अखेर ‘लकी सेव्हन’ बाहेर काढण्यात यश

0
279

>> ८० दिवसांनी यश

>> जहाज वेरे-बेती येथे हलविले

>> जयगड रत्नागिरी येथे दुरूस्तीसाठी नेणार

मिरामार किनार्‍यावर रूतलेले एम. व्ही. लकी सेव्हन कॅसिनो जहाज अखेर काल गुरूवारी ८० दिवसांनी बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले आहे. हे रूतलेले कॅसिनो जहाज गुरूवारी सकाळी बाहेर काढून मांडवी नदीच्या पात्रात वेरे – बेती येथे उभे करून ठेवण्यात आले आहे.

मांडवी नदीच्या पात्रात या कॅसिनो जहाजाचे सर्वेक्षण करून तात्पुरती दुरूस्ती करून जयगड रत्नागिरी येथे दुरूस्तीसाठी नेण्यात येणार आहे. हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांच्या गोल्डन ग्लोब हॉटेल्सचे एम. व्ही. लकी सेव्हन कॅसिनो जहाज मांडवी नदीत आणताना १६ जुलै २०१७ रोजी मिरामार येथे किनार्‍यावर रुतले होते.

कॅसिनो जहाज बाहेर काढण्याचे काम केले जात होते. रूतलेले कॅसिनो जहाज ५ ते ९ ऑक्टोबर या काळात हटविण्यात येईल, अशी माहिती कॅसिनो जहाज मालकाच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दि.२७ सप्टेंबरला दिली होती. मिरामार समुद्र किनार्‍यावर कॅसिनो जहाज रूतल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कॅसिनो मालकाला नोटीस बजावली होती. पर्यावरणाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी एक कोटी रूपयांची अनामत रक्कम भरण्याचा आदेश दिला होता. इजिप्त येथील व्हीएमएस मरीन कंपनीने हे रूतलेले जहाज बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालविला होता. मिरामार किनार्‍यावर रूतलेल्या कॅसिनो जहाजाला भगदाड पडल्याने जहाजात पाणी घुसले होते. या भगदाडाची तात्पुरती दुरूस्ती केल्यानंतर ५४ दिवसांनी रूतलेले कॅसिनो जहाज समुद्रात तरंगविण्यात यश प्राप्त झाले होते. त्यानंतर ३०० मीटर जहाज समुद्रात ओढण्यात यश प्राप्त झाले होते. परंतु, समुद्र खवळलेला असल्यामुळे कॅसिनो जहाज पुन्हा मिरामार समुद्र किनार्‍यावर आले होते.