अथातो जीए जिज्ञासा

0
26
  • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

‘गोमंत विद्या निकेतन’मधील ३ डिसेंबरची जीए स्मरणयात्रेची ती संध्याकाळ खरोखर श्यामायमान झाली. जीए या गूढयात्रीचे स्मरण झाले… त्यांच्या अंथांगाचा शोध घेणार्‍या कालजयी कथेचेही स्मरण झाले. ‘समसमा संयोग की जाहला|’… सारे स्वर जुळून आले.

२०२२ चे संवत्सर हे थोरामोठ्यांचे जन्मशताब्दी घेऊन आले. वाङ्‌मयीनदृष्ट्या हे वर्ष संस्मरणीय म्हणायला हवे. मराठी वाङ्‌मयातील उत्तुंग हिमालयाच्या धवलगिरी, गौरीशंकर, कांचनगंगा या नीलनभाला लुचणार्‍या रंगविभोर शिखरराजींच्या तोडीची ही सर्वांगपरिपूर्ण आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वे होत. मराठी वाङ्‌मयाच्या इतिहासात बहुविध आणि बहुमोल कर्तृत्व दर्शविलेल्या या मानदंडांकडे तर्जनी दाखवल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. ‘किती असे वीर वर्णावे!’ असे विस्मयोद्गार काढण्यास भाग पाडणार्‍या या महनीय व्यक्ती होत.
केवळ साहित्यक्षेत्रापुरत्या या व्यक्ती सीमित नाहीत. सर्वंकष जीवनाच्या अक्षांना भिडणार्‍या समस्यांना तोंड देत देत काळाच्या मुशीतून घडलेली ही माणसे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि पत्रकारिता ही पंचसूत्री समाजधारणेला दृढ अधिष्ठान देत असते. सांस्कृतिक चलन-वलन आणि विकास यांमुळे राष्ट्रजीवनाला नवी उभारी प्राप्त होत असते. समृद्ध परंपरा लाभलेल्या आपल्या राष्ट्राला या जीवनमूल्यांचे जतन करण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर नवनिर्माणपर्वात या क्षेत्रांत नेत्रदीपक कार्य करणारी दिग्गज माणसे हिरिरीने वावरली, म्हणून आपण स्वातंत्र्याची मधुर फळे आनंदाने चाखत आहोत. त्यांचे पुनःस्मरण करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य होय. विसाव्या शतकाच्या या दृढ कोनशिलेवर एकविसाव्या शतकात पावशतकाच्या उंबरठ्यापर्यंत वाटचाल करणार्‍या भारताची आशियातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर या सर्व क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणार्‍या व्यक्तींचा स्मृतिजागर करण्याची संधी आपल्याला लाभत आहे. आता येथे साहित्यक्षेत्रापुरते लक्ष केंद्रित करायचे आहे.
नजीकच्या काळात दोन-तीन वर्षांपूर्वी श्रेष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके व डॉ. सरोजिनी बाबर यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. १९२२ सालातील पूर्वार्ध कविवर्य वसंत बापट, प्रा. ग. प्र. प्रधान, कविवर्य शंकर रामाणी यांची स्मृती महाराष्ट्रात, बृहन्‌महाराष्ट्रात आणि गोमंतकात त्या-त्या व्यक्तिमत्त्वाच्या इतमामाने विविध उपक्रमांनिशी साजरी झाली. ही सगळीच व्यक्तिमत्त्वे सर्वमित्र, समाजमान्य आणि प्रतिभावंत. त्यांच्या त्यावेळच्या अस्तित्वाने आमच्याही सर्वांच्या यःकश्‍चित जिण्याला अर्थपूर्णता प्राप्त झाली होती.

आता मराठीच्या कथाक्षेत्रातील तीन दिग्गज कथाकारांची जन्मशताब्दी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे. ते म्हणजे प्रा. गंगाधर गाडगीळ, शांताराम ऊर्फ के. ज. पुरोहित, प्रथितयश प्रकाशक, संपादक आणि मर्मज्ञ समीक्षक प्रा. श्री. पु. भागवत यांचीही जन्मशताब्दी आता २७ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे. यदुनाथ थत्ते आणि बॅ. नाथ पै या समाजवादी पिंडाच्या कृतिशील विचारवंतांची आणि समाजमनस्क वृत्तीच्या प्रज्ञावंतांची जन्मशताब्दी यापूर्वीच सुरू झालेली आहे. वरील तीन कथाकार मराठी कथाक्षेत्रातील बिनीचे कलाकार आहेत. गंगाधर गाडगीळ हे मराठी नवकथेचे शिल्पकार मानले जातात. शांताराम नवकथेच्या जमान्यात समांतरपणे लिहीत होते. पण नवकथेच्या चौकटीत पूर्णत्वाने ती बसणारी नव्हती. त्यांनी आणि सदानंद रेगे इत्यादिकांनी अनवट वाटा धुंडाळल्या. जी. ए. कुलकणी या वाटेवरचे एक श्रेष्ठ यात्रिक. त्यांनीही अनवट राग आपल्या कथेमधून आळवला. पण ती काव्यात्मकतेने ओथंबलेली मानवी करुणा हा तिचा स्थायीभाव. या कथेची वीण दीर्घकथेसारखी. तिचा प्रभाव-संस्कार-परिणाम महाकाव्यसदृश्य दीर्घ पल्ल्याच्या कवितेसारखा… गहिरा… मनाला खिळवून ठेवणारा… कमालीचा झपाटून टाकणारा… पार्थिवात राहून अपार्थिवतेचे किनारे धुंडाळणारा… ही मानवी स्वभावाची विविधांगी चित्रे रेखाटणारी…. ‘कॅलोडॉस्कॉपिक’ चित्रे रंगविणारी… विश्‍वजाणिवेची… या वैखरीवर ‘जी.ए.’ ही तप्त मुद्रा उमटलेली. ही कथा विश्‍वजाणिवेची… ती आहे गूढगंभीर… ‘हिरवे रावे’, ‘निळा सांवळा’, ‘पारवा’, ‘सांजशकुन’, ‘पिंगळावेळ’, ‘काजळमाया’ व ‘पैलपाखरे’ इत्यादी संग्रहांतून जी.एं.नी जो कथाप्रपंच मांडला तो मराठी कथाविश्‍वातील अनोखा आविष्कार होय. तन्मयतेने उभे केलेले हे भव्यतेचे आणि उदात्ततेचे कथाशिल्प आहे… ते आहे एखाद्या रोमन कॅथॅड्रेलसारखे!
नुकतीच बेळगावची कलाप्रेमी मंडळी पणजीला आणि मडगावला येऊन गेली. एकूण सातजण अभिरुचिसंपन्न आणि अभिनयनिपुण मंडळी. ती रसिकाग्रणींची मांदियाळीच म्हणायला हवी. जी.एं.च्या कथेतील आशयद्रव्य आणि अभिव्यक्तीचा चैतन्यमय झरा त्यांनी येथील रसिकांच्या हृदयापर्यंत आणून पोचविला. एरव्ही जी.एं.च्या कथेतील आशय आणि प्रतिमांकित अभिव्यक्ती अवघ्याच रसिकांच्या गंधकोशात सीमित झालेली… पण या ‘सप्तर्षी’नी हे अवघड शिवधनुष्य लीलया, सहजगत्या पेलले. आपल्या ‘स्व-तंत्र’ निवेदनशैलीने ‘त्या हृदयीचे या हृदयी’ आणून सोडले. दीर्घकाळ मनात रिघणारी आनंदानुभूती ठेवून या मंडळीने मठग्रामाहून वेणुग्रामाकडे कुच केले. पण ‘वेणुग्राम’चा सुगंध त्यांनी ‘मठग्रामा’त आणून पोचविला. सर्वार्थाने… सर्वांगपरिपूर्णतेने. साहित्यिक आणि रसिक यांमध्ये सौहार्दाचा सेतू बांधून या शब्दयज्ञाची त्यांनी सांगता केली… विसरू म्हणता विसरेना अशीच ही अनुभूती… इथून पुढे जी.एं.ची कथा गूढ, अनाकलनीय, दुर्बोध व शब्दावडंबरात अडकलेली असे म्हणायला कुणी धजणार नाही.

‘रंगभूमी दिन ग्रुप, बेळगाव’ ही सात रसिकाग्रणींची छोटीशी संस्था… पण तितकीच व्रतस्थ आणि ध्यासपंथी… फक्त जी. ए. कुलकर्णी यांची कथाच नव्हे तर बेळगावच्या श्रीमंत माहेरातील प्रा. अनंत मनोहरांसारख्या मातब्बर व ज्येष्ठ साहित्यिकाच्या साहित्यसंपदेचे तब्बल सव्वा तासाचे आलोकदर्शन घडविणारे हे मनस्वी कलावंत… वेगवेगळ्या व्यवसायात रमलेली आणि एकमेकांपासून लौकिकदृष्ट्या पांगलेली… परंतु अलौकिकाचे माणिक तळहातावर आवळ्यासारखी जोजवणारी ही निष्ठावंत प्रभावळ. त्यांची ‘प्रभा’ दूरवर फाकलेली. तिच्यात कोण कोण आहेत? मेधा मराठे हे वडीलधारे व्यक्तिमत्त्व… अनुभवसंपन्न, कलासंपन्न तितकेच आईच्या ममतेने सर्वांना मार्गदर्शन करणारे… त्यांच्या या कलाकुशल नेतृत्वात मला फक्त मातृत्वच जाणवले. सुधीर शेंडे आणि चिन्मय शेंडे हे पिता-पुत्र या गुणीजनांमध्ये आहेत. एकापेक्षा एक सरस (आणि सरसरमणीयदेखील). प्रिया काळे, अर्चना ताम्हनकर, नूपुर रानडे आणि विद्या देशपांडे यांची त्यांना समक्ष साथसंगत.

या सर्वांनी साभिनय अभिव्यक्तव्यात आपले उत्कृष्ट कसब दाखविले. त्यांची अदाकारी लाजवाब होती. जी.एं.च्या कथेतील बलस्थाने अधोरेखित करताना त्यांनी ‘ऑर्फियस’, ‘राधी’ आणि ‘चैत्र’ या कथांचे अभिवाचन केले. या सार्‍या कथांतील वृत्तिगांभीर्य त्यांनी श्रोतृवृंदांपर्यंत नेऊन पोचवले. ‘ऑफियस’मध्ये पात्रेच बोलतात. ‘राधी’मध्ये कर्त्याचा शोध आहे. ‘चैत्र’मधील मंगळागौरीच्या सणाचे लेखकाने केलेले वातावरण सर्व निवेदकांनी एकत्रितपणे दृग्गोचर केले. शेवटचा ‘लक्ष्मी’ या कथेच्या निवेदनाने कार्यक्रमाची सांगता झाली. जी.ए. जीवनाच्या गूढगर्भ तळाशी कसे घेऊन जातात याचा प्रत्यय आला. सर्व निवेदक आपल्या नादानुकूल भाषेत असे निवेदन करीत होते की क्षणभर वाटले कथेतील पात्रेच गूढ प्रदेशातून आलेली आहेत… उदा. पुढील निवेदन यासंदर्भात महत्त्वाचे ः
‘‘ती जवळ आली, तेव्हा तिला दिसले, की भिंतीवर स्त्रीपुरुष दोन्ही आहेत. तिला पाहताच पाठीत वाकलेली एक बाई पुढे आली व थकलेल्या सैल आवाजात म्हणाली, ‘ये गं, आम्ही कितीतरी वेळ तुझीच वाट पाहात होतो. तू उलट्या प्रदक्षिणा घालायला आलीस, तेव्हाच सगळ्यांना मी म्हटलं होतं, ही एक दिवस इकडं येणार. आता तू आलीस.’’
इथे उत्कंठा ताणली जाते. पुढं पुढं काय असे मनात म्हणत असताना निवेदन येते. उलगाउलग होते ः
‘‘म्हणजे त्या दिवशीची गंगू जोगतीण म्हणजे…’’ तिने जड आवाजात विचारले; पण तिचे शब्द अर्धेच राहिले.
म्हातारीने मान हलवली व म्हटले, ‘‘म्हणजे तुम्हाला तेथे भेटतात ती सगळीच माणसं खरोखर जिवंतच असतात, असं का तुला वाटतं? खुळीच आहेस.’’
म्हातारी थोडी हसली. भिंतीवर बसलेल्या एकदोन जणांच्या हसण्याचाही आवाज आला…
‘गोमंत विद्या निकेतन’मधील ३ डिसेंबरची जीए स्मरणयात्रेची ती संध्याकाळ खरोखर श्यामायमान झाली. जीए या गूढयात्रीचे स्मरण झाले… त्यांच्या अंथांगाचा शोध घेणार्‍या कालजयी कथेचेही स्मरण झाले. ‘समसमा संयोग की जाहला|’… सारे स्वर जुळून आले.

वेणुग्रामहून सप्त तारे आणि तारका आल्या… त्यांनी पाहिले… ते जिंकले. याचे श्रेय अर्थात ‘गोमंत विद्या निकेतन’ या जुन्या जाणत्या संस्थेला.
व्यक्तींचाच नामनिर्देश करायचा झाल्यास- रसिकाग्रणी आणि साहित्यिक जनार्दन वेर्लेकर, गो.वि.नि.च्या उपक्रमशील अध्यक्षांचा कार्यक्रम व्हावा म्हणून मथ्यस्थाची भूमिका यथोचित बजावणारे सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य माधवराव कामत यांची ध्वनियोजना आणि प्रकाशयोजनेची तांत्रिक बाजू योग्य रीतीने सांभाळणार्‍या प्रा. आनंद मासूर यांचा. प्रथितयश कोकणी कथाकार आणि कादंबरीकार महाबळेश्‍वर सैल या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.