सन २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यास काल दहा वर्षे पूर्ण झाली, मात्र तरीही या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याला अद्याप फाशी दिली गेली नसल्याच्या निषेधार्थ त्या हल्ल्यात हुतात्मे झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांनी कालच्या श्रद्धांजली कार्यक्रमावर बहिष्कार घातला. संसदेवरील हल्ल्यात नऊ सुरक्षा जवान हुतात्मे झाले होते.
१३ डिसेंबर २००१ रोजी पाच दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. त्यावेळी अनेक खासदार संसदेच्या इमारतीत होते. या हल्ल्याचा प्रतिकार करताना आठ सुरक्षा दलाचे जवान व एक माळी ठार झाले. या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई दिली, घरटी एक नोकरीही दिली, परंतु संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूच्या फाशीस विलंब लावला जात असल्याने आपल्याला न्याय मिळालेला नाही अशी या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भावना बनली आहे.
अफजल गुरू याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली असली तरी त्याची दयेची याचिका राष्ट्रपतींपुढे प्रलंबित आहे. त्याच्या शौकत हुसेन गुरू या नातलगाची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दहा वर्षे कारावास भोगल्यानंतर सुटका झाली. शौकतची पत्नी अफसान गुरू हिलाही निर्दोष मुक्त केले गेले आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यालाही सोडण्यात आले. हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार मौलाना मसूद अजहर व त्याचा साथीदार तारीक अहमद हे दोघेही पाकिस्तानात मोकळे आहेत. ज्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला चढवला होता ते पाचही कारवाईत ठार झाले होते व हल्ल्याचा मुख्य सूत्रधार गाझीबाबा हा काश्मीरमध्ये सन २००२ मधील एका चकमकीत मारला गेला होता.