अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा ‘एनएसए’पदी नियुक्ती

0
9

गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी (एनएसए) नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. प्रमोद कुमार मिश्रा हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रधान सचिवपदी कायम राहतील. दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय अमित खरे आणि तरुण कपूर पुढील आदेशापर्यंत पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून राहतील.

भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, अजित डोवाल यांना 10 जूनपासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर असेपर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. याशिवाय प्रमोद कुमार मिश्रा यांना पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे अजित डोवाल हे देशातील पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी 2014 आणि 2019 साली त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अजित डोवाल हे 1968 च्या आयपीएस केडरचे अधिकारी होते. सैन्याकडून देण्यात येणाऱ्या कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. 2005 साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले. अजित डोवाल यांचे गुप्तचर यंत्रणेमधील काम वाखाणण्याजोगे होते. 1999 साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी 814 विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

प्रमोद कुमार मिश्रा हे 1972 च्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. ते भारत सरकारच्या कृषी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. डॉ. मिश्रा आणि अजित डोवाल हे दोघेही पंतप्रधान मोदींच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी मानले जातात. कारण ते दोघेही 2014 मध्ये पंतप्रधान होण्याआधीपासून त्यांच्याशी संबंधित आहेत.