Home बातम्या मराठी नाटक आणि स्त्री प्रश्‍न

मराठी नाटक आणि स्त्री प्रश्‍न

0

– शंभू भाऊ बांदेकर

आधुनिक मराठी रंगभूमीला गेल्या दीडशे-पावणे दोनशे वर्षांचा जो इतिहास लाभला आहे, तो समृद्ध इतिहास गणला जातो. याचे कारण म्हणजे त्या काळात स्त्रीमुक्ती, अस्पृश्योद्धार, कामगारांचे हित इत्यादी जे महत्त्वाचे प्रश्‍न होते, त्यांना वाणी व लेखणीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम तत्कालीन सुधारकांनी केले. यासाठी ‘नाटक’ हे माध्यमही त्यांनी वापरले. या माध्यमाद्वारे स्त्रियांचे प्रश्‍न चव्हाट्यावर मांडण्याचे काम ज्या समाजसुधारक नाटककारांनी केले, त्यांचे ऋण केवळ स्त्री जातीनेच नव्हे, तर तमाम मानवजातीने मनात साठविले पाहिजे. या संदर्भात स्त्री – जीवनाचे प्रश्‍न तरी काय होते, हे समजून घेणे उचित ठरेल.

बालविवाह, विधवा विवाह आणि स्त्रीशिक्षण हे त्यावेळी स्त्रियांना भेडसावणारे तीन महत्त्वाचे प्रश्‍न होते व यांची सोबत सती व हुंडा हे प्रश्‍नही करीत होते. स्त्रीला माणूस म्हणून पुरुषाइतकाच मानमरातब असला पाहिजे, स्वातंत्र्य व पूर्णत्व असले पाहिजे. याची पर्वा पुरूषप्रधान कुटुंबपद्धतीला नव्हती. त्यामुळे खासगीतही स्त्री प्रश्‍नांबाबत चर्चा होणे ही अत्यंत दुस्तर अशी गोष्ट होती. पण समाधानाची गोष्ट म्हणजे १९३० नंतर आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्यवादी दृष्टीकोनातून स्त्रीप्रश्‍नांची मांडणी नाटक या माध्यमातून होऊ लागली.

याला पहिली खर्‍या अर्थाने सुरवात झाली ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १९३५ मधील संगीत ‘बायकांचे बंड’ या नाटकाने. या नाटकातील नायिका ‘स्त्री’ राज्य उभे करण्याचा प्रयत्न करते व सर्व पुरुषांना गुलाम करण्याचा घाट घातला जातो. पण तिची ही कल्पना फक्त कल्पनाच राहते. हे खरे असले तरी पुरुषांपासून स्त्रियांना स्वतंत्रता पाहिजे, समानता पाहिजे. हा मंत्र स्त्रीपुरुषांपर्यंत पोहोचविण्याचे काम खाडिलकरांनी केले हे मात्र खरे!

त्यानंतर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी स्त्रीविषयक मांडणी करणारे एकूण तीन नाटके – १९३० ते १९४० या दशकात लिहीली. ही नाटके म्हणजे ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, व ‘जग काय म्हणेल?’ ही होत. या तिन्ही नाटकांपैकी विशेष गाजलेले नाटक म्हणजे १९३४ मध्ये रंगमंचावर आलेले ‘घराबाहेर’ हे नाटक होय. या नाटकाच्या ‘उंबरठ्यावर’ या प्रस्तावनेत आचार्य अत्रे म्हणतात,‘२१ नोव्हेंबर १९३३ ची गोष्ट. त्या दिवशी कोणीतरी मला एका दुर्दैवी स्त्रीची करुण कहाणी सांगितली. घरातील मंडळींच्या अमानुष जाचाला कंटाळून त्या असहाय्य स्त्रीला ‘घराबाहेर’ जावे लागले होते. त्यांच्या तिन्ही नाटकांत अशाप्रकारे पुरुषांच्या गुलामगिरीला कंटाळून स्त्रियांना ते अन्याय, अत्याचार, जबरदस्ती सहन करावी लागते. त्याचे ज्वलंत चित्रण त्यातून घडते. त्याचबरोबर ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि नंतर काळाची माता आहे’ हे मराठीत अजरामर झालेलं तत्त्वज्ञानही अत्र्यांच्या नाटकात आढळते.

हिंदू समाजात स्त्री ही पराधीन आहे. धर्माच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने आणि व्यवहाराच्या दृष्टीनेही. आर्थिकदृष्ट्या स्त्री ही स्वावलंबी झाल्यावाचून ती कोणत्याही अर्थाने, खर्‍या दृष्टीने स्वतंत्र होणार नाही, हे चित्रित करण्याचे काम खाडिलकर, अत्रे यांन केले व त्यावर कळस चढविण्याचे काम राम गणेश गडकरी यांनी आपल्या ‘सं. एकच प्याला’ मधून केले. म्हणूनच जाणकारांनी ‘एकच प्याला’बद्दल म्हटले आहे, ‘हे नाटक म्हणजे दारूच्या दुःष्परिणामांची करुण कहाणी तर आहेच, पण ती ‘पतिव्रत्यांच्या’ दुःष्परिणामांची लोककथा आहे.’ त्यानंतर मराठी नाटकांतून स्त्री प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम प्रामुख्याने ज्यांनी केले त्यामध्ये ‘कुलवधू’ नाटकाचे लेखक मो. ग. रांगणेकर व ‘भूमिकन्या सीता’ चे नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांचा उल्लेख करावा लागेल. आपल्या प्रेमळ सोशीक आणि नैतिक वागणुकीने ‘कुलवधू’ मधील भानुमती आपला नवरा सासू-सासरा, नणंद यांनी कशी वठणीवर आणते, याचे सार्थ चित्रण जसे रांगणेकरांनी केले आहे, त्याचप्रमाणे ‘भूमिकन्या’ मध्ये मामा वरेरकर यांनी भूमिपुत्र यांना सीतेने रामाकडून कसा ‘न्याय’ मिळवून दिला आहे त्याचे यथार्थ चित्रण पाहायला मिळते.

इतर मराठी नाटककारांनीही सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक दाखले देत स्त्रीयांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याची तसेच आधुनिकता, समाज व संस्कृती, शिक्षणव्यवस्था, समाजवाद, निधर्मी विचारधारा यांना वाचा फोडण्याचे काम केले. यात समाजप्रबोधनकार आगरकर, गांधीजी, धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, म. फुले, सावित्रीबाई फुले आदिंची समावेश करावा लागेल. यात स्त्रीमुक्तीचा ध्यास घेतलेले बहुजन समाजाते नेते अपवादात्मक होते, तर बहुतेक सर्व नाटककार हे उच्च वर्णियच होते. हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही.