राज्यातील धरणांमध्ये पुढील दीड महिना पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता करण्याचे कारण नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आल्तिनो पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल स्पष्ट केेले.
दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणामध्ये सध्या 40 टक्के पाण्याचा साठा असून, हा साठा दोन महिने पुरणारा आहे. तसेच, दक्षिण गोव्यातील कुशावती नदीचे पाणी मे महिन्यात खेचून वेर्णा येथे पुरविले जाणार आहे. तिळारी धरणामध्ये 41 टक्के पाण्याचा साठा आहे. आमठाणे धरणामध्ये 44 टक्के पाण्याचा साठा आहे. आमठाणे धरणात नदीतील पाणी साठवून ठेवले जाते. त्यामुळे ह्या धरणातील पाण्याची पातळी 60 टक्क्यापर्यंत वाढवली जाऊ शकते, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
तिसवाडी, फोंडा या तालुक्यांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खांडेपार नदीमधील बंधाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच, खाण खंदकातील पाणी खेचून नदीत सोडण्यात येणार आहे, असेही शिरोडकर म्हणाले.
मांडवी नदीतील खाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत अभ्यास केला जात आहे. सध्या पणजीला ओपा-खांडेपार येथील जलशुद्धकीण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. राज्यातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी नवीन बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणातील पाण्याची पातळी 23 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. या धरणातील पाणी दीड महिना पुरण्यासाठी पाणी सोडण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले जाणार आहेत. पंचवाडी धरणामध्ये 35 टक्के पाण्याचा साठा आहे. हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.