Home बातम्या अण्णा आज उपोषण सोडणार

अण्णा आज उपोषण सोडणार

0

‘‘हे सभागृह सशक्त व प्रभावी लोकपालसाठी पुढील मुद्द्यांवर तत्त्वतः सहमती दर्शवीत आहे ) सिटिझन्स चार्टर, ) कनिष्ठ नोकरशाहीचा योग्य यंत्रणेद्वारे लोकपालखाली समावेश, ) राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती. तसेच सभागृहाच्या कामकाजाची माहिती स्थायी समितीकडे तिच्या अंतिम अहवालाची पूर्तता करीत असताना विचारार्थ पाठवण्याचा निर्णय घेत आहे’’ असा ठराव लोकसभेत मुखर्जी यांनी वाचून दाखवला. त्यानंतर मतदानाविना कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

अण्णा हजारे यांच्या सहकार्‍यांनी मात्र सरकारने अंतिम क्षणी आपला पवित्रा बदलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेने या विषयावर मतदान घ्यावे, म्हणजे कोणता पक्ष कोणत्या बाजूने आहे हे कळेल असे अण्णांच्या सहकार्‍यांचे म्हणणे होते. मात्र, सरकार मतदान न घेण्याच आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. जोवर सशक्त लोकपालसंदर्भात सर्व राजकीय पक्षांचे संसदेत एकमत होत नाही, तोवर आपले उपोषण मागे घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी दिल्याने सर्वांच्या नजरा काल संसदेत काय होते याकडे लागल्या होत्या. अण्णांच्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी तरी तोडगा निघावा यासाठी संसदेचे कामकाज काल शनिवारीही चालू ठेवण्यात आले.

प्रणव मुखर्जींचे आवाहन

सरकारच्या वतीने अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दुपारी बारा वाजता संसदेत लोकपालबाबतच्या चर्चेचा प्रारंभ केला. गेल्या एप्रिलपासूनच्या घडामोडींचा आढावा घेत अण्णांना अपेक्षित तीन मुद्दे संसदेपुढे ठेवले. लोकपालच्या धर्तीवर सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती, सर्व सरकारी खात्यांमध्ये सिटिझन्स चार्टर उपलब्ध करून कामात कसूर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आणि कनिष्ठ नोकरशाहीलाही लोकपालच्या कार्यकक्षेत आणणे या तीन मुद्द्यांवर विविध पक्षांनी विचार मांडावेत असे आवाहन मुखर्जी यांनी केले. सर्वांची मते ऐकून घेतल्यावर आपण यासंदर्भात सहमती गाठू शकू, असे ते म्हणाले.

घटनात्मक चौकटीत निर्णय घ्या ः प्रणव

अण्णा हजारे यांच्या मागण्यांची व्यावहारिकता, घटनात्मकता आणि अंमलबजावणीची शक्यता या बाबींवरही विचार करावा असे ते म्हणाले. देश या ऐतिहासिक चर्चेकडे डोळे लावून बसलेला असल्याने घटनेच्या चौकटीत वस्तुनिष्ठ निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. लोकपालच्या ४० मुद्द्यांपैकी ३४ वर सहमती झालेली आहे व ६ मुद्द्यांवर मतभेद आहेत असे ते म्हणाले.

भाजपाची तिन्ही मागण्यांशी सहमती

लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात अण्णांच्या मागण्यांचे समर्थन केले. भाजपा त्या मागण्यांशी बहुतांशी सहमत असल्याचे त्यांनी जाहीर केले. संसदेत परवा राहुल गांधी यांना सभापती मीराकुमार यांनी भाषण करू दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शून्य प्रहराला एखादा मुद्दा उपस्थित करता येतो, पण प्रवचन देता येत नाही, असे त्यांनी बजावले. इतिहासाने संसद सभागृहाला हे विधेयक संमत करण्याची संधी दिली आहे, ती तांत्रिक बाबींचा घोळ घातल्याने चुकता कामा नये असे प्रतिपादन त्यांनी केले. चर्चेत सहभागी होताना कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी या चर्चेद्वारे हजारे यांचे उपोषण सुटावे यासाठी सहमती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यसभेत जेटलींचे समर्थन

राज्यसभेत तेथील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी भाजपा अण्णांच्या तिन्ही मागण्यांशी सहमत असल्याचे जाहीर केले. राज्याराज्यांत लोकायुक्त नेमण्याची अण्णांची मागणी मान्य करायला हरकत नाही, असे ते उद्गारताच प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय कायदा राज्यांच्या नोकरशाहीवर आपला हक्क गाजवू शकेल काय, असा सवाल केला. त्यावर जेटली म्हणाले की केंद्रीय कायद्याच्या अनुषंगाने राज्य विधिमंडळांना कायदे संमत करून घेता येतील. राष्ट्रीय सुरक्षेसारखे विषय वगळता पंतप्रधानांना लोकपालच्या कार्यक्षेत्रात आणण्यास भाजपाची हरकत नसल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी तत्त्वतः अण्णांच्या तिन्ही मागण्यांशी आपला पक्ष सहमत असल्याचे सांगितले, परंतु त्यांची अंमलबजावणी घटनात्मक प्रक्रियेद्वारेच झाली पाहिजे, असे ते म्हणाले. नियोजन राज्यमंत्री अश्विनी कुमार यांनी संसदेतील खासदारांचे वर्तन लोकपालखाली आणण्यास हरकत घेतली. रामलीला मैदानावर जे चालले आहे त्याने आपण अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. सभागृहाबाहेरील लोकांच्या दबावापोटी घाईघाईने कायदा करू नये असे त्यांनी बजावले.

टीम अण्णाशी सल्लामसलत

संसदेत विविध पक्षांच्या नेत्यांची भाषणे सुरू असताना दुसरीकडे अण्णा हजारे यांचे सहकारी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याशी सल्लामसलत करीत होते. मात्र, दुपारी सरकार या विषयावर संसदेत मतदान घेण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट होताच अण्णा हजारे यांच्या सहकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशांत भूषण यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार आपल्या भूमिकेपासून मागे हटल्याचा आरोप केला. संसदेत चर्चेनंतर मतदान घेतले तर भाजपा त्याच्या विरोधात मतदान करील असे कॉंग्रेसच्या वतीने आपल्याला सांगण्यात आल्याचे प्रशांत भूषण व केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगताच सरकार आणि अण्णा समर्थक यांच्यात पुन्हा मतभेद उफाळून येतात की काय असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, भाजपाच्या वतीने सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांनी तातडीने आपला पक्ष या विषयावर अण्णांच्या पाठीशी असून आवश्यकता भासल्यास मतदानही करील अशी ग्वाही दिली. भाजपा विरोधात आहे हे खोटे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी कॉंग्रेस व भाजपा नेत्यांसमवेत बैठक घेऊन पेचप्रसंगावर चर्चा केली. शेवटी चर्चेनंतर आवाजी मतदानाने ठराव संमत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अभिनेता आमीर खान अण्णांच्या भेटीस

संसदेत विविध पक्षांच्या सदस्यांचे मतप्रदर्शन सुरू असताना रामलीला मैदानावर अण्णा हजारेंची प्रसिद्ध अभिनेता आमीर खानने दिग्दर्शक राजू हिरानींसमवेत भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. संसदेत चाललेल्या चर्चेवर संपूर्ण देशाची नजर आहे, असे यावेळी केलेल्या भाषणात आमीर खानने सांगितले. यावेळी आमीरने लोकाग्रहास्तव मितवाहे गाणेही गायिले. यावेळी केलेल्या भाषणात आमीरने जनतेने आपापल्या खासदारांवर लक्ष ठेवावे असे आवाहन केले. अण्णांनी आपले उपोषण सोडावे असे आवाहनही त्याने केले. संध्याकाळी उशिरापर्यंत आमीर रामलीला मैदानावरच होता. संध्याकाळी उशिरा तो पुन्हा व्यासपीठावर आला.

भ्रष्ट खासदारांना धडा शिकवा ः अण्णा

विद्यमान खासदारांपैकी जवळजवळ दीडशे खासदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवलेले आहेत, याची आठवण करून देत अण्णा हजारे यांनी जनतेला पुढील वेळी कुचकामी खासदार निवडून न देण्याचे आवाहन रामलीला मैदानावरून सकाळी केले. जनतेच्या या खासदारांकडून खूप अपेक्षा आहेत, परंतु त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही, असे हजारे म्हणाले. सकाळी दहा वाजता मंचावर आल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की भ्रष्टाचारविरोधी सक्षम कायद्यासाठी आपण अंतिम श्वासापर्यंत निषेध नोंदवीत राहू. संसदेपेक्षा ही जनसंसद अधिक महत्त्वाची आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम आदमीचा खासदार हे सेवक आहेत. ते जर काम करणार नसतील तर त्यांना फेकून द्या, असे अण्णा म्हणाले.

संसदेत खासदारांचे अण्णा व प्रसारमाध्यमांवर तोंडसुख

सशक्त लोकपालसंंदर्भात अण्णा हजारे यांनी पुढे केलेल्या तीन मुद्द्यांवरील चर्चेच्या निमित्ताने काल संसदेत अनेक नेत्यांनी अण्णा हजारे यांचे आंदोलन, त्यांना पाठिंबा देणार्‍या संघटना आणि प्रसारमाध्यमांवरही भरपूर तोंडसुख घेतले.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनास प्रसारमाध्यमे, विशेषतः वृत्तवाहिन्या प्रचंड कव्हरेज देत असल्याचा आरोप खासदारांनी केला. ‘इस डिब्बेसे बहुत दिक्कत हैअशा शब्दांत आपली नाराजी जेडीयूचे नेते शरद यादव यांनी व्यक्त केली. अण्णांच्या सहकार्‍यांवरही त्यांनी तोफ डागली. आमच्या (खासदारांच्या) पगड्यांना हात घालू नका असेही त्यांनी बजावले. अण्णा हजारे यांनी शब्द जपून वापरावेत असा इशारा यादव यांनी दिला. किरण बेदी आणि ओम पुरी यांच्या रामलीला मैदानावरील भाषणांनाही त्यांनी हरकत घेतली. ‘‘आम्ही आमच्या जीवनभर रस्त्यावर राहिलो आहोत. तुम्ही आम्हाला काय शिकवणार?’’ असेही ते उद्गारले. ‘‘तुम्ही तुमची भाषा सांभाळा, आम्ही आमची सांभाळू’’ असे त्यांनी यावेळी बजावले.

‘‘हे लोक गोलगप्पे खात होते, कुत्र्यांसह इंडिया गेटवर फिरत होते. नंतर त्यांनी रामलीला मैदानावर जाऊ असे ठरवले’’ अशी टीका यादव यांनी अण्णांच्या बुद्धिवादी सहकार्‍यांना उद्देशून यावेळी केली. यादव यांच्या या शेरेबाजीला खासदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत होता. कॉंग्रेसचे खासदार रोज टीव्ही स्टुडिओंना का भेट देतात, चर्चेत भाग घेतात आणि बंगाली बाबू मोशायकडून स्वतःची छाननी करून घेतात, असा टोला त्यांनी टाइम्स नाऊच्या अर्णब गोस्वामी यांच्या सातत्यपूर्ण वार्तांकनाला उद्देशून हाणला. हा देश टीव्ही वाहिन्यांवरील चर्चांमुळे चालत नाही, तर तो संसदेमुळे चालतो असेही यादव यांनी बजावले. २४ तास वृत्तवाहिन्या आम्हाला झोपू देत नाहीत अशी तक्रार त्यांनी केली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनीही संसदेच्या स्थायी समितीला डावलून लोकपालबाबत संसदेत चर्चा सुरू केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नंतर चर्चेत भाग घेताना त्यांनी हजारे यांच्या चळवळीवर जोरदार टीका केली. ‘‘अण्णांना चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही अण्णांचा आदर करतो, परंतु ते सातत्याने आम्हाला अपमानीत करीत आले आहेत’’ अशी तक्रार लालूप्रसाद यांनी केली. या आंदोलनास स्वयंसेवी संस्थांनी पाठिंबा दिल्यानेच ते देशभरात पसरले आहे. त्यांनी पाठिंबा देणे थांबवले तर आंदोलन थंड पडेल असेही लालू म्हणाले. लोकपालच्या कार्यकक्षेत स्वयंसेवी संस्थांचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. माजी खासदार व न्यायपालिकेला लोकपालच्या कार्यकक्षेबाहेर ठेवले गेले पाहिजे, असे ते म्हणाले. बसप नेते दारासिंग चौहान यांनीही आपल्या भाषणात टीव्ही वाहिन्या टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी खूप काही करीत असल्याचे सांगितले. समाजवादी पक्षाचे नेते रेवतीरमणसिंग यांनी इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांनाही लोकपालखाली आणावे अशी मागणी केली. द्रमुक सदस्य टीकेएस एलनगोवन यांनीही प्रसारमाध्यमांवर सडकून टीका केली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनास माध्यमांनी संसद व घटनाविरोधी स्वरूप दिल्याचा ठपका त्यांनी ठेवला. लोकशाहीत न्याय जनता करील, माध्यमे नव्हेत, असेही ते म्हणाले.

लाच मागणार्‍यांस गांधीटोपी द्या

या आंदोलनानंतर आपण आपापल्या घरी परताल, तेव्हा काय सोबत घेऊन जाल असे उपस्थित विशाल जनसमूहाला विचारीत अण्णा हजारे यांच्या सहकारी किरण बेदी यांनी अण्णांच्या समर्थनार्थ आपण डोक्यावर चढवलेली गांधी टोपी यापुढेही सतत सोबत बाळगा असे आवाहन केले. कोणी लाच मागितली, तर आपल्याजवळची गांधी टोपी त्याला द्या. आपली गांधी टोपी लाचखोरांना, भ्रष्टाचार्‍यांना या विराट आंदोलनाची आठवण करून देईल आणि जरब बसवील, असे श्रीमती बेदी म्हणाल्या.

खरे हीरोतर अण्णाच!

आपण केवळ चित्रपटातील हीरो आहोत. खरे हीरोअण्णाच आहेत, असे उद्गार अभिनेता आमीर खान याने काल रामलीला मैदानावर अण्णांची भेट घेतल्यानंतर काढले. आपला या आंदोलनास पूर्ण पाठिंबा असल्याचे त्याने जाहीर केले. ‘गरज भासल्यास संपूर्ण बॉलिवूडला आपण आमच्या पाठीशी उभे कराल काय?’ असे यावेळी किरण बेदी यांनी विचारले असता, या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा या आंदोलनास मनातून पाठिंबा आहे, असे आमीर उत्तरला.