Home बातम्या वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यात पुस्तक महोत्सवाचे योगदान

वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यात पुस्तक महोत्सवाचे योगदान

0

अभिनेते सचिन पिळगावकर यांचे प्रतिपादन राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाची सांगता

राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाची सांगता

समाजात वाचन संस्कृती रुजायला हवी. ही वाचन संस्कृती समाजामध्ये रुजवण्यासाठी ती जिवंत ठेवायची असेल तर अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवाचे वेळोवेळी आयोजन करावे लागेल असे प्रतिपादन काल हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले. पणजी येथे बांदोडकर मैदानावरील राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात ‘द मेनी लाइव्हस ऑफ सचिन पिळगावकर’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना, हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करीत असताना त्याकाळातील आघाडीची अभिनेत्री व ‘ट्रॅजिडी क्वीन’ मीना कुमारी आणि त्या काळातील सुप्रसिद्ध गीतकार व सायर मजरूह सुलतानपुरी यांनी आपणाला उर्दू भाषा बोलण्यास शिकवली व त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना आपणाला खूप फायदा झाला, असे ते म्हणाले.

आपण केवळ सहा वर्षे वयाचा असताना त्या काळातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात आपणाला बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटात केलेल्या भूमिकेसाठी आपणाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तद्नंतर मराठीतील कित्येक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर हिंदी चित्रपटातही अभिनय करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना मीनाकुमारी यांनी आपणाला उर्दू शिकवल्याचे व हिंदी चित्रपटात काम करताना हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्याचे अभिनय करताना त्याचा खूप फायदा झाल्याचे सचिन पिळगावकर यांनी स्पष्ट केले.

मी मूळ गोमंतकीय
आपला जन्म मुंबईत झालेला असला तरी आपण मूळ गोमंतकीय असून आपले पूर्वज हे गोव्यातील पिळगाव या गावातील होते. सुमारे पाच पिढ्यांपूर्वी आपले पूर्वज गोवा सोडून गेले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी आपण आपल्या पिळगाव येथील मूळ गावी घर बांधणार असल्याचे स्पष्ट केले. शक्य झाल्यास गोव्यातील कलाकारांना घेऊन एका कोकणी चित्रपटाची निर्मितीही करू असे अन्य एका प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगून यापुढे चित्रपटांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास आपणाला आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण सहा वर्षांचा असताना आपल्या वडिलांचा प्रिटिंग प्रेस आगीत जळून खाक झाला आणि त्यानंतरच आपला चित्रपटसृष्टीतील प्रवासही सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

नंतर मोठा झाल्यावर ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘नदिया के पार’, ‘शोले’ अशा चित्रपटात भूमिका मिळाल्याचे आणि पुढे हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत संधी मिळत राहिली असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याला वयापेक्षा लहान दिसण्याची जी देणगी आहे ती आपणाला आपल्या आईकडून मिळाल्याचे सांगून आईकडून मिळालेल्या गुणसूत्रांची ती कमाल असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय आपण आरोग्याकडेही खास लक्ष देत असतो असे सांगून पथ्यपाणी काही करीत नाही मात्र अन्न सेवन प्रमाणाबाहेर करीत नसल्याचे सचिन यांनी सांगितले.

पालकांना वेळ द्या
जीवनात तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी रोज पालकांसाठी थोडा वेळ द्या. त्यांच्याबरोबर रहा, त्यांच्याशी गप्पा मारा असा सल्लाही त्यांनी दिला. आपण रोज रात्रीचे जेवण आपल्या कुटुंबीयांबरोबर जेवत असतो आणि त्यावेळी आपली आईसोबत असते, अशी माहितीही त्यांनी दिली. तुम्ही तुमच्या अनमोल अशा वेळेशिवाय तुमच्या पालकांना काहीही देऊ शकत नसल्याचे ते यावेळी म्हणाले. पालकांना तुमच्याकडून महागड्या वस्तू, दागिने, कपडे, पैसे असे काहीही नको असते. त्यांना तुमच्याकडून प्रेम हवे असते आणि त्यांच्याशी बोलून, त्यांच्याबरोबर राहून तुम्ही त्यांना ते प्रेम देऊ शकता, असे सचिन यांनी स्पष्ट केले.
हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत असताना मराठी भाषेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे आपणाला मराठी चांगल्या प्रकारे बोलता येईल की नाही अशी भीती आपल्या मनात निर्माण झाली होती, असे सांगून मराठीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अभिनेते अशोक सराफ व आपली पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांनी मदत केल्याचे ते म्हणाले.

‘शोले’ चित्रपटातील भूमिका
शोले चित्रपटातील भूमिका कशी मिळाली यावर बोलताना त्यांनी, रमेश सिप्पी यांच्या ‘बह्मचारी’ या चित्रपटात आपण बालकलाकार होतो. त्यामुळेच ‘शोले’ चित्रपटात आपणाला भूमिका मिळाल्याचे ते म्हणाले.

आत्मचरित्र लिहिले
‘हाच माझा मार्ग’ हे आत्मचरित्र लिहून 2013 या साली प्रकाशित केले. त्यावर्षी माझ्या चित्रपटातील कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यावर्षी पुस्तकाचे प्रकाशन केले. आपल्या जीवनात जे-जे काही घडले ते लोकांना सांगता यावे यासाठी हे पुस्तक लिहिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुस्तक महोत्सवात काल यावेळी ‘हाच माझा मार्ग’ या आत्मचरित्राच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. चौथ्या आवृत्तीची पहिली प्रत यावेळी सचिन यांनी आपले एक स्नेही असलेले गोव्यातील उद्योजक अनिल खंवटे यांना भेट दिली. कार्यक्रमानंतर सचिन पिळगांवकर ज्या ज्या लोकांनी यावेळी या चौथ्या आवृत्तीच्या पुस्तकाची खरेदी केली त्यांना त्या पुस्तकाच्या प्रतीवर स्वतः सही करून दिली. यावेळी कार्यक्रमाला रसिक व चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सव्वा लाख पुस्तकप्रेमींची उपस्थिती
पणजी येथील बांदोडकर मैदानावर दि. 4 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या पुस्तक महोत्सवाचा काल दि. 8 रोजी समारोप झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत महोत्सवाला सव्वा लाख पुस्तकप्रेमींनी उपस्थिती लावल्याची माहिती आयोजकांनी दिली.