Home बातम्या राज्यात आजपासून तुळशी विवाह

राज्यात आजपासून तुळशी विवाह

0
श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात. गोव्यात गुरुवारपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे. 

तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजनोत्सव कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत: व्दादशीला करतात. तुळशीचे जीवनचक्र वैष्णवजनांच्या श्रद्धेशी व समर्पणाशी जोडले गेले आहे. विष्णूचे भक्त नियमित तुळशीची पूजा करतात. तुळशीशिवाय आपले घर व अंगण अगदी ओकेबोके, संस्कारहीन वाटते. तुळस घरादारातील वातावरण पवित्र करते. कार्तिक एकादशी झाल्यानंतर गोव्यात सर्वांना तुळशी विवाहाचे वेध लागतात. अंगणातील तुळशी वृंदावन सजवण्यासाठी तरूण मंडळी मग्न आहेत. बिठ्ठोण, पोंबुर्पा या भागात हे चित्र पाहावयास मिळत आहे. १४ रोजी हा सोहळा होणार असल्याने प्रत्येकाच्या घरी लग्न सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.

पेडणे परिसरातही लगबग

तुळशी विवाहासाठी हिंदू धर्मातील नागरिकांच्या घरासमोरील तुळशी वृदांवने विविध रंगांनी रंगून तुळशी विवाहासाठी सज्ज झाली आहेत. नागरिकांनी गेल्या ४/५ दिवसांपासून आपापल्या घरांसमोरील पवित्र मानली जाणारी तुळशी वृंदावने सजवून ठेवली आहेत. घरासमोरील तुळस भव्य व आकर्षक कशी वाटेल यावरच नागरिकांनी भर दिल्याने चित्र स्पष्ट दिसत आहे. कार्तिकी एकादशी झाल्यानंतर द्वादशीला तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. घरोघरी तुळशी वृंदावन सजवले जाते. उस, दिंडा, चिंच, आवळा, चुरमुरे, पोहे, लाडू अशा विविध प्रकारच्या फळांचा नैवेद्य तुळशी मातेला दाखवला जातो. काही ठिकाणी तुळशीला हिरवा शालू नेसवण्याची पद्धत आहे. सायंकाळी भटजींद्वारे विविध व सुहासिनीतर्फे जोडयांचा कार्यक्रम केला जातो. तसेच तुळशीची नारळ खणांनी ओटी भरली जाते. हा सर्व विधी झाल्यानंतर भटजीमार्फेत विधिवत मंगलाष्टके म्हणून तुळशी विवाह केले जातात.