अनसोळे स्फोटप्रकरणी नासिरच्या कोठडीत वाढ

0
4

सत्तरी तालुक्यातील अनसोळे वाळपई येथे 8 एप्रिल रोजी झालेल्या जिलेटिन स्फोटप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या नासिर हुसेन जमादार याला पुन्हा एकदा पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली
आहे.

सदर प्रकरणनंतर नासिर जमादार याला अटक करण्यात आली होती. त्याला वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सदर कोठडी काल रविवारी संपुष्टात आली. त्याला पुन्हा एकदा प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याच्या कोठडीत आणखी पाच दिवसांनी वाढ करण्यात आलेली
आहे.

या संदर्भात वाळपई पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी, नासिर जमादार याच्याकडून या स्फोटासंदर्भात वेगवेगळ्या स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. त्याने हा जिलेटिनचा साठा कशासाठी आणला होता, कुठून आणला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तीचा संबंध आहे या संदर्भातही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन प्राप्त होत असून यातून अनेक स्तरावर विशेष माहिती प्राप्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंतच्या राज्याच्या जिल्हा फोरेन्सीक पथकातर्फे या संदर्भाची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्तरावर नमुने गोळा करण्यात आलेले आहेत असे यावेळी पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या स्फोटावेळी ज्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. या संदर्भाचा अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येईल असे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.