सध्या मगोची भाजप बरोबर युती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका असेल यावर अद्याप निर्णय झालेला नाही. जनतेच्या दरबारात जाऊन लोकांची मते अजमावल्यानंतरच यासंबंधीचा निर्णय होणार असल्याचे मगोचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय समितीचे पदाधिकारी परशुराम कोटकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
शशिकला काकोडकरांनंतर पक्षाला बहुजन समाजातील जे नेते मिळाले ते संधीसाधू होते. त्यांनी पक्ष संपविण्याचा कट रचला होता. आपण सही न केल्यानेच पक्ष विसर्जित होऊ शकला नाही, असे सांगून ढवळीकर बंधूंनी पक्षाला संजिवनी देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे कोटकर यांनी सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटीत करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा नेत्यांवर आरोप करण्याचा जनजागृती मंचचे निमंत्रक गोविंद गावडे यांना अधिकार नाही, असे कोटकर म्हणाले.गावडे यांनी पक्षात प्रवेश करावा. पांच वर्षेपर्यंत पक्ष संघटीत करण्यासाठी कार्य करावे व त्यानंतरच विधाने करावी, त्यांनी सांगितले.
पक्षाने आता चाळीसही मतदारसंघात काम सुरू केले आहे. मगोचा पाठिंबा नसताना राज्यात कुणालाही सरकार स्थापन करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय समितीचे पदाधिकारी दिनेश गावडे यांनीही गोविंद गावडे यांच्या वक्तव्यास हरकत घेतली. गावडे यांनी समाजासाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला
केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष नवा आहे. तो स्थिरस्थावर झाल्यानंतरच त्या पक्षावर भाष्य करणे योग्य होईल, असे कोटकर यांनी एका प्रश्नावर सांगितले. पक्षाचे नेतृत्व कुणाच्याही हातात असले तरी मगो हा बहुजन समाजाचाच पक्ष आहे, असे ऍड. नारायण सावंत यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत, रत्नाकांत मार्दोळकर, आपा तेली, गजानन तिळू नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.