गुणवत्ता असलेल्या उमेदवारांच्या प्रश्नावर येत्या दि. २६ रोजी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिल्यानंतर नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गेले पंधरा दिवस उपोषणास बसलेल्या उमेदवारांनी फातोर्ड्याचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई व कुडतरीचे कॉंग्रेस आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या हस्ते लिंबाचा रस प्राशन करून उपोषण सोडले.
आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या या युवकांना तसा कोणीही वाली नव्हता. सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. विरोधी कॉंग्रेस नेत्यांचीही शक्ती कमी पडली होती. त्यामुळे बुधवारी गणेश चतुर्थी कशी साजरी करावी हा प्रश्न पडला होता. अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम केले.
सरदेसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खात्यातील उमेदवारांची भरती करणे कठीण असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण खात्याने बसगाड्या खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने वाहन चालकांची भरती करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून अन्य खात्यातील म्हणजे पशुसंवर्धन खात्यातील उमेदवारांची गुणवत्ता तपासून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच खाण खात्यातील क्षेत्रीय पर्यवेक्षक पदांची फेररचना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीच्या वेळी सत्तरी जागृत युवा मंचचे विश्वेश परब व विजयसिंह राणे उपस्थित होते.