अचाट आणि अफाट मोहनदास

0
51
  • डॉ. अजय वैद्य
    (शब्दांकन ः अनिल लाड)

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांचे स्नेही डॉ. अजय वैद्य यांनी त्यांच्या जागवलेल्या आठवणी…

मोहनदास सुखटणकर म्हणजे मराठी रंगभूमीला लाभलेला एक अनमोल हिरा होता. त्यांनी आपल्या नाट्याभिनयाने अवघ्या मराठी मुलखाला वेड लावलं. केवळ नाटकेच नव्हेत तर सिनेमा, मालिका यांतूनही त्यांनी भूमिका केल्या. पण यात त्यांचं मन रमलं नाही. ‘नाटक’ हाच त्यांचा जीवाभावाचा विषय बनला. असा हा चमचमता तारा मराठीच्या नभांगणातून नुकताच लुप्त झाला…
सुखटणकरांच्या आयुष्यात आणि नाट्यप्रवासात ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत ते वावरले. पण ते ‘गोवा हिंदू’मध्ये कसे आले?
१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात ‘भय्यासाहेब वकील’ ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. त्यात त्यांना वैयक्तिक बक्षीसही मिळालं. ‘आयएनटी’चे हे नाटक बघायला म्हणून ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’चे ज्येष्ठ कार्यकर्ते अवधूत गुडे व रामकृष्ण नायक हे दोघे गेले होते. नाटक संपल्यानंतर ते दोघे मोहनदासांना भेटले आणि त्यांना विचारलं, ‘तू कोण?’ ते म्हणाले, ‘मी सुखटणकर!’ ‘सुखटणकर म्हणजे गोव्याचा, मग आयएनटीमध्ये काय करतोस… ‘गोवा हिंदू’मध्ये ये!’ त्यानंतर मग मोहनदास ‘गोवा हिंदू’मध्ये आले.

कुठल्याही संस्थेचा कारभार हा कुणीतरी सांभाळावा लागतो. बाकीचे पदाधिकारी हे फक्त नावापुरते असतात. सांभाळणारे थोडेच असतात. तसे या पाच लोकांनी या ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’चा सगळा कारभार सांभाळला. त्यांस संस्थेचा ‘पंचप्राण’ म्हटले तरी चालेल! रामकृष्ण नायक, अवधूत गुडे, मोहनदास सुखटणकर, सतीश म्हापसेकर आणि देवदत्त मणेरीकर हे सगळे नाटक कुठलं करावं हे ठरवण्यापासून नाटकांचे दौरे, नाटकाच्या ठिकाणी स्वच्छतालयाची सोय आहे की नाही, रात्री नाटक संपल्यानंतर जेवणाची सोय आहे की नाही, तिथे सामान घेऊन कसं जाणार… अशी सगळी कामं वाटून घेऊन दौर्‍यावर जायचे. विदर्भामध्ये वगैरे हे लोक अगोदर एस.टी.ने तिथे जायचे. तशी त्यांची पद्धतच होती.

सुखटणकर ‘ओरिएंटल इंश्युरन्स’मध्ये काम करत. इंश्युरन्सचं नरिमन पॉईंटला ऑफिस. तिथून सुटल्यानंतर थेट ‘गोवा हिंदू’च्या ऑफिसमध्ये लॅमिंग्टन रोडला यायचे. आणि मग त्यानंतर ते घरी केव्हा पोचतील तेव्हा पोचतील! वेळ-काळाचं भान या पाच लोकांनी कधी ठेवलं नाही. आणि पाचही जण एकमेकाला घट्ट धरून होते. जवळजवळ पन्नास वर्षं हे सगळे संस्थेत होते. रामकृष्ण नायक, अवधूत गुडे, मोहनदास सुखटणकर, सतीश म्हापसेकर आणि देवदत्त मणेरीकर या पाच जणांनी कधीच संस्थेकडून मानधन घेतलं नाही. ‘गोवा हिंदू’मध्ये कोण अध्यक्ष, कोण सेक्रेटरी… कुणाला काही लागायचं नाही. कुणी वाट्टेल ते काम करायचं. पत्रव्यवहार बघायचा, कचरावारा करायचा, कामं वाटून घ्यायची आणि मग चालले… संध्याकाळी ‘गोवा हिंदू’मध्ये दररोज भेटायचे. महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षणमंत्री सदानंद वर्दे एकदा कार्यक्रमाला गेले होते. त्यांनी या संस्थेला ‘बिन चेहर्‍याच्या माणसांची संस्था’ असे म्हटले होते. कामे होतात, व्यवस्थित होतात… पण कोण करतो, कुठून करतो काही समजत नसे. या सगळ्यांनी ठरवलं होतं की एका ठरावीक कालावधीपर्यंत कोणीही कसलाही मानसन्मान स्वीकारायचा नाही. एकट्याला मिळाला तरी नाही. कारण हे एकट्याचं काम नव्हे ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे.

त्यावेळी ‘युद्धस्य कथा रम्यः’ आणि ‘मरणात खरोखर जग हसते’ अशा दोन नाटकांची निर्मिती ‘गोवा हिंदू’ने केली होती. त्यात मोहनदासांनी या संस्थेच्या नाटकात पहिल्यांदा काम केलं. अर्थात ती नाटकं फारशी चालली नाहीत आणि फारशी कुणाला माहीतही नाहीत. पण त्यांनी सुरुवातीला नाटकात कामं केली ती ही! नंतर मग ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आलं. ‘रायगडा’च्या नाटकात मूळ श्रेयनामावली बघितली, तर त्यात मोहनदास सुखटणकरांचे नाव नव्हते. पण या माणसाचं पाठांतर आणि स्मरणशक्ती इतकी जबरदस्त की ते बॅकस्टेजला असल्यामुळे त्यांना ‘रायगड’ सगळं पाठ होतं. पूर्ण नाटक पाठ. आणि म्हणून कुणी आजारी पडला तर त्याचं काम मोहनदास करणार हे ठरलेलं. म्हणजे बदली कलाकार म्हणून ते या संस्थेत जास्त होते. त्यांनी स्वतःची अशी नवीन भूमिका कधी केलीच नाही. बदली कलाकार म्हणून ते गमतीने असे सांगत की, शिवाजी आणि स्त्रियांची पात्रे सोडल्यास सगळी कामं मी ‘रायगड’मध्ये केलेली आहेत. संभाजीचं कामसुद्धा त्यांनी आयत्या वेळी केलं. कृष्णकांत दळवी त्यावेळी ही भूमिका करत होते. ते सिनेमात गेले होते. त्यांना इथे दोन तारखा ठरल्या होत्या. आदल्या दिवशी ‘नटसम्राट’ आणि दुसर्‍या दिवशी सकाळी रवींद्र नाट्यमंदिरला ‘रायगडला जेव्हा जाग येते’चा प्रयोग होता. दळवींनी सांगितलं होतं की, काही झालं तरी मी पोचेन. पण आदल्या दिवशी ‘नटसम्राट’च्या वेळेला निरोप आला की मी कोल्हापूरला आहे, निर्माता मला सोडत नाही. त्यामुळं मी काही येत नाही. आणि उद्याच्याही नाटकाला मी पोचणार नाही. तुम्ही ‘रायगड’चा प्रयोग रद्द करा. ‘नटसम्राट’मध्ये ते बेलवलकरांच्या मुलाचं काम करायचे. अर्थात, मोहनदासांचं नाटक पाठ होतं म्हणून त्यांनी ती भूमिका निभावून नेली. पण ‘रायगड’चा निरोप कळल्यानंतर सगळ्यांची पाचावर धारण बसली. तो प्रयोग अलीबागच्या कुठल्या तरी कॉलेजला दिला होता. त्यांना अडचण सांगितल्यावर ते म्हणाले की, त्यांनी विशेषांकावर आणि जाहिरातींवरील केलेला खर्च रुपये तीस हजार आपल्याला द्या. त्यामुळे ‘गोवा हिंदू’चे धाबे दणाणले. आणि संभाजीच्या कामाची जबाबदारी पुन्हा मोहनदासवरच आली. ‘नटसम्राटचा’ प्रयोग संपल्यानंतर खरं तर त्यांना अंधेरीला जायचं होतं. पण मग ते अंधेरीला गेलेच नाहीत. व. पु. काळेंच्या घरी दादरला गेले. रात्रभर पूर्ण नाटक वाचून काढलं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ‘रवींद्र’मध्ये गेले. प्रयोगासाठी येणार्‍या एकेका पात्राबरोबर नऊ वाजेपर्यंत त्यांनी सगळे संवाद म्हटले. मेकअप केला आणि ते रंगमंचावर ‘संभाजी’ म्हणून उतरले. त्यांच्या या भूमिकेचे खुद्द दत्तारामबापूंनी खूप कौतुक केले होते.

‘मत्स्यगंधा’बाबत तसंच झालं. ‘मत्स्यगंधा’मध्ये सुरुवातीला त्यांना काम नव्हते. या नाटकाचे ३७ प्रयोग आपटल्यानंतर अखेरचे प्रयोग म्हणून नाटक गोव्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळेला चंडोलचं काम करणारे विनायक पै हे काही कारणामुळे आले नाहीत. त्यांचं काम मोहनदासांनी केलं. ते केल्यानंतर ते इतकं चपखल बसलं की, नंतर पुढचे पाचशे प्रयोग मोहनदासांनीच केले. त्यांना नवीन काम मिळालं ते ‘अखेरचा सवाल’मध्ये. मग जी नाटकं झाली त्यात ‘स्पर्श’ हे नाटक जयवंत दळवींनी लिहिलं. त्यात ‘नाटेकर’ची भूमिका त्यांनी मोहनदाससाठीच लिहिली होती. त्यांनी ती भूमिका इतकी सुंदर वठवली, इतकी ती चपखल बसली की जयवंत दळवीही त्यांना पत्र पाठवायचे ते मोहनदास सुखटणकर म्हणून नाही तर ‘मोहनदास नाटेकर’ म्हणून. मोहनदासांनी ‘गोवा हिंदू’ सोडून दुसर्‍या इतर कोणत्याही संस्थेत नाटक केलेलं नाही. सिनेमा केले, मालिका केल्या, पण नाटक दुसर्‍या संस्थेत केलं नाही. ‘गोवा हिंदू’च्या विविध नाटकांचे सुमारे अडीच ते तीन हजार प्रयोग त्यांनी केले.

पण त्यांची खासीयत म्हणजे पाठांतर आणि स्मरणशक्ती. कुठलीही कविता त्यांच्या हातात दिली किंवा नाटक दिलं आणि ते आवडलं की ते अगदी अर्ध्या तासात पाठ व्हायचं! वयाच्या नव्वदीलाही ते नटसम्राटमधील स्वगतं पाठ म्हणायचे. अगदी खणखणीत आवाजात. एक शब्द इकडचा तिकडे नाही. म्हणून मग त्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्याच्या जोडीला ‘नटसम्राट’मधील स्वगतं यांचे अनेक कार्यक्रम केले. कुठल्याही मैफिलीमध्ये हे बसले की सुधीर मोघेंच्या दोन-तीन कविता, पाडगावकरांच्या काही कविता आणि कुसुमाग्रजांच्या कितीतरी… आणि त्याच्यानंतर मग ‘नटसम्राट’ असा हा ठरलेला कार्यक्रम असायचा. कुसुमाग्रज त्यांना मुलासारखं मानायचे. तात्यासाहेब त्यांच्या घरी यायचे, तर हे त्यांच्या घरी जाऊन मुक्काम करायचे.
त्यांचा आवाजही अगदी शेवटपर्यंत खणखणीत होता. १९ जून २०२२ ला स्नेहमंदिरात त्यांचा गौरव होता, तेव्हा तिथे त्यांनी कुसुमाग्रजांची ‘नट’ नावाची कविता सादर केली. पूर्ण तोंडपाठ… आणि आवाज या वयातसुद्धा आजच्या नटांचा पोचत नाही असा खणखणीत पोचला. मोहनदासांची स्मरणशक्ती इतकी प्रबळ होती की, त्यांना मराठी रंगभूमीवर ‘गोवा हिंदू’ची झालेली नाटकं, त्यांचे झालेले प्रयोग, त्यात कामं केलेल्या लोकांची यादी, सगळं तोंडपाठ. मोहनदास म्हणजे आमच्या मराठी रंगभूमीचा चालता-बोलता शब्दकोश म्हणा किंवा विश्‍वकोश म्हणा किंवा इतिहास म्हणा… मला व्यक्तिगतही त्यांची खूप मदत व्हायची. लेख लिहिताना नवीन काही संदर्भ हवे असतील तर किंवा इतर काहीही हवं असेल तर अगदी अर्धा-पाऊण तासात सगळं तपशीलवार सांगायचे. आमचे महिन्याला एक-दोन तरी फोन असायचेच. ते विचारायचे, ‘कशे कितें चल्ला?’ आणि मग सुरू…
१९ जून २०२२ ला कृतज्ञता सन्मानानिमित्ताने ते गोव्यात आले होते. त्यावेळी रामकृष्ण नायक आणि मोहनदास यांनी एक फोटो काढून घेतला. दोघांनाही एकमेकांना पुन्हा भेटण्याची खात्री नव्हती. मोहनदास मुंबईत तर रामकृष्ण नायक गोव्यात. ते इकडे येऊ शकत नव्हते आणि हे तिकडे जाऊ शकत नव्हते. फोटो काढल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. रामकृष्ण त्यांना भावनाविवश होऊन म्हणाले की, ‘परत मेळतले रे, चिंता करू नाका.’ दुर्दैवाने ही भेट होऊ शकली नाही.

गोव्याबद्दल त्यांना ओढ होती, प्रेम होतं. आपली नाळ येथे पुरली आहे असे ते म्हणायचे. आणि म्हणून ते ज्यावेळी इथे आले- त्यांना धरून आणावं लागायचं, मुलगा त्यांना इथे घेऊन आला होता. मला म्हणाले, ‘माझी जी शाळा होती जुनी….’ मी म्हटलं, ‘ती नाही आता तिकडे.’ तर म्हणाले, ‘मला जायला पाहिजे! त्या शाळेच्या पायरीवर डोकं ठेवून मला नमस्कार करायचा आहे.’ ते तिथे गेले आणि त्यांनी त्या शाळेच्या पायरीवर डोकं ठेवून नमस्कार केला. आणि मग मला म्हणाले, ‘मी ज्या घरात राहत होतो, तिथे मला जायचे आहे!’ मी म्हटलं, ‘अहो तुमचं ते घर तिथे आहे की बिल्डिंग झाली तुम्हाला काही माहीत नाही…’ तर म्हणाले, ‘मला ती जागा माहीत आहे.’ आणि थिवीला जाऊन गाडीतूनच त्या जागेला नमस्कार केला.

ते नेहमी सांगायचे, माझी बायको म्हणून मी हे सगळं करू शकलो, कारण माझी मुलं झोपायची कधी आणि उठायची कधी हे मी कधी बघितलंच नाही. ती झोपल्यानंतर मी घरी यायचो आणि ती उठायच्या आधी परत कामावर जायचो. अंधेरीवरून नरिमन पॉईंट… आणि मग रात्री ‘लॅमिंग्टन रोड’वरील ‘गोवा हिंदू’चं सगळं करून घरी. शिवाय दहा-दहा दिवस दौरे. त्यामुळं मुलं शिकत होती काय, आणि त्यांचं शिक्षण कसं चाललंय मला काही माहीत नसायचं. त्यांची बायको चांगली सुगरण होती. त्यांच्या घरी ‘हुमण’ खायला म्हणून स्पेशल मुंबईचे साहित्यिक मित्र त्यांच्या घरी मुक्कामाला जायचे.

साहित्य, सांस्कृतिक, नाट्यक्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे, डॉ. अनिल काकोडकर आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली. मान्यवरांचा हा सहवास आणि त्यांची लाभलेली मैत्री ही खरी श्रीमंती बरोबर घेऊन हा अनुभवसमृद्ध, अचाट, अफाट माणूस आपल्यातून गेला आहे…