– डॉ. सीताकांत घाणेकर
सारे जग विविधतेने भरलेले आहे. विविधता सगळीकडे दिसते- निसर्ग, पशु, पक्षी, प्राणी, एवढेच नव्हे तर विविध मानव, त्यांचे देश, भाषा, रंग, स्वभाव, परिस्थिती तसेच त्यांचे विविध तर्हेचे जीवन- कधी सुखमय, कधी दुःखमय, कष्टमय प्रसंगाना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देखील वैविध्यपूर्ण. कोणी संकटाचा सामना सहज करतो तर दुसरा अगदी खचून जातो. काही विविध व्यसनांचा आसरा घेतात तर काही नाईलाजाने आत्महत्या देखील करतात. ह्या सर्व घटनांबद्दल विविध मते आहेत. कोणी म्हणतो देवाची इच्छा तर कोणी म्हणतो त्याची माया. आणखी कोणी म्हणतो प्रत्येकाचे कर्म. इतर म्हणतात देवापेक्षा दैव मोठे- कारण त्याला दोन मात्रा आहेत.
सामान्य माणूस हे सगळे माहित झाले की, संकटाच्या वेळी अगदी मेटाकुटीस येतो. त्याला रस्ता सापडत नाही. सगळीकडे अंधःकारच दिसतो. कारण तो सखोल अभ्यास व चिंतन करीत नाही.
आपल्या पूर्वजांनी मुख्यतः अनेक ज्ञानी व द्रष्ट्या ऋषींनी ह्या विषयांवर खोल चिंतन केले. आम्हाला पुष्कळ ज्ञान विविध स्वरूपात दिले. वेद, उपनिषदे, योगशास्त्र… स्वतः पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण मानवरुपात अवतार म्हणून आले. अर्जुनाला निमित्त करून कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र कसे बनवावे ह्याचे मार्गदर्शन म्हणून श्रीमद्भगवद्गीता मानवाच्या कल्याणासाठी सांगितली. गीतेचे अठरा अध्याय म्हणजेच योगाचे विविध मार्ग.
योगशास्त्राचा अभ्यास करताना असे आढळून येते की प्रामुख्याने योगाचे चार मार्ग- ज्ञान, कर्म, भक्ती व राजयोग. यातील राजयोग आठ अंगांचा म्हणून अष्टांगयोग – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे बहिरंग योग व धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग योग. सर्व योग मानवाच्या सर्वांगीण जीवनविकासासाठी अत्यावश्यक आहेत. तसेच जगातील समस्या टाळण्यासाठी किंवा त्यांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक आहेत.
राजयोगाच्या संदर्भात शास्त्रकार स्पष्ट सांगतात की यम, नियम ह्या प्रथम दोन पायर्या आहेत. त्या अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून त्यांचा अभ्यास व त्याप्रमाणे आचरण अत्यंत आवश्यक व अपेक्षित आहे. बहुतेक जण हा अभ्यास करत नाहीत. अनेकांना ह्या पायर्या माहितसुद्धा नाहीत.
यम- व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश- हे पाच आहेत- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह.
नियम- स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश- हे पाच आहेत- शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान.
आज जगामध्ये सर्वत्र बघताना ह्या सर्व यम-नियमांची नितांत आवश्यकता जाणवते. यातील अहिंसा व सत्य आपण विस्ताराने बघितले. आता अस्तेयबद्दल जाणून घेऊ या.
अस्तेय
….चोरी करू नये. तसेच दुसर्याची वस्तू किंवा परक्या व्यक्तीविषयी आसक्ती ठेवू नये. म्हणजे संपूर्ण प्रामाणिकपणा.
‘‘चोरी’’ हा शब्द ऐकला की आपल्या समोर येते ती पैशाची चोरी- कुणाचेही पैसे चोरू नये. पण त्यात फक्त पैसे अभिप्रेत नाहीत. तर इतर वस्तूदेखील आहेत जसे- जमीन, दागिने, घर, संपत्ती, इ….
सभोवताल नजर फिरवली तर सहज लक्षात येईल की अशा चोर्या सर्रास होतात. व्यक्तीलाच नव्हे तर समर्थ देश असमर्थ देशासही लुटतात. एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने पोटाची भूक शमविण्यासाठी चोरी केली तर समजू शकतो. अर्थात त्याचे समर्थन करायचे नसते तर त्याला योग्य मार्गदर्शन करायचे असते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वाल्या कोळी. महर्षी नारदाच्या मार्गदर्शनामुळे वाल्याने चोर्या बंद केल्या, एवढेच नाही तर त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आजकाल जगात श्रीमंतच मोठ्या चोर्या करताना दिसतात. आपण दोष मात्र गरिबांना देतो. लगेच त्यांच्यावर संशय घेतो.
ह्या संदर्भात मला एक घटना आठवते. आम्ही वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना आमच्या पैशांची पर्स बाहेर खिशातच असायची. अनेक वेळा थोडे पैसे कमी व्हायचे. पण तेवढे लक्षात यायचे नाही कारण चोरसुद्धा हुशार होते. सगळे पैसे चोरले तर संशय येईल म्हणून अनेकांचे थोडे थोडे पैसे चोरायचे.
ह्या गोष्टीचा अतिरेक झाला तेव्हा आम्ही सर्वांनी एक युक्ती काढली. बाहेरच्या खोलीमध्ये एक कपाट होते, ते आम्ही जरा पुढे घेऊन तिरकस ठेवले. त्याच्यामागे एक डॉक्टर उभा राहिला. त्या कपाटाच्या बाजूलाच भिंतीवरच्या हँगरवर आमचे कपडे असत.
थोड्या वेळाने चोर आला. त्याने एकाची पर्स काढली. आमच्या मित्राने चोराचा हात पकडला व बाहेर आला आणि काय आश्चर्य? तो चोर म्हणजे आमचाच एक डॉक्टर मित्र होता. त्याहीपेक्षा मोठे आश्चर्य म्हणजे हात पकडणारा नर्व्हस झाला कारण त्याची अपेक्षादेखील नव्हती की आमचाच मित्र असेकाही करेल म्हणून.. आम्हाला वाटत होते की गरीब वॉर्डबॉय असेल.
तो चोर मात्र अगदी सहज..हा..हा..हा..हा ..म्हणून पर्स तिथेच टाकून निघून गेला. ही बातमी सहज सगळीकडे पसरली. नंतर लक्षात आले की आमच्या खोलीतील पैसेही हाच मुलगा असताना चोरले जात होते. आम्हा सर्वांना फार पश्चात्ताप झाला की आम्ही गरीबावर संशय घेतला. खरे म्हणजे हा मुलगा सुखवस्तु घराण्यातील होता. त्याला पैशांची गरज नव्हती. पण हा एक रोग आहे- ‘‘क्लेप्टोमॅनिया’’.
हे तर भुरटे चोर झाले. पण समाजात इतर फार मोठे चोर व लुटारू दिसतात. अनेक सावकार आहेत जे गरीब शेतकर्यांना व मजुरांना कर्ज देतात. त्यांना बिचार्यांना लिहिता-वाचता येत नाही. कागदपत्रावर त्यांचा अंगठा लावून घेतात व कालांतराने त्यांच्या गहाण टाकलेल्या वस्तू- जमिनी, घरें, गुरे, दागिने गिळंकृत करतात. असे करताना त्यांना थोडीसुद्धा लाज वाटत नाही किंवा दया येत नाही. त्यांच्यावर अमानवी अत्याचारही करतात.
तसेच आज समाजात जो लाच-लुचपतीचा व भ्रष्टाचाराचा भस्मासूर माजला आहे, तो ह्याच विषयाच्या संदर्भात आहे. प्रत्येक कामासाठी लाच घेणे तर सर्रास चालले आहे. अनेक क्षेत्रात अशा घटना घडतात- राजकारण, नोकर्या, इनकम टॅक्स…. आपण लाच घेणार्याला दोषी ठरवतो. पण शास्त्राप्रमाणे लाच देणारा, मतासाठी पैसे, वस्तु किंवा इतर फायदे घेणारासुद्धा तेवढाच जबाबदार आहे.
ही लाच घेण्याची पद्धत पूर्वकालापासून आहे. राजा भोजांच्या दरबारातील एक घटना इतिहासात नमूद केलेली आहे. भोजराजांच्या दरबारात एक कवी आला. एका द्वारपालाने त्याला अडवले. जेव्हा त्याने सांगितले की तो कवि आहे तेव्हा तो द्वारपाल म्हणाला, ‘‘मी तुम्हाला आत सोडतो पण तुम्ही मला तुमच्या बक्षिसाचा अर्धा वाटा द्यायला हवा.’’ कविने ही गोष्ट लगेच मान्य केली. कारण दुसरा पर्यायच नव्हता.
राजाला त्या कविच्या कविता आवडल्या व त्याने कविला काय बक्षिस हवे ते विचारले. तेव्हा कवि म्हणाला, ‘‘ महाराज, मला पैसे किंवा वस्तू नको. माझ्या पाठीवर चाबकाचे शंभर फटके मारावेत.’’ राजाला ह्या विचित्र बक्षिसाबद्दल आश्चर्य वाटले. पण जेव्हा सर्व गोष्ट सविस्तर कळली तेव्हा भोजराजाला फार दुःख झाले.
हा कवि म्हणजे कविश्रेष्ठ कालीदास. अशी घटना त्या काळात घडू शकते तर आजच्या काळात घटली तर नवल नाही. कारण पूर्वीच्या काळात अनेक सुसंस्कार केले जात. आजच्या शिक्षणात किंवा घरात अशा संस्कारांना तेवढे महत्व दिले जात नाही. मग आपण सद्वर्तनाची अपेक्षा कशी ठेवू शकतो?
प्रत्येकाला वाटते की हे सर्व विपरीत घडते आहे. समाज व व्यक्तिविकासासाठी ह्या घटना भूषणावह नाहीत. म्हणूनच योगशास्त्रामधील राजयोगामध्ये ‘‘अस्तेय’’ ह्या यमाला फार महत्व आहे. योगसाधकांना हा अभ्यास आवश्यक आहे.