भारताची जे कुरापत काढतील त्यांची नांगी ठेचू

0
117
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आयएनएस हंसा नौदल तळास भेट दिली. यावेळी ताबाधिकारी कॅप्टन थिओफिलिस यांच्याकडून मिग २९के लढाऊ विमानाबाबत माहिती जाणून घेताना पर्रीकर.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा सज्जड इशारा 

जे कोणी भारताकडे वाकडी नजर करून पाहतील, कुरापत काढतील त्यांची नांगी ठेचली जाईल, अशी ग्वाही देशाचे नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पणजी दूरदर्शन आयोजित ‘फोन इन’ कार्यक्रमात दिली. संरक्षण मंत्रालयाचा आपण ताबा घेतला त्याला फक्त दोनच दिवस झालेले आहेत, परंतु देशाच्या संरक्षणाशी संबंधित सर्व विषयांचा अभ्यास करून त्यावर देशहित नजरेसमोर ठेवून तोडगे काढले जातील असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. फक्त आपल्याला त्यासाठी थोडा वेळ द्या असे ते म्हणाले. राज्याच्या विविध भागांतून जनतेने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यावेळी मनमोकळी उत्तरे दिली. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांनी या चर्चेचे संचालन केले.संरक्षणविषयक भ्रष्टाचार हा देशद्रोह
देशात भ्रष्टाचार अनेक प्रकारचा आहे, परंतु संरक्षणाशी संबंधित जो भ्रष्टाचार होतो, तो सरळसरळ देशद्रोह आहे. आपण त्याची मुळीच गय करणार नाही आणि संरक्षण मंत्रालयाचे यापुढील सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक रीतीने होतील, असे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी अनपेक्षितपणे आपल्याकडे आली. ती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यामागे कोणती प्रेरणा होती या प्रश्नावर आव्हाने स्वीकारण्याची आपल्याला सवय आहे. आपण राजकारणतही अनपेक्षितरीत्या आलो होतो. मुख्यमंत्रीपदही आपल्याकडे अनपेक्षितपणे चालून आले होते. संरक्षणमंत्रीपदही एका विशिष्ट परिस्थितीत आपल्याकडे आलेले आहे. पण या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आपण करीन असे पर्रीकर यांनी पुढे सांगितले.
लोकांशी नेहमीच जोडलेलो
लोकांमध्ये आपल्या या नव्या नियुक्तीविषयी विलक्षण अभिमान दिसतो आहे. गोव्यामध्ये या घडीस आपले विरोधकही आपली प्रशंसा करू लागले आहेत. हे स्थित्यंतर कसे घडले या प्रश्नावर आपण आधीपासूनच लोकांशी जोडलो गेलेलो होतो. त्यामुळे संरक्षणमंत्रिपद मिळताच त्यांच्या भावनांना उद्गार मिळाला एवढेच असे पर्रीकर उत्तरले. आपल्यालाही लोकांचे आपल्यावरील हे प्रेम पाहून भरून आल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यातील आपल्या कारकिर्दीत आपण अनेक प्रश्नांची सोडवणूक केलीत, अनेक आश्वासनांची पूर्तता केलीत. आपल्या दृष्टीने आपल्या कार्यासंबंधी समाधानाचा क्षण कोणता या प्रश्नावर राज्याची आर्थिक परिस्थिती खाणींवरील बंदीमुळे बिकट असतानाही आपण त्यातून मार्ग काढू शकलो याचे आपल्याला समाधान असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय नेत्याचीच प्रतिमा
आपण प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात जात आहात. अशावेळी राष्ट्रीय नेत्याच्या रूपात आपल्याकडे आता देश पाहणार आहे. त्याच्याशी जुळवून कसे घ्याल या प्रश्नावर आपल्याकडे लोक राष्ट्रीय नेता म्हणूनच पाहात आलेले आहेत. संपूर्ण देशातून आपल्याला नेहमीच प्रेम व आपुलकी मिळत आलेली आहे असे पर्रीकर यांनी सांगितले.
देशांतर्गत संरक्षण समुग्री उत्पादनास चालना
देशांतर्गत संरक्षण उत्पादन निर्मीतीकडे आपल्या सरकारने लक्ष दिलेले आहे. संरक्षण सामुग्रीच्या देशांतर्गत उत्पादनाकडे आपण कसे पाहता, या प्रश्नावर संकटाच्या घडीस विदेशांवर अवलंबून राहणे घातक ठरू शकते. त्यामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनात वाढ करण्याचे आपले उद्दिष्ट राहील. आज सत्तर टक्के लष्करी समुग्रीची परदेशांतून आयात करावी लागत असली तरी येत्या काळात टप्प्याटप्प्याने ते मगणी कमी केले जाईल असे पर्रीकर यांनी सांगितले.
पाकिस्तान व चीनच्या आगळिकांसंदर्भात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर पर्रीकर म्हणाले की आपली सैन्यदले आव्हानांचा मुकाबला करण्यास समर्थ असून त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी आपण पार पाडणार आहोत.
संरक्षण खरेदीस गती देणार
संरक्षणविषयक खरेदी व्यवहार गतिमान करण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यामध्ये संपूर्ण पारदर्शकता असेल. कोणालाही दलालीची संधी मिळणार नाही. जे निर्णय गेल्या दहा वर्षांत घेतले गेले नव्हते, ते आपण वेगाने एकमागून एक घेऊ असे आश्वासन पर्रीकर यांनी यावेळी दिले.
लष्कराच्या ताब्यात गोव्यात ज्या जमीनी आहेत, त्यासंबंधी आपण योग्य तोडगा लवकरच काढू, दाबोळी विमानतळावर नागरी वाहतूक वाढावी यासाठी नौदल आडकाठी आणणार नाही याची आपण दक्षता घेऊ असेही पर्रीकर यांनी सांगितले. मोपा विमानतळ ही गोव्याची गरज आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया आपण यापूर्वीच सुरू केलेली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंतमोपा विमानतळ पूर्ण होईल अशी अपेक्षा पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण कधीही सुरक्षेचा बडेजाव मिरवीत नाही. गरज असेल तेथेच संरक्षण दलाचे विमान घेऊन आपण प्रवास करू असे आपण नुकतेच सांगितले आहे. साधेपणाची ही शिकवण आपल्यात कशी रुजली या प्रश्नावर पोशाख ही वरवरची गोष्ट असते. साधेपणाचा संस्कार जन्मजात येत असतो असे ते म्हणाले.
गोव्यात सैन्यभरतीस प्रतिसाद
देशाच्या नागरिकामध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यांच्यामनात सैन्यदलांसंबंधी आपुलकी निर्माण होणे गरजेचे आहे. गोव्याच्या तरुणामध्येही सैन्य भरतीबाबत आता जागृती होऊ लागली आहे ही चांगली बाब असल्याचे पर्रीकर म्हणाले.