स्तनांचे आजार भाग – २

0
927
  • डॉ. सुरज स. पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

स्तन्याचे शोधन होणे महत्त्वाचे व ते आयुर्वेदामार्फतच शक्य आहे. त्यासाठी पंचकर्माचाही आधार घेऊ शकतो. योग, आसन, प्राणायाम इ. हेही उपयोगी ठरतात व म्हणूनच अशा काही तक्रारी असल्यास तज्ञांचा, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ यांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.

स्तनांच्या कर्करोगाची ७ विशिष्ट लक्षणे म्हणजे
१) स्तनांच्या ठिकाणी/छातीमध्ये वेदना होणे,
२) स्तनांना खाज सुटणे,
३) पाठीच्या वरच्या बाजूला- खांद्यामध्ये- मानेत वेदना होणे,
४) स्तनांचा आकार बदलणे
५) स्तनाग्रां(निपल्स)चा आकारही बदलणे, तेथील संवेदनशीलता कमी होणे. स्तन्यपान करत नसतानासुद्धा स्तनांतून स्राव येणे, रक्तस्राव होणे किंवा सफेद रंगाचे पाणी येणे, निपल्सवरील त्वचा रूक्ष होऊन खपल्या निघणे
६) काखेमध्ये सूज येणे किंवा गाठ येणे ज्या स्पर्शास कठीण व एकाजागी स्थिर असतात. तेथील लिम्फ नोड्स(लसिका ग्रंथी) यांनाही सूज येते.
७) स्तनांनादेखील सूज येणे व लालसर होणे. क्वचितवेळी निळे-जांभळेसुद्धा दिसतात. स्तन हे स्पर्शास उष्ण लागतात (एकप्रकारचा स्तनांचा ताप आहे). टोचल्याप्रमाणे वेदना होणे.
स्त्रीच्या दोन्हीही स्तनांचा आकार हा वेगवेगळा असू शकतो व याचे कारण म्हणजे स्तनांचा विकास पूर्णपणे न होणे (प्रथम अवस्थेपासूनच) व त्यासाठीच स्तनांच्या व्यवस्थित परीक्षणाची गरज असते जेणेकरून हे सिद्ध होईल की याचे कारण एखादा गळू, फोड व गाठ तर नाहीये.
स्तनांतील आजार जे स्तन्यपान करणार्‍या लहान बाळांनासुद्धा घातक ठरू शकते. शरीराने अत्यंत लठ्ठ असणार्‍या स्त्रीने बाळाला स्तन्यपान करीत असताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांच्या आकाराने मोठ्या असणार्‍या स्तनांचा भार जर दूध पाजताना बाळाच्या मुखावर पडला तर त्या बाळाला श्वासोश्वासाला त्रास होऊन ते बाळ गुदमरू शकते. स्तनांतील आजार हे सहजतेने स्तन्यपान करणार्‍या बाळांमध्ये आजार व कुपोषणसुद्धा करते.

  • मस्टायटीस म्हणजेच स्तनातील मेदयुक्त भागाचे अतिवेदना करणारे इन्फेक्शन
  • ब्रेस्ट एन्गोर्जमेंट – अतिरिक्त प्रमाणात स्तन्याची उत्पत्ती होणे व ते स्तनामध्येच साठून राहिल्याने स्तनांना आलेली सूज.
  • निप्पल फिस्यर्स – स्तन हे कोरडे होऊन त्यावर भेगा पडणे, सोबत वेदना, त्यावर पुरळ येणे, खपल्या होणे इ.
  • एका स्तनामध्ये जास्त दूध उत्पन्न होणे व दुसर्‍यामध्ये कमी, तसेच काही लोकांच्या गालाला खळगे पडतात तसेच स्तनांवर देखील खळगे पडणे (डिम्प्लिंग) किंवा त्यावर सुरकुत्या पडणे (पकरिंग) हे स्तनातील एखाद्या ढेकूळ/टेंगूळ (ब्रेस्ट लम्प) असण्याचे प्रतीक आहे. पण हा ब्रेस्ट लम्प जखमेची खूण (स्कार), फाइब्रोएडीनोमा, लायपोमा (सौम्य मात्रेत चरबी वाढणे), सिस्ट (गळू होणे), डक्ट्स (स्तनातील नलिका)ची अभिवृद्धी होणे यांसारख्या कारणांमुळेसुद्धा होऊ शकतो.

आईने जर त्यांना एचआयव्ही, इबोला व्हायरस, सध्याचा कोविद-१९ व्हायरससारखे आजार असतील किंवा ड्रग्सचे (अमली पदार्थांचे) सेवन करत असतील तर बाळाला स्तन्यपान शक्यतो करू नये.

स्तन्यपान करीत असताना बाळाचे डोके थोड्या वरच्या दिशेला एका हाताने पकडावे जेणेकरून बाळाला दिलेले स्तन्य/दूध त्यांच्या नाकामध्ये जाऊ नये. कारण असे झाल्यास बाळाच्या नाक, कान, डोळे या सर्व अवयवांमध्ये इन्फेक्शन होण्याचे व तेथून हे इन्फेक्शन एकमेकांच्या आत पसरण्याची भरपूर शक्यता असते (हे सर्व अवयव एकामेकांशी संबंधित असल्याकारणाने).
स्त्रीने केलेल्या अयोग्य आहारामुळे योग्य प्रमाणात स्तन्याची उत्पत्ती न होणे, अगदीच न होणे व झाल्यास ते स्तन्य दूषित असणे अशा कित्येक गोष्टी बाळाच्या पोषणास महत्त्वाच्या ठरतात. बाळासाठी तेच तर सर्वांत पौष्टिक अन्न असते. आईचे मानसिक स्वास्थ्य योग्य असणेसुद्धा गरजेचे आहे (स्तन्यनिर्मितीवर याचा परिणाम दिसून येतो). म्हणूनच आहार, विहार इ. सर्व गोष्टी पडताळून पाहून दुरुस्त करणे गरजेचे.

स्तन्याचे शोधन होणे महत्त्वाचे व ते आयुर्वेदामार्फतच शक्य आहे. त्यासाठी पंचकर्माचाही आधार घेऊ शकतो. योग, आसन, प्राणायाम इ. हेही उपयोगी ठरतात व म्हणूनच अशा काही तक्रारी असल्यास तज्ञांचा, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ यांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.