राज्यातील १८९ पंचायतींपैकी १८५ पंचायतींच्या निवडणुका येत्या एप्रिल अथवा मे महिन्यात होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर १५०९ पंचायत प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे पंचायत संचालक मिनिनो डिसोझा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
लोकसंख्येनुसार पंचायत प्रभागांची फेररचना करण्यात येणार असून ते काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे डिसोझा यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणुक आयोग कुठल्याही क्षणी पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंचायत प्रभागांची फेररचना, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गीय व महिला यांच्यासाठीचे आरक्षण आदी कामे आम्हाला लवकरच हाती घ्यावी लागतील, असे पंचायत संचालक म्हणाले. पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींना १२ टक्के, इतर मागासवर्गीयांना १९.५ टक्के तर महिलांना ३३ टक्के एवढे आरक्षण असल्याचे ते म्हणाले. अनुसूचित जमातींसाठीचे प्रभाग फिरते ठेवावे लागतात असे सांगून त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रभागात आरक्षण ठेवता येत नाही, असे ते म्हणाले.
१५०० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या पंचायतीत ५ प्रभाग, २००१ ते ५००० लोकसंख्या असलेल्या पंचायतीत ७ प्रभाग, ५००१ ते ८००० लोकसंख्या असलेल्या पंचायतींत ९ प्रभाग तर ८००० वर लोकसंख्या असलेल्या पंचायतीत ११ प्रभाग ठेवावे लागतात असे डिसोझा यांनी सांगितले.