Home बातम्या मूकसंवादी ‘दि आर्टिस्ट’

मूकसंवादी ‘दि आर्टिस्ट’

0

– समीर झांट्ये

काही योग जुळून येत असतात. ऑस्करमध्ये ‘दि आर्टिस्ट’ सर्वोत्कृष्ट ठरणे आणि त्याचवेळी तो पणजी येथे मल्टिप्लेक्समध्ये सुरू असणे हा असा एक सुंदर योगायोग होता, जो कसाच टाळता आला नाही.

सिनेमा सुरू होण्याआधीच हा सिनेमा कुतूहल जागे करतो. याचे प्रमुख कारण म्हणजे रंगीत, शब्दबंबाळ संवादांनी भरलेला, पदोपदी गीतांचा आवाज असलेला, सिनेमा पाहण्याची-ऐकण्याची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांना – कानांना एक असा चित्रपट पाहायचा-ऐकायचा असतो जो बोलणार नाही, जो ‘केवळ कृष्ण-धवल‘ असेल, जो संवादांविना चालेल, ज्यात ह्रदयंगम गाणी नसतील, सिनेमास्कोपच्या आडोशातून स्क्रीनला काहीसे संकुचित करून तो प्रदर्शित होणारा असेल….

‘दि आर्टिस्ट’ ही एक प्रेमकहाणी आहे एका सिनेकलाकाराची व याच क्षेत्रात त्याच्या धारणांविरुद्ध भरारी घेत जाणार्‍या त्याच्या प्रेयसीची. मूकपटांचा जमाना संपून बोलपट सुरू झाले त्या स्थित्यंतराच्या पार्श्‍वभूमीवर सिनेमाचे कथानक आधारले आहे. विनोद, रोमेंटीकपणा व काहीसे गांभीर्य यांचा संतुलित वापर चित्रपटात झाला आहे. कृष्ण-धवल सिनेमास्कोपीक सादरीकरणातून ‘आर्टिस्ट’ला एक अभिजातपणाची झळाळी प्राप्त झाली आहे. सिनेमात १९२७-३० या काळातील हॉलिवूड, जनमानस, परिसर, जीवनशैली सक्षमरितीने साकारलेली आहे.

प्रमुख कलाकार असलेला जॉर्ज व्हॅलेण्टाइन हा मूकपटातील आपल्या कारकिर्दीत उंच शिखरावर पोचलेला असतो. आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला असतो. अशाचवेळी सिनेजगतात एक मोठी घटना घडते. बोलपट सुरू होतात. मात्र जॉर्ज व्हॅलेण्टाइन या ‘बोलण्याला’ कमी लेखत बोलपटात काम करण्यास नकार दर्शवतो. नंतर त्याला घेऊन चित्रपट बनविणारा स्टुडिओ मूकपटांची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेऊन बोलपटांच्या क्षेत्रात प्रवेश करतो.

असे करताना नवीन चेहरे घेण्याचे ठरवले जाते. यात एक चेहरा असतो तो एकेकाळी स्वत: व्हॅलेण्टाइनची चाहती असलेल्या व एका गर्दीत व्हॅलेण्टाइनला आपटल्याने सिनेपत्रकारांच्या नजरेत येऊन अपघाताने जगासमोर आलेल्या पेपी मिलर हिचा. पुढे मिलर सिनेमातील एका नृत्यात निवडली जाते. तिथे पुन्हा व्हॅलेण्टाइनशी तिची नजरानजर होते. निर्माता तिला कंपनीत ठेवायला अनुकूल नसतो. मात्र (तिच्या नृत्यावर भाळून कदाचित) तिला स्टुडिओत ठेवून घेण्यास व्हॅलेण्टाइन निर्मात्याला भाग पाडतो. नंतर सिनेमातील एका चित्रीकरणावेळी त्या दृश्याच्या गरजेपोटी दोघे एकत्र येतात व खरोखरीच एकमेकांत गुंतून जातात.

मात्र मूकपट-बोलपट विवादात त्यांचे मार्ग बदलतात. व्हॅलेण्टाइन आपली पूर्वीची कंपनी सोडतो आणि पुढेही मूकपटांचीच निर्मिती करण्याचा इरादा कायम ठेवतो. हे सर्व होताना त्याला जास्त दु:ख असते ते त्याची प्रेयसीही त्याला सोडून बोलपटात करिअर करण्याचा निर्णय घेते याचे. मात्र तो तिला याबाबत काहीही कळू देत नाही. पुढे एक मुलाखत देताना त्याची प्रेयसी मिलर मूकपटांबद्दल अनुद्गार काढते, तरीही तो सहन करून निघून जातो.

तो आपला चित्रपट काढतो. त्याचवेळी त्याच्या प्रेयसीचा चित्रपट निघतो. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतात. शेवटी व्हायचे तेच होते. काळाचा प्रवाह बदललेला असतो. व्हॅलेण्टाइनचा चित्रपट आपटतो, कारण बोलणार्‍या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा ओढा असतो. मात्र या पहिल्या प्रयोगाला मोजक्याच प्रेक्षकांमध्ये त्याची प्रेयसी व्हॅलेण्टाइनचा चित्रपट बघत असते. तो बघताना तिच्या डोळ्यांतून अश्रू येतात. तिकडे आपला खेळ संपवून बाहेर पडताना व्हॅलेण्टाइनला समोरच्याच थियेटरमध्ये असलेली तिच्या प्रेयसीच्या चित्रपटासाठीची गर्दी दिसते ती पाहून त्याच्या भावना पुन्हा दाटून येतात.

पुढे चित्रपटात काळाच्या प्रवाहावर आरुढ होत त्याची प्रेयसी मिलर यशाची शिखरे पादाक्रांत करीत जाते व दुसरीकडे व्हॅलेण्टाइन आपल्या हट्टी धारणांमुळे जीवनाच्या विविध चढउतारांवरून जातो, कर्जबाजारी होतो-कंगाल होतो, स्वत:चे घर व इतर वस्तूचा लिलाव करायची पाळी त्याच्यावर येते. एका दृश्यात आपले कपडे विकायची आणि ते विकताना ‘बार्गेनिंग’ करायचे पाळी या एकेकाळच्या बादशहावर येते. त्याची पत्नीही त्याला सोडून निघून जाते. एका आगीत तो मरता मरता आपल्या प्रिय कुत्र्यामुळे वाचतो. आता वाटते की व्हॅलेण्टाइन कलाकार म्हणून संपला आहे. एकदा तर त्याला वाटते की आपली सावलीही आपणास सोडून जात आहे. याच रागाने तो आपल्या मूकपटांची सर्व रिळे जाळून टाकतो. पण हे करताना त्याच्या लक्षात येते की आपले एक आवडते रीळही त्यात मिसळून गेले आहे.

दरम्यान, तो आगीत जखमी होऊन इस्पितळात असल्याचे कळल्यावर अजूनही त्याच्यावर जीव लावून असलेली मिलर तिथे पोचते. पाहते तर ते रीळ ती दोघं ज्या दृश्यावेळी सर्वप्रथम प्रेमात पडली त्या चित्रीकरणाचे असते. ती डॉक्टरना व्हॅलेण्टाइना आपल्या घरी नेण्याबाबत विनंती करते. तिथेच व्हॅलेण्टाइनला कळते की जिच्याबद्दल त्याने आपल्या मनात प्रेम टिकवून ठेवले आहे त्या मिलरनेच त्याने लिलावात काढलेल्या सर्व वस्तू विकत घेऊन सांभाळून ठेवल्या आहेत.

याच दरम्यान त्याची प्रेयसी निर्मात्याला विनंती करून बोलपटांत व्हॅलेण्टाइनला काम मिळवून देण्यात यशस्वी होते. मात्र त्याचा हट्ट कायम असतो. काम मिळणार असल्याचे कळूनही तो आपल्या जळक्या घरात निघून जातो व तिथे आत्महत्येचा प्रयत्न करतो. याचवेळी त्याची प्रेयसी मिलर दाखल होते व त्याला बोलायचे नसेल तर नृत्यात सहभागी हो असे राजी करून घेते. तो ते कबूल करतो. त्याच्या ‘मूकपणा’ला ठेवलेले नाव पुसून टाकताना तो एक वेगळा ’मूकपणा‘ आता वापरणार असतो.

वर वर या प्रेमकहाणीत व्हॅलेण्टाइन हा अहंकारी कसा वाटतो, मात्र त्याच्या या सर्व धडपडीतून एका कलाकाराचा ‘प्रतिष्ठे’साठी शोध दिसतो. एक कलाकार म्हणून आपल्या अस्तित्वासाठी तो झगडताना दिसतो. बदलांना शरण जाऊन कलाकार म्हणून जगणे त्याला मंजूर नाही. तो आपल्या मतांनुसार जगू इच्छितो. शेवटी तो साबित करतो की कलाकार कधीच संपत नसतो.

प्रेक्षकांना आपल्यात ‘इन्व्हॉल्व्ह’ करून घेणार्‍या दुर्मीळ चित्रपटांपैकी ‘आर्टिस्ट’ एक आहे. विशेष म्हणजे स्वत: काहीही न बोलता चित्रपट हे सर्व साधून जातो. हा चित्रपट केवळ अभिनयाच्या बळावर उभा राहतो. सगळ्यांना गुंतवून ठेवतो. सच्चे सिनेरसिक आणि आस्वादक घडविण्याची क्षमता अशा चित्रपटांत असते. हल्लीच्या चित्रपटांतील अति बोलण्यातून हरवत चाललेला अभिनयाचा सूर हा चित्रपट पाहताना तल्लीन करून जातो.

एका मंद संगीताच्या पार्श्‍वभूमीवरील कृष्णधवल पटावरील दृश्ये सरकताना प्रेक्षकांच्याही मनात त्या दृश्यांना अनुरूप भाव उमटत जातात आणि चित्रपटाबद्दल गुंतागुंत वाढवत जातात, कधी तुम्ही गंभीर बनता, कधी खुद्कन हसता तर मध्येच अचानक नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याची जाणीव होते. पण प्रत्यक्ष चित्रपट मात्र एखादी सुताची गुंडी सुत गुरफटवू न देता सोडवावी व परत त्याच सफाईने पुन्हा गुंडाळावी तसा पुढे पुढे होत ‘क्लायमेक्स’ला पोचतो. चित्रपटात कुत्र्याची ‘भूमिका’ फारच सुरेख वठली आहे. त्याचे वर्णन शब्दातीत आहे. मूक अभिनयाच्या तत्त्वज्ञानाचा मानदंड बनूनच जणू तो वावरतो. शिवाय चित्रपटातील दृश्येही ‘आर्टिस्टीक’ आहेत. लिलावावेळी व्हॅलेंटाइनचे ‘एक्झीट’ दरवाजापाशी उभे असणे, कंगाल झाल्यानंतर एकदा रस्ता ओलांडताना तो जातो त्या आस्थापनाचे नाव ‘लोनली स्टार’ असणे अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

चित्रपटाच्या अंतिम दृश्यावेळी, व्हॅलेण्टाइन नृत्यासाठी राजी झाल्यावर त्याचा मिलरसोबत नृत्याचा शॉट संपतो तेव्हा सुमारे शंभर मिनिटांच्या या चित्रपटात शेवटी त्याच्या निर्मात्याच्या (ज्याने त्याचा जमाना संपल्याचे सांगून दूर केलेला असतो) तोंडून मूकपटातील पहिला एक शब्द बोलला जातो…. ‘परफेक्ट’ प्रेक्षकांच्या ह्रदयातून ओठांपर्यंतही तोपर्यंत तीच प्रतिक्रिया पोचलेली असते…. परफेक्ट! हे ‘परफेक्शन’ अनुभवण्यासारखे आहे ते ‘बोलून’ समजणार नाही.