Home बातम्या मद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

मद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

0

माडेल येथे दारूच्या गोदामाला सील ठोकले

माडेल-थिवी येथील निवडणूक भरारी पथकाच्या आदेशानुसार एका दारूच्या गोदामाला म्हापसा अबकारी खात्याने सील ठोकून वाहतूक परवाना, बॅच व बाटल्यावर किंमत लावलेली नसल्याच्या कारणास्तव १ लाख रुपयांची वाईन व काजू फेणीचे मिळून २४१ बॉक्स खात्याच्या अधिकार्‍यांनी जप्त केली.

माडेल-थिवी येथील आनंदी रेसिडन्सी इमारतीमधील एका दुकानात बेकायदा दारू साठवून ठेवल्याची माहिती काल दुपारी भरारी पथकाला मिळताच त्यांनी अबकारी खात्याला पाचारण करून त्या गोदामाला सील ठोकले होते. यावेळी गोदामात सुमारे अकराशे दारूचे बॉक्स होते. भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी या गोदामातील दारू बाबतचे सर्व परवाने व कागदपत्राद्वारे आपल्याला अहवाल सादर करावा असा आदेश म्हापसा अबकारी विभागाचे निरीक्षक रमण फातर्पेकर यांना दिला होता. त्यानुसार अबकारी खात्याने जितेंद्र सावंत यांच्या मालकीच्या दारू गोदामाबाबतची सर्व कागदपत्रे परवाने तसेच सर्व दारूच्या बॉक्सेस खोलून पाहिले असता त्यात २०० काजूच्या व इतर वाईनच्या मिळून २४१ बॉक्समधील बाटल्यांवर किंमत व बॅच लिहिलेला नसल्याचे आढळले. या गोदामातून इतरत्र दारू नेण्याचा वाहूतक परवानाही मालकाने घेतला नसल्याचे खात्याच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक सतीश दिवकर व विशाल भिवशेट यांच्या समवेत अबकारी म्हापसा विभाग निरीक्षक रमण फातर्फेकर, उपनिरीक्षक मोहनदास गोवेकर, तातू पोतेकर, सिद्धेश हळर्णकर व प्रशिद चोपडेकर या पथकाने वरील बेकायदा दारू जप्त केली. अबकारी खात्याच्या निरीक्षकांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या दोडामार्ग येथील अबकारी खात्याच्या गोदाममध्ये ठेवण्यात आल्याची माहिती रमण फातर्फेकर यांनी दिली.

४.९० लाखांचे मद्य जप्त

अबकारी खात्याने काल विविध ठिकाणी छापे मारून ४,९२१०० रु. चे मद्य जप्त केले.

तिसवाडी येथे मारलेल्या छाप्यात ३६१५ बल्क लिटर्स एवढे मद्य सापडले असून त्याची किंमत ४,५०००० रु. एवढी असल्याचे अबकारी खात्याच्या उपायुक्त दीपाली नाईक यांनी सांगितले. सासष्टीत मारलेल्या छाप्यात २१०० रु. एवढ्या किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.

बाणावली येथे पेपर ऍण्ड स्पाईट फास्ट फूड व त्या हॉटेल मालकाच्या घरात धाड घालून ४० हजार रुपयांचा विनापरवाना मद्यसाठा जप्त केला. पुलवाडो बाणावली येथील अनुफ्रे गोमीश इ पेरैरा यांच्या घरात व रेस्टॉरंटमध्ये सिग्नेचर, व्हिस्की व आय बी दारूच्या पेट्या साठवून ठेवल्या होत्या. अबकारी खात्याचे निलेश नाईक व पथकाने ही कारवाई केली.