सत्तरी परिसरात पट्टेरी वाघांचा संचार
सत्तरी परिसरात पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपण्याच्या दृष्टीने वनखात्याला यश आले असून यंदाही या वाघाचा संचार सत्तरीतल्या बर्याच गावांत आढळलेला आहे. पट्टेरी वाघ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती प्रदेशातून जात असले तरी त्यात तथ्य नसून काही वाघांचे वास्तव्य कायमस्वरूपी सत्तरीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
पावसानंतर वन खात्याने या भागात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाचे अधिकृत पुरावे छायाचित्राच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी या महिन्यात प्रारंभ करणार असल्याचे प्रधान मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी स्पष्ट केले आहे. म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तित्व असल्याच वनखात्याने व डॉ. उल्हास कारंथ यांच्या वन्यजीव संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी छायाचित्र टिपले होते.
यंदा पावसाळा ऑक्टोबरपर्यंत लांबल्याने वाघाची छायाचित्रे टिपण्याची मोहीम आम्हांला पावसात प्रतिकूल परिस्थितीकडे एकत्रित केली होती. ती सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण होत आलेली आहे. हल्लीच केरी गावात वाघाने मेरू मारल्याची बातमी उघडकीस आलेली आहे. सुर्ल येथे गेल्या आठवड्यात येथील तरुण नामदेव गावस देवराईत गेले असता वाघाच्या डरकाळ्यांनी त्यांना परत गावी येणे भाग पडले.
म्हादई अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी परेश परोब यांना सत्तरीतल्या वाघाच्या संचाराची माहिती प्राप्त झालेली असून त्याच्या संवर्धनासाठी खात्यातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून त्याचे दर्शन ठाणे डोंगुर्ली त्याचप्रमाणे म्हाउस पंचायत क्षेत्रातल्या लोकाना झालेले आहे.
बंगळूरच्या वन्यजीव संस्थेचे संचालक डॉ. उल्हास कारथ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षांपासून वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे शोधून काढण्यासाठी मोहीम सुरू झालेली आहे. या मोसमापासून हे काम सुरू केले जाणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रतिनिधीकडे स्पष्ट केलेले आहे.