अंतरंग ‘इफ्फी’चे

0
191

– मनस्विनी प्रभुणे-नायक

आजपासून सुरू झालेल्या ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या देशांचे, कोणत्या दिग्दर्शकांचे चित्रपट बघायला मिळतील. यावर्षीच्या महोत्सवाचे वेगळेपण काय आहे? आंतरराष्ट्रीय ते देशी चित्रपट या सार्‍यांचा घेतलेला हा आढावा…

तमाम चित्रपट रसिक मंडळी ज्याची आतुरतेनं वाट बघत असतात तो भारताचा ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (इफ्फी) आजपासून सुरू होतोय. उद्यापासून आयनॉक्स, कला अकादमी आणि मॅनिझ ब्रागेंझा या तीनही इमारतींचा आवार सिनेरसिकांच्या लगबगीने ङ्गुलून जाणार. या काळात प्रत्येकाच्या ओठावर ङ्गक्त आणि ङ्गक्त चित्रपटविषयक चर्चा ऐकायला मिळते. पुढचे आठ-दहा दिवस इथे आलेला प्रत्येकजण चित्रपटाच्या दुनियेत हरवून जातो. उठता- बसता- जागेपणी आणि झोपेतही ङ्गक्त चित्रपटच असतो. एक प्रकारची झिंग या वातावरणात नक्कीच असते. चित्रपट अभ्यासक- रसिक यांच्यासाठी हा महोत्सव म्हणजे ‘पंढरी’ असते. वारकर्‍यांप्रमाणे दरवर्षी न चुकता ही ‘चित्रवारी’ करणारे अनेक चेहरे इथे ओळखीचे बनून जातात.
एक काळ असा होता की गोव्यात ङ्गक्त चित्रपटाचे चित्रीकरण व्हायचे. पण तो काळ आता गेला. गोव्यानेदेखील कात टाकलीय. गेल्या काही वर्षांत भारताचा ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (इफ्फी) गोव्यात स्थिर झालाय. नुसताच स्थिर झाला नसून गोव्यातील चित्रपटविषयक गतिविधींना काही प्रमाणात चालना मिळू लागलीय. आणि असे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघण्यासाठी जो एक प्रेक्षकवर्ग लागतो तो इथे तयार होऊ लागलाय. एका वेगळ्या पातळीवरच्या जागतिक चित्रपटाचा परिचय या महोत्सवातून होत असतो. गोव्यातल्या अगदी पहिल्या इफ्फीबद्दल आठवतंय. इथे आलेला स्थानिक प्रेक्षकवर्ग महोत्सवातील चित्रपट बघून थोडा भांबावला होता. ‘अरे बापरे.. हे कसले चित्रपट!! आणि असल्या चित्रपटांसाठी एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन?’ असा काहीसा अनेकांचा सूर होता. पण आता खूपच बदल जाणवतोय. कॅटलॉग घेऊन कोणते चित्रपट बघायचे याचे प्लॅनिंग करणारे अनेकजण आहेत. महोत्सवाचा एक सकारात्मक भाव इथल्या सामान्य प्रेक्षकांमध्ये दिसू लागलाय.
‘इफ्फी’चे अंतरंग
कॅटलॉग हातात पडताच पहिली उत्सुकता असते ती दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांविषयी जाणून घेण्याची. यावर्षी महोत्सवाचे दिवस कमी झाले आहेत त्यामुळे अनेकांना काळजी वाटत होती ती चित्रपटांची संख्या तर कमी झाली नाही ना? याची. दाखवण्यात येणार्‍या चित्रपटांची संख्या कमी झाली नसून ती नेहमीसारखीच आहे. यावर्षी २३४ आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय १३ आंतरराष्ट्रीय आणि २१ भारतीय लघुपटांचा समावेश आहे. आठ दिवसांत २३४ चित्रपट आणि ३४ लघुपट बघायला मिळणं म्हणजे पर्वणीच असते. अर्थात यातले सर्व चित्रपट बघायला मिळत नाही. पण महोत्सवाच्या निमित्ताने या चित्रपटांची ओळख होते. काही रसिक-अभ्यासक मंडळी या इफ्फीमध्ये जे चित्रपट बघायला मिळत नाहीत ते चित्रपट देशभरात होणार्‍या अन्य चित्रपट महोत्सवांत बघतात. गेल्या वर्षीच्या इफ्फीमध्ये ‘टॅक्सी’ नावाच्या इराणी सिनेमाची खूप चर्चा होती. त्याचे २ शो झाले पण दोन्ही वेळेस तिकीट मिळू शकली नाही असे अनेकजण होते. हाच चित्रपट मुंबई चित्रपट महोत्सवात होता त्यावेळेस मात्र लक्षात ठेवून अनेकांनी बघितला. इफ्फीमध्ये अनेक दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होतो आणि नंतर इथूनच देशभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांना यातले काही चित्रपट पाठवले जातात. रशिया, जर्मन, चीन, जपान, पोलंड, पोर्तुगाल, तैवान, नॉर्वे, इस्त्राईल, सौदी अरब, ङ्ग्रान्स, द. कोरिया, इराण, कॅनडा, नायजेरिया, इटली या देशांमधून आलेले चित्रपट बघायला मिळणार आहे.
उद्घाटनाचा आणि समारोपाचा चित्रपट
पोलिश चित्रपटांमधील महत्त्वाचे नाव म्हणजे आंद्रे वाजदा. नुकतेच त्यांचे निधन झाले. वाजदा यांना पोलिश ङ्गिल्म स्कूलचे जनक असंही म्हटलं जातं. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या वाजदा यांच्या ‘अफ्टर इमेज’ या ऑस्कर पारितोषिक विजेत्या चित्रपटाला उद्घाटनाचा चित्रपट म्हणून मान मिळाला आहे. हा चित्रपट उद्घाटनाला दाखवणे म्हणजे वाजदा यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल. ‘अफ्टर इमेज’ हा सिनेमा हा चित्रकाराच्या भावविश्वावर आधारित आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत अडकलेला चित्रकार आणि त्याची अभिव्यक्ती, त्याचं जग यातून दिसतं. छायाचित्रणातून दिसणारं जग आणि वास्तव असा बंध या चित्रपटाद्वारे वाजदा यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वाजदा यांचे चित्रपट महोत्सवात बघायला मिळतील. उद्घाटनाच्या चित्रपटाइतकीच उत्सुकता समारोपाच्या चित्रपटाची असते. यावर्षी ‘द एज ऑङ्ग शॅडोज’ या कोरियन चित्रपटाने समारोप होणार आहे. ऍक्शन, थ्रिलर, रहस्य या सर्व उत्कंठा वाढवणार्‍या गोष्टींनी भरलेल्या अशा एका वेगळ्याच चित्रपटाने समारोप होणार. किम जी वोन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दोन्ही चित्रपट एकदम वेगळ्या पठडीतले आहेत.
इंडियन पॅनोरमा
भारतीय बहुभाषिक चित्रपटांना बघण्याची पर्वणी महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये मिळते. देशभरातील, वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांना बघायला मिळते. यावर्षीच्या इंडियन पॅनोरमाची सुरुवात ‘इष्टी’ नावाच्या संस्कृत चित्रपटाने होणार आहे. अवश्य बघावा अशा या चित्रपटाचे दिग्दर्शन जी. प्रभा यांनी केले आहे. केरळमधील नंबुद्री ब्राह्मण समाज आणि त्यातील पुरुषांचे वर्चस्व, त्याला महिलांनी आपल्या अधिकारासाठी दिलेला लढा यावर चित्रित सिनेमा केरळमधील समाजजीवनाचे जवळून दर्शन घडवतो. गेल्यावर्षीदेखील संस्कृत सिनेमाने इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन झाले होते आणि त्याची बरीच चर्चादेखील झाली होती. संस्कृत भाषेतील चित्रपटानेच सुरुवात कशाला? अनेकांनी नाकंदेखील मुरडली होती. परिणामी गेल्यावर्षीच्या संस्कृत सिनेमाला तेवढा परीक्षकवर्ग लाभला नव्हता. पण या वादात ना पडता या ‘इष्टी’ सिनेमा केरळचे समाजजीवन जाणून घेण्यासाठी अवश्य बघावा. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोठे नावाजलेले पटकथा लेखक आहेत. अनेक ङ्गिल्म इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना ते चित्रपटविषयक शिकवतात. बंगाली, मराठी, कोकणी, मणिपुरी, कन्नड, मल्याळम, असामी, गुजराथी, खासी अशा अनेक भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमामध्ये झाली आहे. बंगाली चित्रपटांचे या महोत्सवावर वर्चस्व असतं. पण या वेळेस तुलनेने बंगाली चित्रपटांची संख्या बरीच कमी आहे. शिवाय मराठी आणि कोकणी चित्रपटदेखील नावाला आहेत. गेल्यावर्षी ‘नाचूया कुंपासार’ या कोकणी चित्रपटाने इंडियन पॅनोरमावर आपली छाप सोडली होती. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या वर्षी ‘के सरा सरा’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. कोकणी चित्रपटाची दखल महोत्सवात अनेक मान्यवरांनी घेतल्याचे गेल्यावर्षीच्या उदाहरणावरून दिसून येते. चांगले चित्रपट तयार झाले तर त्याला प्रेक्षकही डोक्यावर घेतात. कोकणी चित्रपटांची संख्या वाढली पाहिजे पण दर्जेदार कोकणी चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी.
अब्बास किरोसामी यांना श्रद्धांजली
नुकतेच काही महिन्यांपूर्वी ज्यांचे निधन झाले त्या प्रसिद्ध पर्शिअन दिग्दर्शक अब्बास किरोसामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे निवडक सात चित्रपट म्हणजे सिनेरसिकांसाठी खास आकर्षण असेल. ‘लाईक समवन इन लव्ह’, ‘द विंड विल कॅरी अस’, ’शिरीन’, ‘टेक मी होम’, ‘टेस्ट ऑङ्ग चेरी’, आणि ‘टेन’ या किरोसामी यांच्या काही मोजक्या चित्रपटांना बघायला मिळणार आहे. किरोसॅमी इराणी आणि पर्शियन सिनेमा चळवळीतील महत्त्वाचं नाव. त्यांनी चित्रपटांबरोबर लघुपटदेखील बनवले. वास्तववादीशैली त्यांच्या चित्रपटांमधून बघायला मिळते. चित्रपटातील दृष्यं खूप बोलकी, वास्तवाला जवळ जाणारी असतात. इराणी सिनेमातील ‘नवप्रवाहातील’ दिग्दर्शक म्हणून त्यांचं कायम नाव घेतलं जातं. त्यांचे चित्रपट इराणी समाजजीवन, इराणी संस्कृतीवर भाष्य करणारे असतात. किरोसामी यांना ङ्गक्त चित्रपट दिगदर्शक म्हणून ओळखले जात नव्हते तर ते एक नावाजलेले कवी होते. त्यांच्या अनेक कवितांचे संकलन करून त्याचे कवितासंग्रहदेखील प्रसिद्ध झाले आहेत. ‘वॉकिंग विथ द विंड’ या त्यांच्या कवितासंग्रहातील अनेक कविता प्रसिद्ध आहेत. शिवाय ते चांगले चित्रकार आणि छायाचित्रकार होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या सार्‍या गुणांची झलक त्यांच्या चित्रपटांच्या मांडणीमधून दिसून येते. किरोसामी यांचे चित्रपट बघणे हा एक वेगळा अनुभव असेल.
शाजी करुण यांच्या चित्रपटांची विशेष दखल
केरळचे प्रसिद्ध दिग्दर्शक शाजी करुण यांच्या चित्रपटांची या वर्षीच्या महोत्सवात विशेष दाखल घेण्यात आली आहे. त्यांच्या पाच चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या ‘पिरवी’ या पहिल्याच चित्रपटाला कान ङ्गिल्म ङ्गेस्टिव्हलमध्ये पारितोषक मिळालं होतं. केरळमधील समाजजीवन, सामाजिक समस्या यांचे दर्शन त्यांच्या चित्रपटांमधून घडतं. ‘वानप्रस्थ’, ‘स्वाहम’, ‘कुट्टी शृंक’, ‘थिम्पू’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांनी बनवलेल्या ‘डान्सिंस ऑङ्ग द पिकॉक’ ही ३० सेकंदाची छोटीशी ङ्गिल्म महोत्सवातील प्रत्येक चित्रपटाच्या आधी दाखवण्यात येईल. इफ्फीचे प्रतीक चिन्ह मोर आहे. त्याची वेगळी प्रतिमा त्यांच्या या छोट्याशा ङ्गिल्ममध्ये बघायला मिळेल.
याशिवाय महत्त्वाचे
दरवर्षी दादासाहेब ङ्गाळके पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश इङ्गङ्गीमध्ये केला जातो. या वर्षी मनोजकुमार यांचे पाच चित्रपट बघायला मिळणार आहेत. ‘वुमन्स कट’ या विभागांतर्गत महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट आहेत. यात चार वेगवेगळ्या धाटणीच्या महिला दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल. रेणू सलुजा, अंजली शौकिया, रिना मोहन, सविता सिंग या चारजणी चित्रपटात आहेत. दरवर्षीप्रमाणे चित्रपट अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी मास्टर क्लास आणि चित्रपटविषयक विविध कार्यशाळांचे आयोजन केले गेले आहे. लघुपट निर्मितीपासून दिग्दर्शनापर्यंत अनेक विषय आहेत. देशभरातील वेगवेगळ्या ङ्गिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या लघुपटांना या महोत्सवात स्थान मिळणं आणि या विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळणं हादेखील या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे.
सर्व रसिकांचा विचार करून महोत्सवाचं नियोजन करण्यात आलंय. जे या महोत्सवाचा भाग बानू शकत नाही त्यांच्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रिय हिंदी-मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या आठ दिवसांमध्ये मोठा खजिनाच प्रेक्षकांच्या हाती लागणार आहे. आपली ओंजळ किती आणि कशी भरून घ्यायची हे ज्याचं त्यानं ठरवावं. वर्षातील आठ दिवस ङ्गक्त आणि ङ्गक्त सिनेमा यासारखा वेगळा अनुभव नाही!