अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
146

>> २००० किमीपर्यंत मारक क्षमता; पाकिस्तान, चीनची शहरे क्षेपणास्त्राच्या टप्प्यात

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील अत्याधुनिक ‘अग्नी प्राईम’ या मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १००० ते २००० किमीपर्यंतची आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनची अनेक महत्वाची शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहेत.

ओडिशा राज्यातील बलासोर येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम आयलँडवरून सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ही चाचणी करण्यात आली. अग्नी प्राईम हे कॅनिस्टर बेस क्षेपणास्त्र असून, ते शत्रूच्या रडार यंत्रणा तसेच उपग्रहांना चकवा देऊन ट्रक, रेल्वे यासारख्या प्रक्षेपक यंत्रणेवरून डागता येऊ शकते. २ स्टेज अग्नी प्राईम क्षेपणास्त्राचा रोड आणि मोबाईल लॉंचर दोन्हीमधून वापर करता येऊ शकतो. ४००० किलोमीटरच्या पल्ल्याच्या अग्नी ४ आणि अग्नी ५ क्षेपणास्त्रातील तंत्रज्ञान एकत्र करुन हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
१९८९ मध्ये शास्त्रज्ञ तसेच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्नी प्रकारातील अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार्‍या स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला सुरवात केली होती. त्यानुसार अग्नी प्रकारातील अग्नी १ ते ५ ही क्षेपणास्त्र विकसित करण्यात आली आहेत.

अग्नी १ हे क्षेपणास्त्र विकसित करून बराच अवधी लोटला होता. त्यामुळे या क्षेपणास्त्राच्या आधुनिकीकरणाची गरज डीआरडीओ तसेच भारतीय सैन्य दलाने व्यक्त केली होती. त्यानुसार अग्नी प्राईम या नव्या क्षेपणास्त्राच्या विकासाचा कार्यक्रम डीआरडीओने हाती घेतला होता.

अग्नी १ ची जागा घेईल ‘अग्नी प्राईम’
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अग्नी प्राईम हे कमी वजनाचे क्षेपणास्त्र आहे. पूर्वीच्या क्षेपणास्त्रांपेक्षा त्याची लांब पल्ला गाठण्याची क्षमता अधिक आहे. भारताने १९८९ मध्ये मध्यम श्रेणीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी १ ची सर्वप्रथम चाचणी केली होती. अग्नी १ ची जागा आता अग्नी प्राईम घेईल. अग्नि क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील पाच क्षेपणास्त्रे भारताने यशस्वीपणे विकसित केली आहेत. सध्या ‘अग्नी ६’ हे १० हजार किमीपर्यंतची मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र विकास प्रक्रियेत आहे.