॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ मनःशांतीसाठी जीवनसूत्रं

0
180

– प्रा. रमेश सप्रे

शेवटपर्यंत धीर ढळू द्यायचा नाही. शेवटी, मनःशांती हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय आहे. आतून अनुभवायची असते शांती-समाधान-आनंद. या तीन गोष्टी नाहीत तर एकाच प्रसन्न-तृप्त अनुभवाचे तीन पैलू आहेत. म्हणूनच तुकोबांसारखे संत म्हणतात- ‘मन करा रे प्रसन्न’ नि गीतेत भगवंत म्हणतात मनःप्रसाद!

साधु-संत-महात्मे-सत्पुरुष हे सारे महामानव असतात. मानवतेसाठी त्यागपूर्वक सेवाकार्य त्यांनी केलेलं असतं. यात संतांबरोबरच मानवजातीवर उपकार करणारे प्रतिभावंत, कलावंत, क्रिडापटू, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ यांचाही समावेश होतो. या सर्वांना धन्यकृतार्थ जीवनाची गुरुकिल्ली सापडलेली असते. सर्वांची जीवनं काही मखमली पाकळ्यांवरून चालत नसतात. दगडधोंडे, काटेकुटे, खाचखळगे त्यांच्याही मार्गात असतातच. पण सार्‍या अडचणींचं रुपांतर आव्हानात नि सार्‍या संकटांचं रुपांतर संधीत करून हे सर्वांसाठी आदर्श वाटाडे बनतात. त्यांच्या जीवनकथा किंवा त्यांनी लिहिलेले ग्रंथ, सांगितलेली शांतसंपन्न जीवनाची सूत्रं आजही आपल्याला प्रेरक अन् मार्गदर्शक ठरू शकतात.
पंचतंत्रातल्या गोष्टी सांगून विष्णुशर्मांनी मूर्ख राजपुत्रांना शहाणं बनवलं. इसापानं आपल्याच नव्हे तर सर्व मालक-चालक-पालक मंडळींना पशुपक्ष्यांच्या सामान्य गोष्टी सांगून अंतर्मुख बनवलं नि त्यांची दृष्टी बदलायला मदत केली. बिरबल – तेनाली रमण – मुल्ला नासिरुद्दिन आदींच्या जीवनचातुर्यानं अनेकांचे डोळे उघडले व जीवनाची योग्य दिशा कळायला साह्य केलं.
अनेक रूपककथाकारांनी वरून वरून साध्या वाटणार्‍या गोष्टींतून जीवनातल्या विविध पैलूंवर रुपकं करून समाजमन शहाणं केलं. यात खलील जिब्रानचं नाव अग्रमानाचं आहे. या सार्‍यांचे विचार – भावना – कल्पना – संदेश वाणीतून व्यक्त झाल्याने हीही संतवाणीच आहे. संत या शब्दानं सत्य, नित्य, शाश्‍वत अशी वस्तुस्थिती सुचवली जाते. या सार्‍या विचार तरंगांवर चिंतन करून आपण समाधान, आनंद, मनःशांतीचा अनुभव घेऊ शकतो. आता ही साधी गोष्ट पहा…
कणसं आलेलं पीक शेतात उभं आहे. आताच खरं त्याचं रक्षण करायला हवं धान्यचोर पक्ष्यांकडून. आपण नसताना पक्ष्यांना धाक बसावा म्हणून प्रत्येक शेतात एक बुजगावणं उभारलं जातं. म्हणजे एकप्रकारचं भावलं. डोक्याच्या ठिकाणी मडकं, त्याच्यावर नाकडोळेकान रंगवलेले, आडवी उभी काठी लावून आत गवताचा पेंढा भरून त्याला शर्ट-पँट असे कपडे घालून शेतात उभारलं जातं. अतिशय हलकं असल्यानं वारा वाहील त्याप्रमाणे, त्या दिशेला ते हलत राहतं. पक्ष्यांना तो जिवंत माणूसच वाटतो. ते भिऊन शेतात येत नाहीत. शेत-पीक सुरक्षित राहतं.
एके वर्षी असं बुजगावणं उभारलं गेल्यानं शेतात येऊन पीक फस्त करणार्‍या पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली. याच सुमारास एक पक्षीणी एका नवीनच चिंतेत होती. ती लवकरच अंडी घालणार होती. काळाच्या ओघात त्यातून पिलं बाहेर येणार होती. त्यांना उबवणं गरजेचं होतं. यासाठी तिला हवी होती सुरक्षित जागा. यासाठी ती विचार व निरीक्षण करत होती आजुबाजूच्या परिसराचं. एका क्षणी तिच्या मनात विचार चमकून गेला. तिच्या लक्षात आलं की ते बुजगावणं वारा आल्यावरच हालचाल करतं. एरवी नाही. सारे त्याला उगीचच घाबरतात. ते जिवंत नाहीये. तिनं मग त्या बुजगावण्याच्या डोक्यात म्हणजे मडक्यात गवताच्या काड्या नेऊन घरट्यासारखा सुरक्षित निवारा तयार केला. काळाच्या ओघात तिने अंडी घातली.. त्यातून पिलं बाहेर पडली… त्यांना पंख फुटले… त्यात बळ निर्माण झालं नि एके दिवशी ती पिलं उडून गेलीसुद्धा. मग ती पक्षीणी अगदी शांत शांत झाली.
पक्षिणीच्या शांतीचं कारण तिनं बुजगावण्याच्या मडक्यात घरटं बांधून अंडी घातली हे नव्हतं. तर तिनं त्या बुजगावण्याचं नि वार्‍याचं म्हणजे परिस्थितीचं केलेलं निरीक्षण, त्यावर केलेला विचार नि त्यातून घेतलेला निर्णय हे होतं. एकदम गडबडून गोंधळून जाण्यानं अशांती वाढते. या उलट शांतपणे विचार करून-निर्णय घेऊन-निश्‍चयपूर्वक केलेली कृती ही शांतीची जननी असते. कदाचित निर्णय-कृती चुकेलही पण तरीही त्यामुळे शांती ढळणार नाही.
आता अशाच एका पक्षिणीची गोष्ट. तिनंही शेतात उभारलेल्या बुजगावण्याच्या आधारानं घरटं बांधून अंडी घातली होती. गोड गोंडस गोजिरवाणी पिलं त्यातून बाहेर पडली. पिलांच्या पंखात शक्ती येऊन ती उडू लागल्यावर ती जागा सोडायची असं त्या पक्षिणीनं मनात ठरवलं. कारण तोपर्यंत शेतातलं पीक कापणीसाठी तयार होईल. ते कापून झाल्यावर उभारलेलं बुजगावणं काढून फेकून दिलं जाईल. तोपर्यंत निश्चिंतपणे तिथं राहता येईल, असा सूज्ञ विचार तिनं केला होता.
एक दिवस पिलांसाठी चारा घेऊन घरट्यात परतल्यावर पिलांनी तिला सांगितलं, ‘आई, आज शेतकरी कापणीबद्दल बोलत होता. आपल्याला जायला हवं ना?’ यावर ती शांतपणे म्हणाली, ‘नुसतं बोलतच होता ना? मग राहू या इथं आणखी काही दिवस. नंतर तो शेतकरी सांगत होता, ‘कामगार लावून शेत कापायला हवं.’ पिलांनी हे सांगितल्यावर पक्षिणी आजवरच्या अनुभवानं म्हणाली, ‘कामगारांकडून कापायचं म्हणत होता ना? कामगार येतील तेव्हा पाहू या.’ कामगार आलेच नाहीत. जरा जास्त मजूरी मिळाली तिथं ते गेले. काही दिवस असेच गेले.
एक दिवस पिलांनी त्या शेतकर्‍याला म्हणताना ऐकलं, ‘नातेवाईकांना बोलवून शेताची कापणी करावी.’ ते ऐकूनही ती पक्षिणी शांतच राहिली. नंतर पिलांनी सांगितलं, ‘मित्रांच्या मदतीनं शेत कापू या.’ तरीही पक्षिणीनं ते शेत सोडलं नाही. त्यानंतरही जेव्हा तो शेतकरी शेजार्‍यांच्या साह्यानं शेत कापण्याचा विचार करू लागला तेव्हाही ती शांतच राहिली. पिलांना आश्‍चर्य वाटलं. त्यांनी विचारल्यावर ती म्हणाली, ‘लगेच ही जागा सोडायची गरज नाही. पण आता मात्र लवकरच सोडावी लागेल हे मात्र खरं.’
ज्यावेळी पिलांनी सांगितलं की शेतकर्‍यानं स्वतःच ते शेत कापायचं ठरवलंय तेव्हा मात्र ती पिलांना म्हणाली, ‘चला, आत्ताच आपल्याला निघायला हवं. मी एका दूरच्या झाडावर घरटं बांधून ठेवलंय. तिकडे जाऊन शांतपणे आनंदात राहू या नि ते पक्षी कुटुंब उडून गेले.
या गोष्टीतली माता पक्षिणी प्रथमपासून शेवटपर्यंत शांत आहे. मानव स्वभावाचं तिचं जीवनातल्या आजपर्यंतच्या अनुभवावर आधारित असलेलं निरीक्षण व चिंतन (दर्शन) अचूक आहे. त्यामुळेच ती योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्यानुसार कृती करते. स्वतः धैर्यवान राहून पिलांचं मनोधैर्यही टिकवते. दूरदृष्टी वापरून नवीन आशियाना तयार करते, नंतर स्थलांतर करते. ही संपूर्ण प्रक्रिया हेच तिच्या मनःशांतीचं रहस्य आहे.
आपणही शांत विचार करून, जीवनातील अनुभवाला स्मरून, आपल्या अंतर्मनाचा – आतल्या आवाजाचा – कौल घेऊन जीवन जगत राहिलो तर मनःशांतीची प्राप्ती बिलकुल अवघड नाही, अशक्य तर नाहीच.
तिसरी कथाही पक्षिणीचीच पाहू या. ही आहे एक टिटवी. ज्ञानेश्‍वरही तिच्यापासून महत्त्वाचं जीवनरहस्य शिकलेत. या टिटवीचं घरटं म्हणजे आडोसा किंवा आश्रयस्थान आहे एका समुद्राकाठच्या झुडपात. अंडी त्या घरट्यात आहेत. परत परत येऊन ती अंडी सुरक्षित आहेत ना हे पाहून जाते. बराच वेळ ती घरट्यातच अंड्यांवर बसून असते. ती उबवण्यासाठी. एक दिवस भरतीच्या वेळी एक विशालकाय (प्रचंड) लाट आली नि जाताना घरट्यातली अंडी घेऊन गेली. टिटवीला हे समजल्यावर सर्वप्रथम प्रचंड धक्का बसला. ती सून्न झाली. पण शून्य झाली नाही. अंडी परत मिळवण्याचा निश्चय करून विचार करू लागली. शेवटी तिनं समुद्राची स्तुती करून अंडी परत करण्याची प्रार्थना केली. समुद्र उद्धटपणे म्हणाला, ‘नाही करणार जा. एवढीशी चिमुरडी तू… करून करून काय करशील?’ टिटवीनं मनाशी काहीतरी निर्धार केला नि चोचीत सागराचं पाणी घेऊन जरा दूर नेऊन टाकू लागली. तिनं समुद्र रिकामा करून अंडी परत मिळवण्याचा निर्धार केला व त्या कामाला आरंभ केलासुद्धा.
सागर हसून तिला म्हणाला, ‘मी अपार, अथांग नि तू एवढासा क्षुद्र जीव! तू काय मला रिकामा करणार? बघू या केव्हा हरतेस तू. मी नाही देणार तुझी अंडी परत.’ यावर टिटवी म्हणाली, ‘अंडी माझा जीव की प्राण आहेत. ती मिळाली नाहीत तर मी कुणासाठी जगू? शेवटच्या श्‍वासापर्यंत मी तुला रिकामा करण्याचं हे काम चालूच ठेवणार.’ येणार्‍या जाणार्‍या पक्ष्यांना हे पाहून आश्चर्य वाटलं. टिटवीची दया आली. आपण हिला मदत करायला हवी असं वाटून शेकडों हजारो पक्षी आपापल्या चोची भरून सागर उपसू लागले. हे पाहून प्राण्यांनीही मदत करायला आरंभ केला. शेवटी माणसांनीसुद्धा समुद्राला कालवे पाट खणायला सुरुवात केली. सर्वांचा ‘सागर हटाव’ यज्ञच सुरू झाला. जनमेजयाच्या सर्पसत्रासारखं सर्वांचं ‘सागरसत्र’ चालू झालं. अखेर सागरानं सर्वांना गंभीर आवाजात सांगितलं, ‘तुम्हा सर्वांचा पक्का निर्धार पाहून मी टिटवीची अंडी परत द्यायचं ठरवलंय’… असं म्हणताच एक मोठी लाट आली. तिच्याबरोबर अंडी किनार्‍यावर आली. सर्वांना आनंद झाला. टिटवीनं सर्वांचे आभार मानले. शांतपणे तिनं अंडी चोचीनं उचलून घरट्यात नेली. पाण्यात राहिल्यानं आता ती अधिक उबवायला हवी होती ना?
टिटवीनं जी जिद्द नि धैर्य दाखवलं त्यात तिला लाभलेल्या शांतीचं गुपित होतं. तिनं एकदा सागराला प्रार्थना केली. पण परिस्थितीला शरण जाऊन पुन्हा पुन्हा याचना केली नाही. त्याऐवजी तिनं विचार केला नि प्रयत्न सुरू केला. ‘अंडी परत मिळवीनच’. या आशावादानं ती काम करत राहिली. नाहीतर प्राण गेला तरी चालेल हा निर्धार तिनं केला होता. त्यामुळेच इतर सर्वांना तिला मदत करण्याची प्रेरणा मिळाली व शेवट गोड झाला. वरवर पाहिलं तर या पक्षि-कथा वाटतील. परिकथेसारख्या! पण या रचणार्‍या जीवनाबद्दल महत्त्वाचा संदेश द्यायचा होता. कथेतले पक्षी म्हणूनच बनले प्रतीक मानवाच्या बुद्धीचं- वृत्तीचं- कृतीचं- धैर्याचं नि विचारशीलतेचं. हीच माणसाची वैशिष्ट्य नाहीत का? यामुळेच तर मानव बनलाय सार्‍या सृष्टीचा शिरोमणी. याचा हेतू एकच की जीवनातील कितीही कटू, बिकट असलेल्या प्रसंगांना सामोरं कसं जायचं, सार्‍या समस्यांचं समाधान कसं सोधून काढायचं हे शिकायचं. यामुळेच जीवनात शांती-समाधान-आनंद यांचा अनुभव घेता येतो. काही महत्त्वाची शांतिसूत्रं यावरून लक्षात येतात ती अशी–
* जीवनातली प्रत्येक स्थिती-परिस्थिती गतिमान व परिवर्तनशील असते. ती तशीच असणार हे नीट समजून घेऊन आपली मनस्थिती तयार करणं आवश्यक असतं.
* अनपेक्षितपणे घडलेल्या घटना-प्रसंगात धीर धरून नीट विचार करणं महत्त्वाचं असतं. उगीच भावनावश होऊन एका टोकाची कृती करणं सर्वांना अपायकारक ठरू शकतं.
* परिस्थितीचं काळजीपूर्वक निरीक्षण, परीक्षण करून, सर्व बाजूंनी विचार करून योग्य त्या कार्यपद्धतीची आखणी करून (ही मनात केली तरी चालेल) कार्यवाही केली पाहिजे.
* सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्धार. सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट ठरवल्यावर ती पूर्ण होईपर्यंत चार टप्पे पार पाडायचे असतात. निर्णय-निश्चय-निर्धार-निग्रह.
* यशापयशाचा विचार न करता हाती घेतलेलं काम किंवा कार्य तडीस नेणं हे मनःशांतीच्या दृष्टीनं फार गरजेचं असतं. नाहीतर पावलोपावली जिवाची घालमेल, मनाची अस्वस्थता, प्राणाची व्याकूळता याचाच अनुभव येईल. शेवटपर्यंत धीर ढळू द्यायचा नाही.
शेवटी, मनःशांती हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय आहे. आतून अनुभवायची असते शांती-समाधान-आनंद. या तीन गोष्टी नाहीत तर एकाच प्रसन्न-तृप्त अनुभवाचे तीन पैलू आहेत. म्हणूनच तुकोबांसारखे संत म्हणतात- ‘मन करा रे प्रसन्न |’ नि गीतेत भगवंत म्हणतात मनःप्रसाद!