बाणावली येथील ताज एक्झॉटिका हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी सरचिटणीस सुधाकर रेड्डी, मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, उपसभापती माविन गुदिन्हो, बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, सरचिटणीस विजय सरदेसाई व वालंका आलेमाव उपस्थित होत्या.
विजयाची खात्री असलेल्यांना उमेदवारी देण्या बरोबर जनमानसातील असलेल्या प्रतिमेचाही विचार केला जाईल. माविन गुदिन्हो इतर पक्षांशी युती न करता एकला चलो म्हणून जाहीर करतात खरे पण कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर केंद्रीय पातळीवर युती चालू असल्याने व गोव्यात युतीचे सरकार असल्याने युती या पुढेही चालू राहील. तसेच म. गो. बरोबरही युती कायम असेल. मात्र जागांबाबत एकत्रित चर्चेनंतर सामोपचाराने ठरविले जाईल, असे ते म्हणाले. महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे धोरण गोव्यातही लागू आहे, पण महिलांनी पुढे आले पाहिजे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही आरक्षणाच्या मताच्या आहेत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ब्रार यांनी सांगितले. एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी दिली जाईल हे ठरविलेले नाही. कॉंग्रेस पक्षात तसे कोणतेच बंधन नाही. समाजातील सर्व थरातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळावे असे पक्षाला वाटते. एकाच कुटुंबांतील दोनापेक्षा जास्त जणांना उमेदवारी दिल्यास छोट्याशा गोव्यात पाचसहा कुटुंबांची मक्तेदारी राहील, असा प्रश्न विचारला असता कोणताच निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. विष्णु सूर्या वाघ हे अखिल भारतीय कॉंग्रेसचे सदस्य कॉंग्रेस सोडून भाजपात गेले आहे. याआधी त्यांचे अनेक पक्षात येणे-जाणे चालू आहे. त्याचा परिणाम पक्षावर होणार, जनता वाघांना चांगली ओळखते. भविष्यात मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना कॉंग्रेस समितीत पदे देताना खबरदारी बाळगावी लागेल. लवकर वाघांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाईल, असे ते म्हणाले.
अनेक घोटाळ्याची प्रकरणे न्यायप्रवीष्ठ असल्याने त्यावर आपले मत देणार नाही. भाषा माध्यमाचा निर्णय गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. तो बदलणे शक्य नाही. पण तेही प्रकरण न्यायालयात आहे. पालक व मुलांना माध्यम स्वीकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले. भाजपातील अनेक नेते भ्रष्टाचारात गुंतले आहेत. बंगारू लक्ष्मण, कर्नाटकातील सरकारातील कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गजाआड झाले असताना भाजपाचे नेते जनचेतना यात्रा काढून भ्रष्टाचार विरुद्ध बोलतात त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी सांगितले. गोव्यात १४ नोव्हेंबरपासून पदयात्रा सुरू होणार त्यावेळी भाजपाच्या आरोपाला चोख उत्तर देऊ, असे ते म्हणाले.
ब्रार व रेड्डी यांची कॉंग्रेस आमदारांशी चर्चा
गोव्याचे कॉंग्रेसचे प्रभारी जगमितसिंग ब्रार व सरचिटणीस सुधाकर रेड्डी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या पुत्राच्या विवाहासाठी आले होते. त्यांचा मुक्काम दक्षिण गोव्यातील तारांकित हॉटेलात असून काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली.
गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंह राणे यांनी दोघांची भेट घेऊन चर्चा केली व इतर मंत्री व आमदारांना न भेटता परत गेले. मुख्यमंत्री दिगंबर कामत पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले व ती संपताच पणजीला निघाले.
मध्यंतरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या युतीसंबंधी राष्ट्रवादीच्या प्रभारी भारती, प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट व महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांची ब्रार व सुधाकर रेड्डी यांची चर्चा झाली व त्यांनी बारा जागांची मागणी केल्याचे कळते. वीजमंत्री आलेक्स सिकैरा, बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, गृहमंत्री रवी नाईक, आमदार श्याम सातर्डेकर, आमदार बाबू कवळेकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, दयानंद नार्वेकर, आमदार गावस तसेच खासदार फ्रान्सिस सार्दिनचे पुत्र शेलॉन सार्दिन, विजय सरदेसाई यांनी भेट घेतली. गोव्यातील घोटाळ्यासंबंधी पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याने या भेटीत चर्चा केल्याचे समजते.