Home बातम्या अत्याधुनिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेमुळेगुन्ह्यांच्या तपासाला गती : मुख्यमंत्री

अत्याधुनिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेमुळेगुन्ह्यांच्या तपासाला गती : मुख्यमंत्री

0

लवकरच उद्घाटन; ‘न्याय संहिता’ प्रदर्शनाला भेट

वेर्णा येथील अत्याधुनिक अशा फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे लवकरच उद्घाटन होणार असून, या प्रयोगशाळेमुळे राज्यातील गुन्ह्यांच्या तपासाला त्याद्वारे गती मिळणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी काल येथे कला अकादमीत ‘न्याय संहिता’ या विषयावरील विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. न्याय संहितेची अमलबजावणी करणारे तसेच त्या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
‘न्याय संहिता’ या विषयावरील हे प्रदर्शन न्यायवैद्यक विज्ञान विभाग, अभियोग खाते, आरोग्य खाते, कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक लेबोरेटरी) काम पूर्ण झालेले असून, लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेत सुसज्ज व आधुनिक यंत्रणा असून, त्यामुळे गुन्ह्यांचा छडा लागल्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्याची चौकशी व तपास कसा केला जातो त्याविषयी सामान्य लोकांना माहिती नसते. तपासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या न्यायवैद्यक विज्ञानाविषयीही लोकांना माहिती नसते. ती त्यांना मिळावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार व अन्य अधिकारी हजर होते.