सोबत

0
109

– सौ. पौर्णिमा केरकर

वीणाच्या सोबतीनेच मी कसईनाथाला त्याच्या विविध रूपांत न्याहाळलं. खोलपेवाडीच्या कुटुंबासारखाच तो मला माझा वाटला. आजही मला त्याला पाहिले की त्यात मला माझ्या माणसांचा चेहरा दिसतो. माझ्या तरुण वयातील कोवळ्या, हळव्या हुंकारांची सोबत दिसते. आणि पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक माझं मन घेतं….

माणसाला जगण्यासाठी, तेही आनंदात जगण्यासाठी सोबत हवी असते. अर्थात या सोबतीमुळेच असंख्य अनर्थकारी प्रसंगसुद्धा त्याच्या आयुष्यात येतात. असे असले तरीसुद्धा जगणे सुसह्य करण्यासाठी माणसांची सोबत तनामनाला उभारी देणारी ठरते. तसा माणूस हा नेहमी अंतर्यामी तरी एकटाच असतो. म्हणूनही कदाचित त्याला सोबत कोणीतरी असावं याची असोशी असते. त्यामुळेच मनातील भावना, संवेदना, स्पंदने एकमेकांना कळतील, आयुष्यातील आकांत-आक्रोश उमगत जाईल, जगणे नव्याने समजत जाईल, अनुभवांना भिडतानासुद्धा मग आपल्यालाच आपण कळत जाऊ म्हणूनही या सोबतीची नितांत गरज असते. जे दुःख कधीतरी संपणारे असते तेच दुःख माणूस पचवू शकतो. कारण त्यानंतर येणार्‍या सुखाची अपेक्षा त्यामागे लपलेली असते. आठवणींच्या माध्यमातून मात्र हे दुःख गडद होत गेले तरी त्यातील हळवेपणा एक सजीवपणा बहाल करतो. जीवनाच्या या प्रवासात आपण आपल्या सहवासात येणार्‍या माणसांनाच फक्त आठवणीत ठेवतो अशातला भाग नाही तर त्याच्या जोडीने येणारे प्राणी-पक्षी, डोंगर-दर्‍या, नदी-नाले असे कितीतरी घटक आपल्या आठवणींच्या कप्प्यात असतात. यासाठी आपला आपणच आखून घेतलेला चौकोन ओलांडणे गरजेचे आहे. ही चौकट ओलांडल्याशिवाय जगण्याचा अर्थ उमगत नाही. जीवनाचा विशाल परिघसुद्धा समजत नाही. अनुभवाचे गाठोडे घेऊन वाटचाल केली की नजर बदलते, आकार बदलतात, मन विशाल बनत जाते… त्यातील हृदयस्पंदने मग स्वतःशीच संवाद साधत राहतात.
जीवनप्रवासात अशा खूपच माणसांच्या निसर्गाच्या आठवणी दडलेल्या आहेत. काहीकाही तर माणसांच्या सहवासातून निसर्ग अनुभवल्याचा आनंदही तेवढाच उत्कट आणि चिरतरुण आहे. निसर्गच आपल्या वाढत्या वयाबरोबरीने निरनिराळ्या नजरा बहाल करत राहतो. कसईनाथ डोंगराच्या बाबतीतही मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे. उत्तुंग हिमशिखरे प्रवासात डोळे भरून पाहिलीत, सातपुड्याच्या, सह्याद्रीच्या पर्वतशृंखलांनी उत्कट-सुखद सौंदर्यमयी संवेदना बहाल केल्या, त्यामुळे या उंच पर्वतरांगा आणि खोल खोल नजरही पोहोचणार नाही अशा दर्‍यांच्या ठावठिकाणांचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. असे असूनही कसईनाथाविषयीची आंतरिक ओढ मात्र मनाला कायमच अस्वस्थ करत राहते. डोंगराचा एक बारीकसा तुकडा कोणीतरी तोडला असावा आणि मध्येच आणून बसवला असावा. त्याचा आकारसुद्धा वेगळाच. पटकन नजरेत भरणारा. पाहताक्षणीच मनात प्रश्‍न निर्माण होतो, याला डोंगर म्हणावे का? आणि हा डोंगर असा कसा इतर डोंगररांगांपासून अलिप्त, एकाएकी…. एकामधून दुसरी अशी रांग खरे तर असावी, पण येथे मात्र असं अजिबातच नाही. रामायण- महाभारताशी संलग्नित काही कथा- दंतकथाही लोकमानसांच्या श्रद्धेतून निर्माण झालेल्या या परिसरातील जुन्या-जाणत्यांच्या तोंडून ऐकू येतात. या डोंगराच्या अलिप्तपणाचेच एक गुपीत असावे जे अजून कुणालाच उकलले नसावे. भूगर्भशास्त्रज्ञांनासुद्धा त्याच्या निर्मितीविषयी नेहमीच गूढ वाटत आलेले आहे. परंतु सर्वसामान्यांनी मात्र आपल्या परीने याचा वेध घेतलेलाच आहे. राम-लक्ष्मण जेव्हा लढाईत मूर्च्छित पडले तेव्हा त्याना भानावर आणण्यासाठी संजीवनी वनस्पती- जी द्रोणगिरी पर्वतावर उपलब्ध होती ती- आणणे महत्त्वाचे होते. अर्थातच ही कामगिरी हनुमानावर सोपविण्यात आली. द्रोणगिरीवर हनुमान गेला खरा, पण त्याला नेमकी वनस्पती मात्र शोधता आली नाही. त्यामुळे तो संपूर्ण पर्वतच तळहातावर झेलून त्याने उड्डाण केले. या प्रवासात या पर्वताचा एक छोटा तुकडा खाली पडला व त्यातूनच रुजून आला तो कसईनाथ! महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील आंबेली गावातून कसईनाथावर चढता येते. या डोंगराचा बराचसा भाग कसई गावात येतो आणि पिकुळे गावाशीसुद्धा तो जोडला गेला आहे. इथल्या प्रत्येकाच्याच अंतःकरणात कसईनाथाविषयीची भाबडी श्रद्धा वर्षानुवर्षे टिकून आहे.
विजनवासात असताना पांडवांना भावलेला हा डोंगर. चढणीच्या प्रवासात मौसमात दुथडी भरून वाहणारा धबधबा, माथ्यावर शंकराचे स्थान असल्याची मनोभावना. जरासे खाली उतरल्यावर पांडवांच्या जेवणाची तयारी करताना वाळण लावण्याच्या दगडी खुणा. एका रात्रीत- एका वातीत विजनवासात असताना पांडव कृती करायचे. काही एक वास्तू वगैरे बांधताना सूर्याची किरणे दिसली की ते तेथून दुसर्‍या प्रवासाला निघायचे. त्यामुळेच त्यांनी केलेली, अपुरी राहिलेली खूप कामे… त्याच्या खुणा जागोजागी आढळतात. अशा खुणांना लोकमानसानी मग स्वतःच्या परीने अर्थ लावून ठेवलेलाच आहे. ‘पांडवांच्यो व्होवर्‍यो’, ‘पांडवांची विहीर’ आणि येथे तर पांडवांची ‘वाळण.’ ज्या व्यक्तीनी, वास्तूनी, स्थळांनी आपल्याला ओढ लावलेली असते त्याच्याविषयीची उत्कटता मनातळाला वेढून राहिलेलीच असते. कसईनाथाच्याबाबतीत माझंही मन काहीसं असंच म्हणत असतं.
आपण कधीतरी एकदा शांत बसावं. आपल्या वाढत्या वयानुसार काय काय गोष्टी घडल्या, त्यातील कोणत्या आत्मसात केल्या, कोणत्या सोडल्या याचा मनातल्या मनात शोध घेतला तर असे पुष्कळच क्षण आपल्या सभोवताली रुंजी घालतील. माझं बालपण आता मी विसरत आहे. माझ्या मुलीला मायेने कुशीत घेताना मला जाणवतं की माझ्या आईने माझ्यासाठी दिलेली कुशीची ऊब…. तिच्यासाठी मी आता दुरावले आहे ही खंत मला सतावते. लगोरी, जिवल्यांचा, लंगडी, हुतुतू, दगडगोटे. यांसारख्या खेळांनी माझे बालपण सजीवंत केलेले होते. हे सारेच अविस्मरणीय क्षण. आज यांपासून मी खूप दूर दूर चालले आहे. पानांच्या चिकातून फुंक मारून तयार केलेले इंद्रधनुष्यी ‘बोमाडे’… ते गोलाकार मोठ्ठाले टुपटुपीत गोल, पारदर्शी… त्यांतील रंगांचे विभ्रम… ते तर हवेतच फुटून गेलेत. उडणार्‍या म्हातारीच्या मागे धावायला लावणारे ते क्षण मला सृजनशील बनवायचे. आणखीही असेच कितीतरी क्षण निसटून गेलेत जीवनप्रवासातून. खूप विचार केला की थकवा येतो… खूप वर्षे मागे जावे असेच वाटते. पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ आठवतो… माझी आणि कसईनाथाची भेट डोळ्यांसमोर येते आणि मग नात्यांच्या गुंतवळीतील भावना-विचारांची तीव्रता त्या क्षणांचा मागोवा घेत राहते. वीणा- माझी मैत्री- याला साक्षीदार असते.
ते वयच तरुण स्पंदनांचे. खोलपेवाडी- साळ येथील त्यावेळी एखाद-दुसरं घर वगळता निर्मनुष्य असलेल्या विस्तीर्ण माळरानावर असलेल्या या घरात मी, वीणा आणि आई यांचाच मुक्काम जास्त. बाबा, लिना, नवीन, नीलेशचा शनिवार-रविवारचा मुक्काम. मनोरंजनाचे इतर साधनच नसल्याने संवादच जास्त व्हायचा. सकाळी उठल्या उठल्या दर्शन व्हायचे ते कसईनाथाचे. सूर्याची कोवळी किरणे त्या गडद हिरवा रंग ल्यालेल्या पार्श्‍वभूमीवर पडायची आणि एक वेगळी तकाकी त्या परिसराला यायची. त्याचे दर्शन कोठूनही घेतले तरी तो तेवढाच विलोभनीय वाटत राहतो. खोलपेवाडीहून साळला जाणार्‍या रस्त्याला एक मोठ्ठं वळण लागतं. ते संपल्यावर जराशी उंच टेकडी. तिन्हीसांजेला उतरत्या सूर्याला साक्षी ठेवून वीणा आणि मी तासन्‌तास तिथे जाऊन बसायचो. आम्हा दोघींच्या असंख्य गुजगोष्टी त्या टेकडीवर वाहणार्‍या वार्‍याने कसईनाथापर्यंत पोहोचवल्या असाव्यात असं मला आतून वाटत आहे. या आठवणीतून वर्तमानकाळातील वास्तव सुसह्य होत राहते. वाढणार्‍या वयाची चिंता सतावत नाही. कसईनाथ मला जवळचा वाटतो तो याच कारणासाठी.
कामाच्या निमित्ताने माझं रक्ताचं कुटुंब सोडून मी दूर राहायला आले… वीणा माझी मैत्रीण होती, पण तिचे कुटुंब माझा स्वीकार करेल का? ही शंका कुठेतरी किंचित होतीच. पण या कसईनाथाच्या साक्षीनेच मला माझं कुटुंब वीणाच्या कुटुंबातच दिसलं. या कुटुंबाने मला नुसतेच सामावून घेतले नाही तर आपल्या जगण्याच्या प्रत्येक प्रसंगात समरस करून घेतलं. कामावरून घरी येईपर्यंत दुपारच्या जेवणासाठी थांबणारी निरागस मोकळ्या मनाची आई, जिने आपलं बालपण कधीच कोमेजू दिलं नसावं असंच आजही मला वाटतं. ‘ही माझी मोठी मुलगी’ असे अभिमानाने सांगणारे बाबा. खोड्या करणारा, नेहमीच चिडवणारा प्रेमळ निलू, संसाराचा भार त्यावेळीही स्वतंत्रपणे पेलणारी लीना, मनस्वी प्रेम करणारा- या नात्याला कायमस्वरूपी टिकविण्याची ओढ बाळगणारा नवीन… ही सारीच ओढ लावणारी माझी माणसं. त्यांचे बंध टिकून आहेत. त्यात कसमईनाथाची सोबत आहेच. अर्थात या नात्याला ‘वीणा’ हा महत्त्वाचा दुवा आहे. दुसर्‍याचा विचार करत, कोणाला न दुखवता कसं जीवन जगायचं या विचारानेच पुढे जाणारी वीणा… तिच्या सोबतीनेच मी कसईनाथाला त्याच्या विविध रूपांत न्याहाळलं. खोलपेवाडीच्या कुटुंबासारखाच तो मला माझा वाटला. आजही मला त्याला पाहिले की त्यात मला माझ्या माणसांचा चेहरा दिसतो. माझ्या तरुण वयातील कोवळ्या, हळव्या हुंकारांची सोबत दिसते. आणि पहिल्यासारखंच वागण्याची मोकळीक माझं मन घेतं….