26 C
Panjim
Thursday, December 3, 2020

सणांना अध्यात्माची जोड हवी

योगसाधना – ४८०
अंतरंग योग – ६५

 • डॉ. सीताकांत घाणेकर

आध्यात्मिक ज्ञानी असे सांगतात की या मायारूपी विश्‍वात प्रत्येक क्षणाला माया व्यक्तीला आपल्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते. म्हणून कलियुगात विविध विकार-वासना वाढतच आहेत. त्या मायेचा प्रतिकार करण्यासाठी आत्मशक्ती वाढवायला हवी.

विश्‍वात चांगल्या- वाईट अशा विविध घटना घडतच असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातही हे घटनाचक्र चालूच असते. सध्या जग फारच बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. विविध समस्या समोर ‘आ’ वासून उभ्या आहेत ज्यात अनेक तर्‍हेचे भयानक रोग, आपापसात भांडणे, नैसर्गिक आपत्ती. माणूस अगदी हतबल झाला आहे. त्याला थोडा बदल, विरंगुळा हवाच. नाहीतर त्याची मनःस्थिती भयानक होईल. काहीजण व्यसनांमधून हा विरंगुळा शोधतात तर काहीजण आपलं गाव सोडून थोडे दिवस यात्रेसाठी जातात – निसर्गरम्य ठिकाणी, धार्मिक स्थानांवर इ….
आपल्या पूर्वजांनी या विषयावर सखोल चिंतन केले होते. म्हणूनच त्यांनी नियमित वेगवेगळे सण, उत्सव सुरू केले होते. मुख्य म्हणजे हे उत्सव विविध देवी-देवतांच्या नावाने आहेत…

 • शिवरात्री – श्रीशंकर महादेव * रामनवमी – श्रीराम * चतुर्थी – श्रीगणेश
 • दत्तजयंती – श्रीदत्तात्रेय * गोकुळाष्टमी – श्रीकृष्ण व * नवरात्री – श्रीदेवी.
  या सर्व उत्सवांना विविध पैलू आहेत.
 • धार्मिक ः मूर्तिपूजा, आरती, भजन, नैवेद्य, प्रसाद…
 • सामाजिक ः सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा…
 • आध्यात्मिक ः आत्म्याच्या मार्गदर्शनासाठी, उद्धारासाठी (आत्मोद्धार)
  खरे म्हणजे आध्यात्मिक पैलू अत्यंत महत्त्वाचा आहे. तो फार सूक्ष्म, गहन आहे. कारण त्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते. पण दुर्भाग्याने या पैलूवर फारसा विचार केला जात नाही. म्हणून बहुतेकजण धार्मिक व सामाजिक पैलूंनाच जास्त महत्त्व देतात. त्यात वावगे काही नाही कारण ते पैलूसुद्धा अत्यावश्यक आणि महत्त्वपूर्ण आहेतच. पण ज्यावेळी त्यांना अध्यात्माची जोड दिली जाते तेव्हा त्या सण-उत्सवांना सुगंध येतो. जीवनविकास- वैयक्तिक , सामाजिक, वैश्‍विक साधला जातो. समस्यांना, संकटांना सामोरे जाण्यासाठी सर्व तर्‍हेच्या शक्तींमध्ये वृद्धी होते- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. अर्थात काही अपवाद आहेतच. काही संस्था या पैलूंचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून व्यक्तीव्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पण मुख्य प्रश्‍न येतो तो हा की आपणातील कितीजण हा संदर्भ समजून घेऊन आपल्या जीवनात – वैश्‍विक, पारिवारीक, सामाजिक – उपयोग करतो. त्या गोष्टी धारण करतो.
  बहुतकरून हा फक्त एक उपचारच राहतो. मौजमस्ती होते पण अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.
  आजच्या कलियुगात आणि हल्लीच्या कोरोनाच्या काळात गरज आहे ती प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने ही गोष्ट समजून घेऊन इतरांपर्यंत पोचवावी.
  हल्लीच जो सण विविध बंधनांमुळे मर्यादित स्वरूपात साजरा झाला – नवरात्र, त्यावर आपण थोडे खोलात जाऊन चिंतन करूया.

महिषासुर मर्दिनी प्रकट होऊन महिषासुर या असुराचा वध करते. ती शक्तिस्वरूप आहे. म्हणून हा सण विविध शक्तींच्या पूजेसाठी आहे. पण आधी त्याबद्दल दृष्टिकोन समजणे आवश्यक आहे.
सर्वांत आधी हे समजायला हवे की हे राक्षस जसे बाहेर आहेत तसेच आपल्या प्रत्येकाच्या आतही आहेत. हे आतील राक्षस म्हणजेच षड्‌रिपू- काम- क्रोध- लोभ- मोह- मद – मत्सर, तसाच अहंकार.
या असुरांचा व्यक्तीला स्वतःला तर त्रास होतोच पण त्याबरोबर अशा आसुरी वृत्तींमुळेच समाजालाही त्रास होतो.

 • बाहेरील असुर म्हणजे स्वार्थी व दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती जे विविध प्रकारचे गुन्हे करतात- भांडणं लढाया, आतंकवाद, बलात्कार, चोर्‍या, भ्रष्टाचार, अत्याचार… या सर्वांचा नाश करण्यासाठी आपण देवीची आराधना करतो.
  इथे आपण म्हणजे शरीर नव्हे. ते तर नश्‍वर आहे. अवश्य शारीरिक कष्ट भोगावे लागतातच. तसेच मानसिक व भावनिक त्रासही होतात. सर्वांत अधिक कष्टदायक म्हणजे आत्मिक त्रास. याचे मूळ कारण आपण समजून घ्यायला हवे.
 • आत्मा हे परमात्म्याचे पवित्र संतान आहे. त्याचे सप्तगुण आहेत. तो ज्ञानस्वरूप आहे. शांतीरूप, सुखस्वरूप, आनंद स्वरूप, प्रकाश स्वरूप आणि शक्तीस्वरूप आहे. त्यामुळे त्याची इच्छा असते की आपण शांतीने, सुखाने, आनंदाने रहावे. पण ते शक्य होत नाही. त्याची कारणे त्याच्या आतही ाहेत व बाहेरही आहेत.

या दोन्हींवर उपाय म्हणजे स्वतःची आत्मशक्ती वाढवणे. त्यासाठीच शक्तीस्वरूपी, शक्तीरुपिणी देवीची उपासना आवश्यक आहे. नवरात्रीच्या रूपाने आपण ती करतो. त्याचा गर्भितार्थ समजला तर देवीची पूजा मनोभावे होईल. परिणाम चांगले दिसतील.
कदाचित बाहेरील राक्षस नियंत्रणात यायला वेळ लागेल पण स्वतःच्या इच्छाशक्तीने आतील असुरांवर लवकर विजय मिळविता येईल. त्यासाठीच नवरात्रीबरोबर नियमित शास्त्रशुद्ध योगसाधनादेखील अत्यावश्यक आहे. अष्टांगयोगातील ‘ध्यान’ तर अत्योपयोगी ठरते.
‘ध्यान’- म्हणजे डोळे मिटून स्वस्थ बसणे नाही तर त्यावेळी परमात्म्याशी जोडणे. त्याचे स्मरण करणे. परमात्मा तर महासागर आहे,

ज्ञानाचा, शांती-सुख-आनंदाचा तो तेजोमय आहे, तो शक्तिदायक आहे.
आत्मा ज्या गुणांच्या शोधात आहे त्या गुणांची प्राप्ती वाढवा. त्याचे परमगुरू – देवांचे देव महादेव, शिव – यांच्याकडून होईल. नवरात्रीचे दिवस आम्हाला याबद्दल आठवण करून देतात. आत्म्याला हे ज्ञान उपजत आहे. पण अनेक जन्मांमुळे त्याच्यावर अज्ञानाचे, विपरीत ज्ञानाचे आवरण चढले आहे, ज्यामुळे सुख-शांतीसाठी तो चाचपडत आहे. जी सुखशांती त्याच्या आत आहे तिचा शोध तो बाहेर घेत आहे. मग त्याला ती कशी मिळणार?
नवरात्रीला आपण देवीची पूजा करतो तिला अष्टभुजा म्हणतात. तिचे फोटो, मूर्ती आपण तशी पाहतो. प्रत्येक हातात वेगवेगळ्या वस्तूही दाखवल्या आहेत- जी अष्टशस्त्रे आहेत. त्याशिवाय देवीच्या बाहुबलाचेही दर्शन होते.

राजस्थानमधील माउंट अबू येथे असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयातील तज्ज्ञांनी या विषयावर पुष्कळ अभ्यास केलेला आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे ज्ञान ईश्‍वरीय आहे. अष्टशक्तींबद्दल त्यांचे मत….
१. विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती – मागे हटण्याची शक्ती (पॉवर ऑफ विथड्रॉ) – या शक्तीचे योग्य उदाहरण म्हणजे कासव. गरज पडेल तेव्हा तो आपली इंद्रिये कवचाच्या बाहेर काढतो. मुख्य म्हणजे हातपाय व डोके. काम झाले की तो आत खेचतो. तसेच कसल्याही संकटाची जाणीव झाली तरीही आपली नाजूक इंद्रिये वापरतो. योगसाधनेत याला प्रत्याहार म्हणतात. (अष्टांगयोगाचा पाचवा पैलू)
जाणकार असे सांगतात – कासवाचे हे कवच इतके मजबूत असते की हत्तीसुद्धा त्याच्यावर चालून गेला तरी कासवाला काहीच इजा पोचत नाही.

प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला विविध समस्या येतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक. बहुतेकजण अशावेळी शांत राहू शकत नाही. ते प्रतिकार करतात. रागाने बोलणे, दुसर्‍यावर हात-पाय उचलणे, शस्त्राने वार करणे. काहीवेळा ही प्रतिक्रिया योग्यही असेल. पण प्रत्येकवेळी नाही. अशावेळी थोडा वेळ मागे हटून परिस्थितीवर विचार करून त्यानुसार निर्णय घेणे आपल्या हिताचे असते. अनेक वेळा रागामुळे आपली प्रतिक्रिया बरोबर नसते व त्यामुळे परिस्थिती चिघळते.
कधी कधी आपण रस्त्यावर भांडणे बघतो, अपघात बघतो. आपले कुणीही त्यामध्ये अडकलेले नसते. अशावेळी अनासक्त भावाने साक्षी होऊन त्या घटनेकडे बघतो. याचा फायदा म्हणजे आपले मन शांत राहते.

काहीवेळा आपला कुणीतरी नातेवाईक, मित्र आपल्या समस्या आम्हाला सांगतो. आपल्याकडून त्याला योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा असते. त्यावेळीसुद्धा शांत राहिलो, सदसद्विवेकबुद्धीचा व्यवस्थित वापर केला तर त्याला आपण योग्य उपाय सुचवू शकतो.
आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर आत्मा या सृष्टीरूपी नाटकात आपली भूमिका काय ते बघतो. शारीरिक बंधनात न अडकता विदेही स्थितीत राहतो. त्यामुळे तो शांत राहू शकतो. या शांतीची त्याला अपेक्षा असते आणि शांती हा तर त्याचा एक नैसर्गिक गुणच आहे. फक्त अज्ञानामुळे त्याला विसर पडलेला आहे.

खरेच, प्रत्येकाने जर या पहिल्याच शक्तीचा प्रत्येक वेळी व्यवस्थित उपयोग केला तर प्रत्येक व्यक्ती शांत राहीलच पण त्याचबरोबर कुटुंबात, समाजात, विश्‍वात शांती नांदेल.
आध्यात्मिक ज्ञानी असे सांगतात की या मायारूपी विश्‍वात प्रत्येक क्षणाला माया व्यक्तीला आपल्यात गुंतवण्याचा प्रयत्न करते. म्हणून कलियुगात विविध विकार-वासना वाढतच आहेत. त्या मायेचा प्रतिकार करण्यासाठी आत्मशक्ती वाढवायला हवी.
प्रत्येक शक्तीबरोबर एक देवी आहे. या शक्तीची देवी पार्वती म्हणजे परिवर्तन करणारी. इथे परिवर्तन अभिप्रेत आहे ते आत्म्याचे. शंकर तपश्‍चर्येला गेले पण पार्वती मागे राहिली… सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी.

पार्वतीचे वाहन म्हणजे शुभ्र गाय- पवित्र जीवनदायिनी. तिचे दूध सर्वांना पौष्टिक, विशेष करून बालकांना. तसेच तिचे मूत्र व गोबरदेखील मानवाला व वृक्षवनस्पतींना उपयोगी आहे.
पहिल्या दिवशी पार्वतीकडे शक्ती मागू या. (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय यांच्या साहित्य व प्रवचने).

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

अमृत फळ ः आवळा

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी आवळे वर्षातून काही काळच उपलब्ध असतात. आवळ्याचे लाभ पुढे वर्षभर घेता यावेत, या...

निद्रा भाग – १

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकरश्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव रात्री झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे मोबाईलसारख्या गोष्टींचा अति प्रमाणात...

लहान मुलांना वाफ देताना…

डॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून...

आज गरज शक्तिउपासनेची

योगसाधना - ४८२अंतरंग योग - ६७ डॉ. सीताकांत घाणेकर आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर...

काय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज?

डॉ. बिपीनचंद्र भामरे(कार्डियो थोरॅसिक सर्जन) हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या...