– सौ. लक्ष्मी जोग
लग्न… मानवी जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय! लग्न हा विषय माणसाच्या एकूण जगण्याशी आणि समाजजीवनाशी निगडित आहे. माणसाच्या प्रगतीची किंवा अधोगतीची, त्याच्या स्वास्थ्याची किंवा अस्वास्थ्याची पायाभरणी या निर्णयातून होते. पाण्याने काठोकाठ भरलेल्या शांत तळ्यात एक छोटासा कणसुद्धा पडला तर त्यात असंख्य तरंग उत्पन्न होतात, त्याप्रमाणे एखाद्या कुटुंबात घडणारी चांगली-वाईट घटना समाजात अनेक उलटसुलट विचारांचे तरंग निर्माण करत असते. म्हणून समाजस्वास्थ्यासाठीसुद्धा कुटुंबात नेहमी चांगल्या घटना घडाव्यात. त्यासाठीच विवाहासारखी महत्त्वाची गोष्ट खूप विचारपूर्वक करायला हवी. माणसाची जगण्याची शैली जोडीदारामुळे बदलते.
मग ‘लग्न’ याचा अर्थ काय आहे? मी लग्न का करणार आहे? लग्नापासून मला सुखच मिळणार आहे का? एकमेकांच्या गळ्यात फक्त माळ घालणं किंवा रजिस्टारसमोर दोघांनी सह्या करणं म्हणजे लग्न?
लग्नात फक्त माळ घालण्यासारखे अन्य संस्कार, देणे-घेणे, मानपान यांचाच विचार न करता आयुष्यभर एकमेकांसमवेत, त्यांच्यातील चांगल्या-वाईट गुणांसकट सगळ्याचा विचार करून राहायचे आहे. ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळे वळण लागणार आहे त्या निर्णयापूर्वी माझा काही अभ्यास झाला आहे का? लग्नानंतरच्या समृद्ध सहजीवनाचा विचार लग्नापूर्वीच व्हायची गरज आहे. सध्याच्या काळात वधू-वर पूर्वीसारखे अपरिपक्व नसतात. वयानेही मोठे असून शिकलेसवरलेले असतात ही आनंदाची गोष्ट आहे. असे असले तरी कुटुंबातल्या लोकांचे स्वभाव व आजूबाजूची परिस्थिती डोळसपणे पाहणारे फारच कमी. पूर्वीप्रमाणे त्यांच्यावर लग्न लादण्याचे प्रकारसुद्धा कमी असतात. आपला जोडीदार किती शिकलेला असावा? घरात येणार्या आपल्या पत्नीने नोकरी करावी की नाही? आपल्याला एकत्र कुटुंबात राहायचे आहे की स्वतंत्र? याचाही विचार आधी केलेला असावा. तो हल्ली बहुतेकजण करतातच. त्याही पुढे जाऊन त्याचे/तिचे शिक्षण कुठल्या शाखेचे आहे? नोकरी घरापासून सोयीच्या ठिकाणी आहे का? या गोष्टीचासुद्धा विशेषतः मुली विचार करतात व त्याप्रमाणे पसंती देतात.
पुढे होणार्या सहजीवनाचा विचार लग्नापूर्वीच व्हायला हवा असे वर म्हटले त्याचे कारण, काहीवेळा लग्नानंतर लगेचच काही घरांत अतिशय स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली दुर्दैवाने दिसते. याची कारणे अनेक आहेत. जुळवून न घेण्याचा स्वभाव, घरातील वयोवृद्ध आजारी व्यक्ती, अपंग किंवा मतिमंद मूल यामुळे वादविवाद सुरू होतात. नवीन येणार्या सुनेने सहयोग दाखवला तर ठीक; अन्यथा कलह व्हायला वेळ लागत नाही. या बाबतीत स्पष्टच सांगायचे तर मुलगा/मुलगी अपेक्षेप्रमाणे चांगला किंवा चांगली असेल तर तेवढ्यापुरती आवडल्याची पावती देऊन लग्न झाल्यावर लगेच आपला खरा रंग दाखवायचा असे प्रकारही घडतात. हे घातक आहे. लग्नाच्या बाबतीत खरं असणं व खरं सांगणं खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून घरात लग्न व सहजीवन यांच्यावर इच्छुक मुला-मुलीसमक्ष चर्चा व्हायला हव्या. सहजीवन फक्त पती-पत्नीचे नव्हे तर कुटुंबीयांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग असणार याचा विचार दोघांनीही करायला हवा. विचारमंथन व्हायला हवं. एकमेकांशी बोलून, संवाद साधून घरातल्यांच्या संमतीने अपेक्षा पक्क्या करायला हव्यात. विवाहेच्छू तरुण-तरुणींना जोडीदार निवडताना पालकांनी आधार द्यायला हवा. त्याचबरोबर त्यांच्या अवास्तव मागण्या, इच्छा यांना आवर घालायला हवी. त्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी.
आजकाल मुला-मुलींची लग्ने जमणे जिकिरीचे बनले आहे. दिवस बदलले आहेत तशी परिस्थितीही बदलली आहे. पूर्वी मुलीची बाजू म्हणजे कमी प्रतीची मानली जात असे. त्यात तिचा पिता गरीब असला तर त्या कमीपणाच्या न्यूनगंडाखाली तो अक्षरशः दबला जात असे. अशा परिस्थितीत एकदाचं मुलीचं लग्न झालं की सुटलो! असं त्याला वाटल्यास त्याचा दोष मानण्याचे कारण नाही. कारण वर पक्ष इतकी अडवणूक, छळ करायचा की सांगता सोय नाही. मग योग्ययोग्यतेचा फारसा विचार न करता मुलीला समोरच्या तिच्यापेक्षा सर्वार्थाने अयोग्य अशा मुलाच्या गळ्यात माळ घालून जन्म काढावा लागे. शिकलेली व अंगठेबहाद्दर, गरीब गाय व शीघ्रकोपी, अकांडतांडव करणारा, अशा जोड्या नाइलाजाने ‘पदरी पडले, पवित्र झाले’ या न्यायाने संसाराचा गाडा ओढताना दिसतात. अजूनही खेडोपाडी क्वचित असे घडते. पण एकंदरीत विचार केल्यास आर्थिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली असते. मुलीही अयोग्य वराला नकार देण्याइतपत धाडसी बनल्या आहेत. जन्मभर रडत-कुढत राहण्यापेक्षा असा निर्णय खरोखरच हिताचा ठरतो. हल्ली गोव्यात तरी मुलाचे आईवडील आपणहून मुलीची माहिती काढून, त्यांना फोन करून विवाह जमवण्याचे पहिले पाऊल उचलताना दिसतात. कुटुंबात मुलाइतकंच मुलीलाही महत्त्व आहे हे पटू लागल्याचंच हे द्योतक आहे. मुलांचेही लग्न जमवण्यास अनंत अडचणी येतात. पूर्वी हा मक्ता मुलींचाच असा गैरसमज होता. वधूपक्षाकडे आपण जाणे यात काहीही गैर नाही, कमीपणा नाही हे वरपक्षाला आता उमजू लागले आहे.
आता प्राधान्य आहे मुलामुलींच्या आवडीला. लग्न वेळेवर व्हावे व अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी आईवडील प्रयत्नशील असतातच. त्यांची ती खरे तर जबाबदारीच असते. पण जसजसे दिवस जातात तसतसे या जबाबदारीचे ओझे व्हायला लागते. डोळ्यांत पाणी आणून ‘कसंही करून एकदा जमवा हो लग्न!’ असं सांगितलं जातं तेव्हा त्या मुलाच्या आईबापांची कीव येते.
आज लग्न जमणं किंवा जमवणं अवघड का झालं आहे? आज मुला-मुलींना वाढवताना पालक पूर्वीपेक्षा जास्त जागरूक झाले आहेत. मुलंही कमी असतात व आर्थिक स्थितीही चांगली असते. मुलांना भरपूर शिकवायला ते प्राधान्य देतात. मुलींना तर भरपूर शिकवून स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी पराकाष्ठा करतात. सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, त्यांचे छंद, आवडी-निवडी, व्यक्तिस्वातंत्र्य, लाड, करिअर हे सर्व जपत असतात. हे सगळं पैसा खर्च करून देता येतं, पण त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणं हेही त्याचबरोबर गरजेचे आहे. आपल्या मुला-मुलींत काही निर्णय घेण्याची व त्याची जबाबदारी पेलण्याची क्षमता, ताकद आहे का? हेही समजून घ्यायला हवं. ‘नकार’ स्वीकारण्याची त्यांची कितपत तयारी आहे हेही पडताळून पाहायला हवं. ही निर्णयक्षमता लग्नाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची ठरते. कारण त्यावर त्यांचे पुढील जीवन अवलंबून असते.
काही मुलींचा एक असा गोड गैरसमज असतो की भरपूर शिक्षण व नोकरी असली की झालं! त्याचबरोबर उत्तम रूप असेल तर सोन्याहून पिवळं! पण या सगळ्याबरोबर थोडंफार घरकाम, स्वयंपाक, स्वावलंबन हेही तितकंच महत्त्वाचं आहे, अगत्याचं आहे! माझ्या मुलीला चहासुद्धा करता येत नाही, अशी प्रौढी काही आईवडील मिरवतात. ते ऐकून आश्चर्य वाटतं. एकतर एकत्र कुटुंब नको, वेगळं राहायला आवडतं. मग स्वयंपाक न येऊन कसं चालेल? याचा विचारच करत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याबद्दल महत्त्वच कुणी सांगितलेलं नसतं. किंवा अतिलाड, व त्यातून उद्भवलेली बेफिकीर वृत्ती व आळस! शिवाय मी मिळवते, या सगळ्या कामासाठी मी नोकर ठेवीन, आणि नोकर आलाच नाही तर हॉटेल आहेच! काही आईबापच मुलींच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढवतात. उदा. दहावी नापास किंवा पास, बारावी शिकलेली मुलगी आपल्याला उच्चशिक्षित किंवा सरकारी ऑफिसर नवरा हवा अशी जेव्हा अपेक्षा करते तेव्हा आईवडिलांनी तिला तिच्या शिक्षणाची जाणीव करून देऊन तिची जागा दाखवायला हवी. अपेक्षा करायला हरकत नाही, पण त्या वाजवी असाव्यात. नुसत्या चांगल्या दिसण्याला भुलून कुणीही लग्न करणार नाही, याचं भान तिला द्यायला हवं. क्वचित प्रेमात पडून किंवा उतावीळपणाने अशी लग्ने होतात. पण त्यात तिच्या किंवा त्याच्या कमी शिक्षणाचा मुद्दा पुढे करून जन्मभर क्षुद्र लेखणं तरी सोसावं लागतं किंवा विसंवाद होऊन एकमेकांना सोडचिठ्ठी तरी द्यावी लागते. अशी कितीतरी उदाहरणे आजूबाजूला पाहायला मिळतात.
लग्न जमवताना पहिली गोष्ट म्हणजे, स्वतःची पात्रता ओळखून अपेक्षा ठरवायला हव्यात. स्वतःचे शिक्षण, नोकरी, राहणी याला अनुकूल असेल अशीच अपेक्षा ठेवायला हवी. मुलींच्या बाबतीत भाराभर अपेक्षा ठेवताना मुलाने स्वतःचाही अभ्यास करायला हवा. कोणत्या गोष्टीत आपण तडजोड करू शकतो किंवा कोणत्या नाही याची स्पष्टता व्हायला हवी. पण कोणत्याही बाबतीत मी तडजोड करणारच नाही अशी भूमिका नसावी. स्वतःच्या चांगल्या-वाईट सवयींकडे गंभीरतेने लक्ष द्यायला हवे. वेळ पडल्यास त्यासाठी घरातील अनुभवी वडीलधार्यांशी किंवा चांगल्या समुपदेशकाची मदत घ्यावी. समुपदेशनामुळे विचारांना योग्य व सकारात्मक दिशा मिळते. आपल्याकडे एक गैरसमज आहे की काहीतरी बिनसल्यावरच समुपदेशकाकडे जायचे.
लग्न जमवताना येणार्या अडचणी व कारणे कालानुरूप वाढत जातात. त्यातल्या दोन्ही म्हणजे वर व वधू पक्षाच्या लोकांनी एकमेकांना समजून घेणे! सामंजस्याने अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटू लागतात.