Home बातम्या सूर्य बनण्याची क्षमता असलेला चंद्र

सूर्य बनण्याची क्षमता असलेला चंद्र

0

– प्रा. रमेश सप्रे

‘पण तू प्रगतिपुस्तकावर बाबांची सही का केलीस?’ वर्गशिक्षिका एका पाचवीतल्या नव्यानं आलेल्या मुलाला विचारत होती. मुलगा गप्पच. ‘दुसर्‍याची सही करणं हा गुन्हा आहे हे माहीत नाही का तुला?’ मुलाची मान खालीच. ‘याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. हो ना?’ .. तरीही मुलगा उत्तरही देत नाही नि वरही बघत नाही.

प्रकरण काहीतरी वेगळंच आहे हे लक्षात आल्यावर वर्गशिक्षिकेला वर्गात पाठवून त्या छोट्याला घेऊन शेजारच्या पांडुरंगाच्या मंदिरात आलो. तिथं मुलांशी गप्पा मारत त्यांना बोलतं करणं, त्यांच्या मनातील विचार, हृदयातील भावना जाणून घेणंं खूप सोपं जायचं. मानसशास्त्रात एखाद्याला बोलायला लावून त्याचं मन जाणून घेणं, त्याला हलकं करून, मोकळं करून त्याची समस्या (प्रॉब्लेम) सोडवणं ही प्रभावी पद्धती मानली आहे. अन्य धर्मात ‘कन्फेक्शन’(कबुलीजवाब) नावाच प्रकार असतो. एखाद्या पवित्र, आदर असलेला, विश्‍वास टाकण्याच्या योग्यतेच्या व्यक्तीसमोर मन अगदी मोकळं, रिकामं करणं याचा समावेश त्या प्रकारात असतो. तसं पाहिलं तर यामुळे व्यक्तींच्या मनावरचा ताण दूर होण्यास खूप मदत होते. याला मनाचं रेचन(पर्गेशन ऑफ माइंड) म्हणतात. भायरी (रेचक) घेऊन जसं पोट स्वच्छ केलं जातं तसं अशा बोलून मोकळं मोकळं होण्याच्या पद्धतीनं मन, अंतर्मन सुद्धा, स्वच्छ केलं जाऊ शकतं. असो.

तर ते पोर बोलण्यापूर्वी रडायला लागलं. त्याचं नाव चंद्रेश्‍वर किंवा चंद्रशेखर होतं. पारोड्याचा चंद्रेश्‍वर हे त्याचं कुलदैवत होतं. घरी त्याला शेखर म्हणायचे. आम्ही त्याला गमतीनं ‘चंद्र’ म्हणू लागलो. तर चंद्रानं रडत-रडत, अडखळत सांगितलं ते ऐकून हृदयात कालवाकालव झाली. त्याला त्याच्या बाबांची मरणाहून अधिक भीती वाटत होती. त्याच्याकडून काही चूक झाली की कमरेचा कातडी पट्टा काढून मार मिळायचा त्याला बाबांकडून. त्याचे वळही त्याच्या पाठीवर, पोटावर होते. एक खोल जखम झाल्याचा वणही दिसला. विचारल्यावर चंद्र म्हणाला, ‘परीक्षेत एकदा चार विषयात नापास झालो तेव्हा बाबांनी पट्‌ट्याचं बक्कल असतं त्यानं त्याला मारलं. यावर काहीही बोलण्यापेक्षा काहीतरी करणं आवश्यक होतं. चंद्राला जवळ घेऊन पाठीवर थोपटत म्हटलं, ‘बघू तुझं प्रगतिपुस्तक.’ त्यानं ते दाखवल्यावर प्रथम हसावं की रडावं तेच समजेना. नंतर मात्र अंतर्मुख होऊन विचार केल्यावर एक नवीनच प्रकाश समोर दिसू लागला.

चंद्रानं पालकाची सही असलेल्या जागी वडलांची सही म्हणून लिहिलं होतं. ‘बाबा’. बीएबीए! बाबांना या मुलानं डबल ग्रॅज्युएट केलं होतं केवळ भीतीपोटी. ते प्रगतिपुस्तक ठेवून घेऊन चंद्रला ‘तुला कोणतीही शिक्षा होणार नाही शाळेत नि घरीही.’ असं आश्‍वासन देऊन वर्गात पाठवले. वर्गशिक्षिकेला व इतरही काही शिक्षकांना जी खोटी सही केल्याची (फॉर्जरी) घटना वाटत होती ती खरंच तशी होती का? तितकी साधी? की तिला आणखी काही पदर होते? ज्यात खरं शिक्षण दडलं होतं पालकांचं नि शिक्षकांचं सुद्धा.

विचारचक्र सुरू झालं. त्याचा वेध घेणं, भेद करणं आवश्यक होतं.

चंद्र एक बुटका, सावळा, हडकुळा मुलगा. पण त्याचं गरुडासारखं नाक कुठंतरी त्याच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाचा परिचय करून देणारं होतं. आत्तापर्यंत तरी चंद्र एक दबलेला, दाबलेला जीव होता. कदाचित सूर्याप्रमाणे तळपण्यासारखं तेज असूनही चंद्रासारखा परप्रकाशित राहिला होता. काहीसा झाकोळला गेला होता. बर्‍याच वेळा ‘पुढे काय करावं?’ हे सुचत नसतानाच ‘काय करावं?’ हेच अनपेक्षितपणे पुढे येतं हा आमचा अनुभव होता. यावेळीही असंच घडलं. दुसरे दिवशी न बोलवता त्याचे वडील शाळेत येऊन समोर हजर झाले. शेजारच्या मुलाकडून त्यांना शाळेतला प्रकार कळला होता. अवतार जमदग्नीचा. समोर येताच कडाडले, ‘पोरानं तोंडाला काळं फासलं.’ त्यांच्या स्वरात कुठेतरी दडलेलं दुःखंही होतं. म्हणून प्रसंग जास्त गंभीर होऊ नये यासाठी म्हटलं, ‘कुणाच्या तोंडाला काळं फासलं?’ यावर काहीशा विषादानं म्हणाले, ‘दोघांच्याही. त्याच्या नि आमच्याही.’ म्हटलं, ‘आम्हा शिक्षकांच्या का नाही?’ यावर गप्प राहिले.

शांत करून विचारल्यावर म्हणाले, ‘आत्ताच जर असले धंदे करू लागला तर पुढे काय करेल?’ यावर मात्र ठामपणे जरा वरच्या स्वरात म्हणालो, ‘काहीही नाही. कारण आत्ताच त्यानं फार भयंकर असं काहीही केलेलं नाही. त्याची फक्त भीतीतून व्यक्त झालेली प्रतिक्रिया होती तुमची सही करणं ही. खरी भयंकर क्रिया तर आपण करत आलो आहोत गेली काही वर्षं!’ यावर त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उमटलं.

शांतपणे त्यांना काही गोष्टी सांगितल्या. सर्वप्रथम त्यानं खोटी सही केली नाही तर फक्त ‘बाबा’ म्हणून लिहिलंय. त्यात कदाचित ‘बाबा, मला मारू नका हो. मला भीती वाटते’, हा भावही व्यक्त झाला असेल. हो ना?’ असं विचारताच जमदग्नी शांत झाले. त्यांचे डोळे पाणावले. ‘मी तरी काय करू हो? एकुलता एक मुलगा. मी फार शिकलो नाही. कॉंट्रॅक्टरच्या हाताखाली काम करून अनुभव घेऊन आता स्वतः कॉंट्रॅक्टर बनलोय. यातही भल्या मार्गानं काम करण्यापेक्षा बर्‍यावाईट मार्गानं कामं करून घेणंच अधिक शिकलो. भ्रष्टाचाराच्या दुनियेत राहून मीही अंतर्बाह्य बरबटलो. या मुलाकडून माझ्या अपेक्षा आहेत. यानं चांगलं शिकून इंजिनिअर व्हावं हे माझं स्वप्न आहे. पण हे पोर अभ्यासच करत नाही. चार-चार विषयात नापास होतं.’ ते आणखीही खूप बोलले असते पण त्यांना थोपवून मी मुख्य मुद्दा सांगितला, ‘म्हणून गुरासारखं बडवून का ते पास होणार आहे? उलट ते पोर कोडगं बनेल. दाट कातडीचं! शिक्षेचा परिणाम होत नाही. भीती, द्वेष याच भावना वाढीस लागतात. पुढे शिक्षेचीही सवय होते. काही दिवसांनी तुमचा मुलगाच म्हणेल तुम्हाला – बाबा मारा, आणखीन मारा..मरेपर्यंत मारा.. मारून टाका मला!’

यावर त्यांनी मान हालवून त्यांनाही ही गोष्ट पटल्याचं सुचवलं. ते चित्रंच जणू त्यांच्या नजरेसमोर उभं राहिलं. ते काहीसे शांत झाल्यावर त्यांना सांगितलं, ‘त्याला नवं प्रगतिपुस्तक देऊ. ज्यावर त्याला समजावून सांगत, जवळ घेत सही करा. त्याला सांगा नि तुम्हीही लक्षात घ्या ही इंग्रजी माध्यमातली पहिली परीक्षा आहे. या एका निकालावरून पुढच्या प्रगतीबद्दल काहीही सांगता येत नाही.’

काहीसे आश्‍वस्त होऊन, यापुढे त्याला मारणार नाही असं वचन देऊन गेले. वाटलं परिस्थिती बदलेल. पण येरे माझ्या मागल्या! व्यवसायातील चढउतारांचा ताण सतत मनावर, त्यांची पत्नी म्हणजे चंद्राची आई फक्त घरकाम करणार्‍या बाईसारखी असल्याने त्यांचा वारंवार तोल जायचा व परिणामी चंद्राला मारहाण चालूच असायची. आईनं खंबीर, कार्यक्षम असलं पाहिजे. नोकरी करीत नसली तरी ती घराचा सर्वांत महत्त्वाचा घटक असते हे तिनं सतत लक्षात ठेवून वागायला पाहिजे. प्रसंगी नवर्‍याला फटकारलंही पाहिजे. पण हे चंद्राच्या आईकडून घडत नव्हतं आणि म्हणूनच त्याची साडेसाती चालू राहिली.

याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर व त्यापेक्षाही अधिक त्याच्या वर्तनावर होत राहिला. वर्गात शिकवताना लक्ष नसणं, गृहपाठ न करणं, वर्गाच्या बाहेर काढलं जाणं हे त्याला नित्याचं होऊन बसलं. वडलांना सांगूनही काही फरक पडत नव्हता, आईला सांगून उपयोग नव्हता.

ज्याला व्यावहारिक शहाणपणा (प्रॅक्टिकल विज्डम) किंवा उपयोजित हुशारी (अप्लाइड इंटेलिजन्स) म्हणतात ते मात्र चंद्रात इतरांपेक्षा जास्त प्रमाणात होतं. दुसर्‍याला अवघड प्रश्‍न विचारून निरुत्तर करण्यात त्याचा हातखंडा होता. हेच पहा ना. एकदा शिक्षण क्षेत्रातील एक अधिकारी, अनुभवी, खूप वाचन केलेली व्यक्ती शाळेत आली होती. त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार तिला एका वर्गात नेलं. ‘मुलांनो, तुम्ही मला कोणताही प्रश्‍न विचारा. मी त्याचं उत्तर देऊन तुमचं समाधान करीन.’

सर्वांत आधी चंद्राचा हात वर झाला. ‘हा आता काय विचारणार?’ यावर विचार चालू असतानाच त्यानं प्रश्‍नाचं अस्त्र त्या पाहुण्यांवर फेकलं सुद्धा. ‘जगातल्या पहिल्या माणसाचं बारसं कोणी केलं?’ ‘जगातला पहिला माणूस कोण?’ असा साधा सरळ प्रश्‍न न विचारता चंद्रानं छोबीपछाड डाव खेळला होता. ती अधिकारी व्यक्ती चक्रावली, गोंधळली व म्हणाली, ‘याचं उत्तर मला माहीत नाही पण ते दिल्याशिवाय मी राहणार नाही. मी पुन्हा येईन.’ चंद्राच्या बुद्धिमत्तेचा हा एक नमुना सांगितला. अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टीत त्याला चांगली गती होती. सातवीत पोचल्यावर तो वाहनं चालवायला लागला. घराशेजारी असलेल्या एका मोटार व स्कूटर दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये तो तासन्‌तास असायचा. सुट्टीत गॅरेजवाल्या काकांकडून गाडीचं इंजीन, इतर रचना याविषयी विचारायचा, शिकायचा. त्यांना मदतही करायचा. हे सारं अर्थातच वडलांच्या नकळत. शिक्षकांची, काही पालकांची सुरू न होणारी वाहनं तो चुटकीत चालू करून द्यायचा. पण त्याच्या या कौशल्याला शाळेत कोणतीही संधी नव्हती. टेक्निकलचे काही विषय पॉलिटेक्निकमध्ये शिकवण्याची सोय होती. पण व्यवस्था नीट नसल्यानं मुलं त्यात रमायची नाहीत. पुढे ती पद्धत बंदच झाली. असो.

चंद्राची वागणूक बिघडू लागली. शिकवणी (ट्यूशन)च्या ठिकाणी इतर शाळांतली, वरच्या वर्गातली मुलं भेटायची. तिथं काही मुलांची वाईट संगत याला लागली. याचं एकूण वर्तन पाहून काहीजण याच्यामार्फत त्यांच्या मैत्रिणींकडे निरोप, चिठ्‌ठ्या, पत्रं, वस्तू पोचवू लागले. त्यासाठी याला पैसे देऊ लागले. ते पैसे कसे वाढवायचे याच्या मटक्यासारख्या कल्पना सुचवू व शिकवूही लागले. चंद्राला ते हवंच होतं. त्याला हे वातावरण जवळचं वाटू लागलं.

घरी मिळणारी शिक्षा व शाळेत प्रयत्न करूनही चंद्राचाच प्रतिसाद न मिळाल्यानं शिक्षकांची काहीशी तुटक झालेली वागणूक, शाळेच्या वाढत्या व्यापात त्याच्याकडे खास लक्ष द्यायला नसलेली फुरसत या सार्‍याचा परिणाम म्हणून चंद्रा जास्त बिघडू लागला.

त्याच्या शाळेतल्या खोड्या व करामती काहीशा विध्वंसक, गुन्हेगारी स्वरूपाच्या होऊ लागल्या. संगत वाईट, अभ्यासाची नावड, खिशात पैसे अशी स्थिती असताना जे घडेल तसंच घडू लागलं. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत गेली. शाळेनंतरही कांपाल येथील बागेत तासन्‌तास घालवणं हा त्याचा दिनक्रम होऊ लागला. सांगितलं की तेवढ्यापुरतं त्याला वाईट वाटायचं. सुधारण्याचं वचन द्यायचा. लिहूनही द्यायचा(अंडरटेकिंग) पण काही दिवसांनी पहिले पाढे पंचावन!

विचार आला की काही सुचायचं नाही. अशाच मनःस्थितीत ज्यांना खर्‍या अर्थानं शिक्षण महर्षी म्हणता येईल अशा एका आदरणीय व्यक्तीशी या विषयावर बोलत असताना ती व्यक्ती म्हणाली, ‘एखाद्या अत्यंत अनुभवी व कुशल शल्यविशारदाचं(सर्जनचं) एखादं ऑपरेशन अयशस्वी होतंच ना? तसंच हे समजायचं.’

….खरंच आमचंही ‘ऑपरेशन चंद्र’ अयशस्वी झाल्यासारखं होतं. चंद्राला शाळेतून काढून टाकावं अशी अनेकांकडून सूचना होऊनही त्याला शाळेतच ठेवलं. याला दोन कारणं होती. एक तो कधीतरी सुधारेल अशी अंधूक आशा आणि त्याला शाळेतून काढल्यावर तो अधिक गुन्हेगारी स्वरूपाच्या कृती करत राहील. पण विशेष यश आलं नाही.

चंद्रही नकळत आम्हाला काही गोष्टी शिकवून गेला.

सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांशी शिक्षकांचे, शाळेचे जवळचे संबंध असले पाहिजेत. निदान विशेष विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर पालकांशी सतत संवाद (कंटिन्यूअस रॅपो) असलाच पाहिजे. नाहीतर अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर ठेवणं कठीण होऊन बसतं.

आई व वडील या दोघांनीही निदान एकानं तरी अधिक तीव्रतेनं, कार्यक्षमतेनं, शाळेच्या मदतीनं आपल्या मुलांना योग्य वळण लावलं पाहिजे. कितीही म्हटलं तरी शिक्षकांचे जे विद्यार्थी असतात ती आपली मुलं आहेत. त्यांचं भविष्य आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे हे तरी पालकांनी लक्षात ठेवलंच पाहिजे.

एका पालकानं सतत शिक्षा, अन्याय करत राहिलं अन् दुसर्‍यानं मुलाला कायम संरक्षण देत राहिलं तर त्याचा दुष्परिणाम अधिक होतो. दोघाही पालकांनी मुलांकडे लक्ष (अटेन्शन) दिलं पाहिजे व प्रेमही (अफेक्शन) केलं पाहिजे.

शाळेत आठवीनंतर कोणत्याही टेक्निकल विषयाची, उपक्रमाची सोय केली पाहिजे. आजूबाजूच्या शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून अशी योजना राबवता येईल. या दिशेनं प्रत्यक्ष प्रयत्न झाले पाहिजेत.

मध्ये एकदा सर्टिफिकेटवर सह्या घेण्यासाठी चंद्र शाळेत आला होता. विचारल्यावर म्हणाला, ‘छान चाललंय. दोन-तीन कंपनींच्या एजन्सी मिळाल्याहेत. स्वतःचं वाहन घ्यायचंय. त्यासाठी बँकेकडून कर्ज, गाडी चालवण्याचं लायसन्स हवं म्हणून त्याला काही कागदपत्रांवर सह्या करून हव्या होत्या. ओठ काळे दिसले. सह्या करता करता म्हणालो, ‘सिगरेट्‌स कमी ओढत जा. व्यसनांपासून दूर राहा. आणि चांगली संगत ठेव रे!’ चंद्र काही बोलला नाही. शेवटी त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘पुढचं शिक्षण तू घेत नाहीस, हरकत नाही. पण आज उद्या एखादं छोटं गॅरेज सुरू कर. त्यात तुला प्रगती करता येईल.’

वाकून नमस्कार करून निघून गेला. जाताना त्याचं ते महत्त्वाकांक्षा दाखवणारं नाक सांगून गेलं, ‘हो सर! नाही निराश करणार तुम्हा सर्वांना.’ खरंच आज काहीसं ग्रहण लागलेला हा चंद्र लवकरच आपल्या तेजानं प्रकाशू लागेल. येईलही एक दिवस आमंत्रण द्यायला आपल्या गॅरेजच्या उद्घाटनाचं… काय हरकत आहे असं उज्ज्वल भविष्याचं कल्पनाचित्रं पाह्यला? आखिर उम्मीदपे तो दुनिया जीती है|…