Home बातम्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम सुरक्षित : आयोग

स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम सुरक्षित : आयोग

0

ईव्हीएमशी छेडछाडीचे टीएमसीचे आरोप फेटाळले

मतदान होण्यापूर्वी, मतदान सुरू असताना विविध कारणांनी चर्चेत असणारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आता मतदानाच्या नंतर देखील वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी अन्य संबंधित पक्षांच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत मतपेट्या (ईव्हीएम) उघडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काल तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला. यावेळी स्ट्राँग रुमबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर काल रात्री उशिरा पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि स्ट्राँग रुममधील ईव्हीएम सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. तसेच ईव्हीएमसोबत कोणतीही छेडछाड झाली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील एका स्ट्राँग रुम असलेल्या एका केंद्रावर पोहोचल्या होत्या. जवळपास 2 तासांहून अधिक वेळ ममता बॅनर्जी त्या ठिकाणी हजर होत्या.

30 एप्रिल 2026 आणि 17 वाजून 55 मिनिटांचे एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यात काही व्यक्ती ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये संशयास्पदरित्या वावरताना दिसत आहेत. यानंतर टीएमसी नेत्यांनी नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील स्ट्राँग रूमच्या बाहेर धरणे आंदोलनास सुरुवात केली. टीएमसी नेते शशी पांजा आणि कुणाल घोष स्ट्राँग रूमच्या बाहेर आंदोलनला बसले होते.
यानंतर काल रात्री पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आणि स्ट्राँग रुम सील केले असल्याचे स्पष्ट केले. ईव्हीएम यंत्रांशी कोणतीही छेडछाड, गैरप्रकार झाला नसल्याचेही नमूद केले.