राजभाषा संचालनालयाची योजना
राजभाषा संचालनालयाने गोव्यात संस्कृत भाषेचा प्रसार करण्याचे ठरविले असून त्यासाठी तयार केलेल्या योजनेनुसार संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रोत्साहन देणार्या संस्थांना वरील उपक्रमासाठी ५ लाख रुपयेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
संस्कृत वर्ग सुरू करणे, पुस्तके खरेदी करणे, संस्कृत भाषेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी मदत करणे, शिष्यवृत्त्या वितरीत करणे, दुर्मिळ ग्रंथांचे प्रकाशन तसेच संस्थांच्या इमारतींची सुधारणा करणे आदी कामासाठी अनुदान दिले जाईल. आतापर्यंत राज्यातील ५ संस्थांना वरील योजनेखाली अनुदान मंजूर केल्याची माहिती राजभाषा संचालक डॉ. प्रकाश वझरीकर यांनी दिली. संस्कृत भाषेचा प्रसार करणार्या संस्थांनी अनुदानासाठी संचालनालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन संचालनालयाने केले आहे.