Home बातम्या सलमान रश्दीनी भारत भेट टाळली

सलमान रश्दीनी भारत भेट टाळली

0

जयपूर साहित्य महोत्सवात आपण भाग घेणार नसल्याचे ‘बूकर’ विजेते साहित्यिक सलमान रश्दी यांनी काल जाहीर केले. आपल्या लेखनाबद्दल वादग्रस्त असलेले रश्दी यांच्या भारत भेटीस दारुल उलूम देवबंदने आक्षेप घेतला होता.

कालपासून सुरू झालेल्या साहित्य महोत्सवाचे संयोजक संजय रॉय यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ठार करण्यासाठी मुंबई अंडरवर्ल्डमधील गुंडांना सुपारी दिली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतात येणे म्हणजे आपला परिवार, महोत्सवातील अन्य सहभागी, लेखक यांच्याप्रति बेजबाबदार वर्तन ठरेल, यासाठी आपण भारत भेट रद्द करण्याचे ठरविले आहे.

संमेलनाव्यतिरिक्त काही काळ ते मुंबईतही थांबणार होते . या दौर्‍याची माहिती जाहीर होताच ‘ दारुल उलुम देवबंद ’ सह अनेक मुस्लिम संघटनांनी रश्दींना विरोध केला . ‘ द सॅटनिक वर्सेस ’ हे पुस्तक लिहून त्यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावणाल्याचे रश्दींचा व्हिसा रद्द करण्याची मागणी दारुलने केली होती.

दरम्यान, रश्दी यांनी आपली भेट रद्द केल्याबद्दल देवबंदने समाधान व्यक्त केले आहे. मात्र जयपूर फेस्टिव्हलच्या साहित्यिक वर्तुळात याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. काही लेखकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी रश्दी यांच्या बंदी घालण्यात आलेल्या ‘सॅटेनिक व्हर्सिस’ या वादग्रस्त पुस्तकातील उतारे वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र आयोजकांनी त्यांना थांबवले.