
सभेस माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर, मगो नेते महेश गावस, प्रवीण ब्लॅगन, भाऊदास नाईक, कॉंग्रेसचे नीळकंठ गावस, आनंद नाईक, विजयकुमार वेरेकर, दामोदर घाडी, आशिष ठाकूर यांनी भाषा सुरक्षा मंचाच्या वाटचालीची थोडक्यात माहिती दिली.
व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, पुंडलिक नायक, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, ऍड. स्वाती केरकर, श्यामसुंदर कर्पे, प्रा. अनिल सामंत, रत्नाकर लेले, महेश गावस, दिनेश सहस्त्रबुद्धे, निशा पोकळे, शशिकांत नाईक, दामोदर नाईक, नगरसेविका रश्मी देसाई, अनंत परब, शांतीलाल आमोणकर, शशिकांत नाईक, दयानंद नाईक, धर्मेश सगलानी, रियाज खान, आत्माराम नाडकर्णी, कुंदा माडकर, मिलिंद रेडेकर उपस्थित होते.

दडपशाहीचे पुरावे सादर
ऍड. स्वाती केरकर यांनी दडपशाहीचे पुरावे सादर केले. रवींद्र भवनाच्या आवारात गेले आठ दिवस नाटके चालू आहेत. सभा होऊ नये यासाठी भाजपने खूपच अडथळे आणल्याचे सांगून त्यांनी उपस्थितांसमोर पाढा वाचला. सभेसाठी आम्ही रवींद्र भवन मागितले होते. पण परवानगी नाकारण्यात आली. आमदार डॉ. सावंत यांनी १९ डिसेंबरला भाभासुमंचला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले होते. मात्र आता ते बदलले असल्याचे त्या म्हणाल्या.

…तर शर्टाला धरून जाब विचारा : सुभाष वेलिंगकर
सभेत पुंडलिक नाईक, नागेश करमली, वेलिंगकर, भाटीकर, स्वाती केरकर यांनी मुख्यमंत्री, रक्षामंत्री, उपमुख्यमंत्री यांची अतिशय प्रखर शब्दांचा वापर करून निर्भत्सना केली. आगामी निवडणुकीत वरील नेते दारावर आले तर शर्टाला धरून जाब विचारण्यास सज्ज रहा असा इशाराही वेलिंगकर यांनी यावेळी दिला.

क्षणचित्रे…

  • स्फूर्ती गीताने सभेला आरंभ.
  • सभेला साडेचारपासून भाषाप्रेमींची गर्दी. 
  • मिनी बसगाड्यांचा येण्यासाठी वापर. 
  • माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर उपस्थित.
  • कॉंग्रेस, मगो नेतेही उपस्थित.
  • कॉंग्रेस गटाचे नगरसेवक उपस्थित. 
  • विरोध डावलून भाजपचे कार्यकर्ते सभेला.