Home बातम्या स्वस्त भाजी पुरवठ्यासाठी नव्याने करार

स्वस्त भाजी पुरवठ्यासाठी नव्याने करार

0

फलोद्यान महामंडळाच्या गाड्यांना भाजीचा पुरवठा करणार्‍या पुरवठादारांची १०.५ कोटी रु. ची बिले थकल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजी पुरवठा बंद केला होता. त्यामुळे महामंडळाने आता भाजीच्या पुरवठ्यासाठी बेळगाव भाजी पुरवठा संघटनेच्या सदस्यांशी करार केला असल्याचे महामंडळाचे चेअरमन संकल्प आमोणकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

एप्रिल ते जुलै या महिन्याचे ५ कोटी ५० लाख रु. तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्याचे ५ कोटी रु. मिळून १०.५ कोटी रु. पाच भाजी पुरवठादारांना देणे असल्याचे आमोणकर म्हणाले. फलोद्यान महामंडळातर्फे लोकांना सवलतीच्या दरात भाज्या उपलब्ध करून देण्याची योजना नागरी पुरवठा खात्यातर्फे चालवण्यात येत असून फलोद्यान महामंडळाने त्यांना पाठवलेली भाजी पुरवठादारांची बिले थकल्याने भाजी पुरवठादारांनी महामंडळाच्या गाड्यांना भाजीचा पुरवठा करणे बंद केले असल्याचे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर बेळगावमधील भाजी पुरवठादारांकडे भाजी पुरवठ्यासाठी करार करण्यात आलेला असून ते येत्या रविवारपासून भाजीचा पुरवठा सुरू करणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

पुरवठा बंद करू नये यासाठी भाजी पुरवठादारांची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांच्याबरोबर केलेला करार रद्द करावा लागल्याचे संकल्प आमोणकर यांनी सांगितले. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्याबरोबरचा करार रद्द करून नव्या पुरवठादारांशी करार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

महामंडळाच्या गाड्यांवर सवलतीच्या दरात मिळणार्‍या भाज्या मिळणे बंद झाल्याने लोकांचे प्रचंड नुकसान होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर वरील निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. महामंडळाच्या गाड्यांवर दर दिवशी दीड लाख लोक भाज्यांची खरेदी करीत असतात, अशी माहितीही यावेळी आमोणकर यांनी दिली. राज्यभरात ५०० गाडे असून ६०० लोकांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध असल्याचे ते पुढे म्हणाले.